टर्की, सीरिया आणि इजिप्त ह्या तीन देशांना ख्रिश्चन धर्माच्या सुरुवातीच्या इतिहासात किती महत्वाचं स्थान आहे ह्याची मला अजिबात कल्पना नव्हती. सीरियाला अर्थात मी कधीच जाऊ शकलो नाही, तिथे सतत चालू असलेल्या मारामारी मध्ये कोण आपला जीव फुकाफुकी धोक्यात घालणार. परंतु टर्की आणि इजिप्त मध्ये प्रवास केल्यावर ख्रिश्चानिटीच्या तेथील प्राचीन पाऊलखुणांनी मला फार बुचकळ्यात टाकलं.
कारण रोमन सम्राट कॉन्स्टंटाईनने ३१३ साली काढलेल्या मिलानच्या फतव्यानुसार - ख्रिश्चन धर्माच्या पालनाचा अधिकार ज्यांची तशी इच्छा असेल त्या रोमन नागरिकांना मिळाला होता. त्यामुळे मला असं वाटत होतं की त्यानंतर पश्चिमेला सर्व युरोपभर त्याचा प्रसार झाला असणार आणि जेंव्हा १४-१५व्या शतकांपासून युरोपमधील राज्यांनी आपली सत्ता पूर्वेला पसरवली तेंव्हाच तो आशिया/आफ्रिका खंडात पसरला असणार. टर्की आणि इजिप्त मध्ये प्रवास केल्यावर ही समजूत किती चुकीची आहे त्याची जाणीव झाली.
ख्रिश्चनिटीला खऱ्या अर्थाने राजाश्रय सर्व प्रथम मिळाला टर्की मध्ये - रोमन साम्राज्याची पूर्व आणि पश्चिम अशी दोन शकलं झाल्यावर, पूर्व रोमन साम्राज्याचा सम्राट थिओडोशियस ह्याने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करून बाकी सर्व पारंपरिक, धार्मिक प्रथांना बंदी घातल्यावर. परंतु सामान्य प्रजेमध्ये त्याही आधी ख्रिश्चानिटीचा प्रसार झाला असावा. तसंच अजून तग धरून असलेल्या पारंपरिक रोमन धर्माचे अनुयायी, ख्रिश्चानिटीच्याही आधी रोमन साम्राज्यात अधिकृत मान्यता मिळालेल्या ज्यू धर्माचे अभिमानी आणि नवीनच प्रतिष्ठा मिळालेल्या ख्रिस्ताचे पाठीराखे ह्यांच्यात आपलेच वर्चस्व प्रस्थापित करण्या साठी तीव्र स्पर्धा (प्रसंगी जीवघेणी सुद्धा) अनेक शतकं चालू असावी. कारण टर्की मध्ये फिरताना ठिकठिकाणी - विशेषतः कपाडोकियाच्या डोंगराळ भागात ह्या सर्वांच्या खुणा, गोरेमीच्या गुहा किंवा केमाक्लीचे भूमिगत शहर (पहा पहिला फोटो गोरमी दरीचा) अश्या स्वरूपात आपल्याला आज दिसतात. त्यांची आपण ओळख करून घेऊच.
पण त्या आधी पाहूया चौथ्या शतकात प्रस्थापित झालेला एक ख्रिश्चन मठ आणि त्याभोवतालचा एक अद्वितीय निसर्ग चमत्कार.
त्या मठाची दंतकथासुद्धा फार रोचक आहे. चौथ्या शतकात आजच्या सिरियातील (टर्की, सिरिया, इराक, जॉर्डन ही विभागणी युरोपच्या वसाहतवादाच्या काळात युरोपियन सत्तांनी आपल्या सोयीसाठी स्थानिक लोकांच्यावर लादलेली आहे) अलेप्पो भागात सायमन नावाचा एक ख्रिश्चन धर्मगुरू फार प्रसिद्धीला आला. तो अनेक प्रकारचे चमत्कार करतो अशी सगळीकडे त्याची ख्याती पसरल्यामुळे लांबलांबून लोकं त्याच्या दारात आता हा काय चमत्कार आपल्याला दाखवणार अश्या आशेने गर्दी करू लागले. इतकंच नव्हे तर त्याने रात्रंदिवस नुसते चमत्कारच करावे - खाणे पिणे किंवा देवाची प्रार्थना असल्या फालतू गोष्टीत वेळ दवडू नये अशीही अपेक्षा करू लागले. कुठलीही गोष्ट रोजची झाली की त्याचा कंटाळा माणसाला येणारच - मग ते चमत्कार असोत की कारकुनी!
ह्या रोजच्या कटकटीला कंटाळून सायमन-बाबा आपल्या काही शिष्यांसह अलेप्पोहून परागंदा झाला, आणि जिथे आपल्याला “चमत्कार करून दाखव” म्हणून वेठीला धरलं जाणार नाही अशी जागा शोधत आजच्या टर्कीतील कपाडोकिया भागात पोचला.
उंच उंच सुळके ज्यावर चढून जाणे सराईत गिर्यारोहकांनाही जमणार नाही, उभे कडे पोखरून झालेल्या गुहा, थक्क करून टाकणारे दगडाचे विविध आकार, अश्या ह्या प्रदेशात सायमनने आपला मठ स्थापला.
ह्या निसर्गाच्या कलाकृतींना यशस्वी आव्हान देईल असा मानवी स्थापत्याचा आविष्कार आपल्याला दिसतो केमाक्ली सारख्या जमिनीखाली बांधलेल्या शहरात. त्याला भेट देऊ आपण ह्या पुढच्या भागात.