विसरलेले समाज - २ : टुलोर
आज अस्तित्वात असलेले जे १० विविध मानवी समुदाय चिले देशातील मूळ रहिवासी मानले जातात, त्यातील अटाकामेनो किंवा लिकान अंताई वंशाचे लोकं आज सध्या जिथे सान पेद्रो द अटाकामा हे शहर आहे त्या परिसरात राहतात. मात्र ह्या अटाकामेनो समाजाचा ज्ञात इतिहास ख्रिस्तोत्तर ७व्या /८व्या शतकांपर्यंतच जातो, म्हणजे ह्या भागातील प्रसिद्ध टिवानाकू साम्राज्याच्या सुवर्णकाळापर्यंत. आणि अटाकामेनो संस्कृतीच्या इतिहासात ह्या टिवानाकूच्या प्रभावाच्या स्पष्ट खुणा आजही दिसतात. पण मग ख्रिस्तपूर्व सु. ८००० (अटाकामा मधील मानवी वास्तव्याच्या पहिल्या खुणांचा काळ) ते टिवानाकू ह्या मधल्या काळात इथे काय घडलं?
मी मुळात अटाकामामध्ये गेलो होतो ते एका संपूर्णपणे वेगळ्या प्रदेशातील कधी न अनुभवलेला निसर्ग पाहायला - मून व्हॅली, तातिओ गायझर, रेनबो माउंटन सारखे, आपण चंद्र किंवा मंगळासारख्या परग्रहावरच आहो की काय असं भासविणारे भूप्रदेश (पहा पहिला फोटो - अटाकामाच्या वाळवंटातील काही दृश्यं) पाहून परतताना आमचा वाटाड्या आम्हाला मून व्हॅली जवळच टुलोर गावाजवळील पुरातन भग्नावषेशांकडे घेऊन गेला. आणि निसर्गयात्रे बरोबरच एक वेगळीच सांस्कृतिक सफरही पदरी पडली.
मून व्हॅली नजीकच्या आजच्या वैराण वाळवंटात १० हजार वर्षांपूर्वी मात्र फार वेगळी परिस्थिती होती. सान पेद्रो आणि वियामा नद्यांमुळे येथे निर्माण झालेल्या ओऍसिस सारख्या भागात प्राचीन मानवी टोळ्यांनी आपली भटकी/शिकारी (hunter-gatherer) जीवनशैली त्यागून एका जागी स्थिर राहून शेतीवर जगण्याचा मार्ग स्वीकारला. सुमारे ८ ते ९ हजार वर्षांपूर्वी रानटी मका दक्षिण मेक्सिकोमध्ये माणसाळवला (domesticated) गेला आणि पुढील काही शतकात अँडीज पर्वतराजीच्या आश्रयाने राहणाऱ्या टुलोर सारख्या अनेक समाजाचं मुख्य पीक बनला (आजमितीला ह्या भागात ५५ वेगवेगळ्या जातीचे मके पिकतात!). ह्या शिवाय एतद्देशीय उंटसदृश वंशातील (Camelids) रानटी प्रजाती माणसाळवून त्यांचा शेतीसाठी (किंवा त्यांच्या मांसाचा आणि दुधाचा आपल्या आहारात) उपयोगही टुलोर समाजाने केला असावा. आज दक्षिण अमेरिकेत दिसणारे लामा, किंवा वायकुनिया सारखे प्राणी त्यांचेच सध्याचे वंशज.
एकूणच टुलोरचं स्थापत्य आणि बांधकामाचं तंत्र (मातीच्या विटा आणि घुमट (Self-Supporting vaults)) पाहून एक अंदाज असा आहे की बोलिव्हियातील ओरुरो विभागातील वांकारानी टोळ्या सुमारे ख्रिस्तपूर्व ५ - ६व्या शतकात टुलोर येथे स्थलांतरीत झाल्या असाव्या. कारण त्यांच्याही घरं /गावांची रचना टुलोरशी मिळतीजुळती होती - आजही ओरुरो प्रांतात ग्रामीण भागात अश्या प्रकारची घरं दिसतात.
येथे सापडलेल्या वस्तू (उदाहरणार्थ ऑब्सिडीयन किंवा मॅलाकाइट सारख्या ह्या परिसरात न मिळणाऱ्या दगडांच्या वस्तू, धातूची अवजारे, टुलोरच्या कुंभारकामा पेक्षा वेगळे तंत्र वापरून केल्यासारखी वाटणारी भांडी इ.) पाहून येथील उत्खनन करणाऱ्या शात्रज्ञांच्या मते टुलोरकरांचा व्यापारी/सामाजिक संबंध चिलेचा समुद्रकिनारा, बोलिव्हियातील पठारं किंवा अँडीज पर्वतराजी पलीकडला आजचा अर्जेन्टिना अशा दूर दूर च्या समाजांशी असला पाहिजे.
साधारण ख्रिस्तोत्तर २०० च्या सुमारास सान पेद्रो नदीचा मार्ग झपाट्याने बदलत गेला आणि त्यामुळे येथे पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होऊन, तसंच वायव्येला पूर्वीपासूनच असलेल्या वाळवंटाचं आक्रमण वाढून हा सारा परिसर बहुधा शेतीला आणि म्हणून मनुष्य वस्तीला निकामी झाला असावा. प्रचलित समजुतीनुसार येथील समाज येथून परागंदा होऊन दुसरी कडे स्थायिक झाला आणि आजचा अटाकामेनो समाज हे त्यांचेच वंशज आहेत.
मात्र १९५६ साली रेव्ह. गस्टावो ल पेज ह्या पुरातत्वशास्त्रज्ञाने टुलोरचे अवशेष शोधून काढेपर्यंत, ह्या पूर्वसूरींची स्मृती पूर्णपणे पुसून गेली होती!
प्रत्यक्ष भेटीत स्थानिकांकडून जे मी ऐकलं त्याला पूरक म्हणून ज्या दोन शोधनिबंधांचा मी मुख्यतः आधार हे लिहिण्यासाठी घेतला त्यांच्या links खाली दिल्या आहेत. त्यातील पहिला स्पॅनिश भाषेत असल्यामुळे वाचण्या आधी तुम्हाला Google Translate च्या मदतीने त्याचं इंग्रजीत भाषांतर करून घ्यावं लागेल.
1. http://www.chungara.cl/Vols/1986/Vol16-17/Tulor_posibilidades_y_limitaciones_de_un_ecosistema.pdf
2.
http://www.chungara.cl/Vols/2010/Vol42-2/02-NUNEZ-CHUNGARA-42-2.pdf