Saturday, 18 March 2023

त्सिंगीची असिधारा यात्रा

आपल्या पुराणांतील अनेक व्रत-वैकल्यांपैकी पाळायला सर्वात कठीण व्रतांचं वर्णन “असिधाराव्रत” असं केलं जातं. “असिधाराव्रत” म्हणजे शब्दशः - तलवारीच्या धारेवर चालण्या एव्हढं कठीण व्रत! 

“त्सिंगी” ह्या मालागासे (मादागास्कर मधील लोकांच्या) भाषेतील शब्दाचा अर्थही सुरीच्या (किंवा करवतीच्या) धारेचं क्षेत्र असाच काहीसा आहे. त्सिंगीला जाण्याची वाट सुरु होते बेकोपका ह्या मादागास्कर मधील गावाजवळील मानाम्बोलो नदीच्या उत्तर किनाऱ्यापासून. ती वाटही अशीच सर्वत्र पसरलेल्या तलवारीसारख्या धारदार चुनखडीच्या दगडांच्या पात्यांमधून जात असल्यामुळे, तिथे जाणं हे एखादं “असिधाराव्रत” पाळण्या सारखंच आहे. 

चुनखडीच्या उंच कडेकपारी कापत जाणारी संत्र्याच्या रसासारख्या नारिंगी रंगाची मानाम्बोलो नदी आणि त्या कपारींत पाण्याने धुपून तयार झालेल्या चित्रविचित्र गुहा हा ही एक अजब चमत्कार आहे पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी (आज फक्त हा एक वानगी दाखल फोटो - पहिला). 

ज्या खोल खिंडीतून नदी वहात बेकोपकाकडे येते त्याच्याच वरील कडेकपारींमध्ये त्सिंगीचं हे उभारलेल्या सुऱ्यांचं शेत साडेतीन लाख एकर क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे. सुमारे वीस कोटी वर्षांपूर्वी त्सिंगी बनवायला निसर्गाने सुरुवात केली असावी. प्रथम समुद्रतळावर मृत सागरी जीवांच्या अवशेषातील कॅल्शिअमची संयुगे जमून limestone (चुनखडीचा दगड) चा थर निर्माण झाला. तदनंतरच्या भूगर्भातील उलथापालथीमुळे हे चुनखडीचे डोंगर पाण्याच्या शेकडो, हजारो फूट वर आले. शतकानुशतकांच्या पावसाच्या धारांनी कातून त्यातील सर्वात कठीण भागाचे उंच उंच अणकुचीदार सुळके शिल्लक ठेवले. त्याच बरोबर जमीनच्या पृष्ठभागावर वाहणाऱ्या नदी-नाले-झऱ्यांनी ह्या डोंगरांचा पाया पोखरून त्यांच्या गर्भात विस्तीर्ण गुहा खोदल्या. एकाच वेळी दोन्ही बाजूने होणाऱ्या ह्या निसर्गाच्या खोदकामामुळे बहुतेक गुहांची छतं विच्छिन्न होऊन उभारलेल्या भाल्याच्या फाळासारखे किंवा करवतीच्या पात्यासारखे त्यांचे तुकडे मात्र शिल्लक राहिले. हेच आजचं त्सिंगी! 

मात्र हे अद्भुत पाहायला जावं लागतं, त्सिंगीच्या माथ्यावर - जिथून दूरवर पसरलेलं हे निसर्गशिल्पाचं रौद्र नीट निरखत येतं. माथ्यावर जाणाऱ्या वाटेची सुरुवात होते एका दरडीतील (दुसरा फोटो) चिंचोळ्या फटीपासून.

तुम्ही जर Lord of the Rings : Return of the King हा गाजलेला सिनेमा पहिला असेल तर त्यात सिनेमाचा हिरो अरागॉर्न ज्या पिशाच्च्यांच्या वाटेने (Paths of the Dead) जातो, त्याचा दरवाजा हुबेहूब त्सिंगीच्या ह्या वाटेसारखाच दिसतो! अर्थात अरागॉर्नला जसा भूत-पिशाच्च्यांच्या सेनेशी सामना करावा लागला तसं काही चित्तथरारक आमच्या वाटेला आलं नाही. 





पण आमची वाटही प्रसंगी अभिमन्यूच्या चक्रव्यूहासारखी फसवी मात्र होती. एकतर अतिशय चिंचोळी - काही ठिकाणी तर इतकी, की माझी शरीरयष्टी जरी तशी बारीकातच जमा होणारी असली (अर्थात माझ्या बायकोचं ह्याबद्दल दुमत आहे - पण ते सोडा) तरी पाठीवरील बॅकपॅक डोक्यावर धरून खेकड्यासारखं तिरकं तिरकं किंवा काही ठिकाणी कंबर काटकोनात दुमडून वाकलेल्या आजीबाई सारखं चालावं किंवा चक्क रांगावं लागत होतं. पहा पुढचे दोन फोटो. 



दोन्ही बाजूला उंच उभे कडे असल्यामुळे (पहा पाचवा फोटो) झापड बांधलेल्या बैलासारखं फक्त नाकासमोरचं तेवढं दिसत होतं. त्यामुळे आपण नक्की कुठे चाललो आहोत, आपल्या इष्ट दिशेने काही प्रगती करत आहोत की एकाच वर्तुळात चकवा लागून गोल फिरतो आहोत हे सांगणं कठीण होतं. 

त्यात पुन्हा चालताना पायाखालच्या वाटेवरचं लक्ष धळून चालणार नव्हतं. कारण, वरवर चढत जाणाऱ्या ह्या वाटेच्या दोन्ही बाजूला धारदार कपारी होत्या, आणि खाली वाटेच्या तळात करवतीच्या पात्यासारख्या आकाराच्या शिळा पसरलेल्या होत्या. पाय अडखळून खाली पडलं तर डोकं आपटून फुटण्याआधी शिरच्छेदच व्हायची शक्यता जास्त होती. आणि पडू नये म्हणून शेजारच्या कपारीवर हात ठेवून आधार घेतला तर शाहिस्तेखानासारखी बोटंच कापली जायची भीती होती. 

मात्र त्सिंगी नॅशनल पार्कच्या कर्मचाऱ्यांनी ही वाट शक्य तेवढी सुरक्षित करण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत त्याची वाखाणणी करायलाच हवी - दिशादर्शक खुणा, फार अवघड जागी चढायला मदत व्हावी म्हणून बांधलेल्या दोऱ्या, अगदीच अशक्य दरी असेल तेथे ओलांडायला टाकलेल्या फळ्या आणि सर्व काही वापरण्याजोग्या अवस्थेत! 

आमच्या वाटाड्याच्या पावलावर पाऊल टाकत जेंव्हा आम्ही त्सिंगीचा माथा गाठला तेंव्हा समोर पसरलेला उभ्या भाल्याच्या फाळांचा सागर मात्र तिथपर्यंत पोचण्यासाठी केलेल्या सर्व कष्टाचं सार्थक करणारा होता - शब्दशः Breathtaking: वरचा श्वास वरती आणि खालचा श्वास खाली राहील असा. पाहा शेवटचे 3 फोटो. 


नैसर्गिकरीत्या बनलेली, थक्क करणारी कातळ-शिल्प (Stalactites, Stalagmites) मी ह्या पूर्वीही अनेक ठिकाणी पहिली आहेत, विशेषतः जिथे limestone किंवा तत्सम Calcite ह्या खनिजाचं प्रमाण अधिक असलेले खडक प्रामुख्याने असतात अशा ठिकाणी ही निसर्गनिर्मित शिल्प अनेकदा आढळतात. उदहरणार्थ आपल्या अंदमान मधील बाराटांग बेटावरील गुहा किंवा विएतनाम मधील हालोंग बे मधील बेटांवरील गुहा. पण त्सिंगी सारखा भूप्रदेश मात्र मी तरी कधीच पहिला नव्हता. 

2 comments:

  1. तुझ्या प्रवासवर्णनावरून 'त्सिंगी'ची यात्रा म्हणजे सुळावरची पोळी!! 😀

    ReplyDelete
  2. जोशी सर, फारच छान ब्लॉग आहे. मराठीत आहे याचा विशेष आनंद. धन्यवाद.

    ReplyDelete

  विसरलेले समाज - २ : टुलोर   चिले देशातील अटाकामा असा प्रदेश आहे जिथे अनेक ठिकाणी गेल्या ५०० वर्षात पाऊसच पडलेला नाही. आणि जेथे पडतो तेथे...