मी ह्या आधीच्या लेखात म्हटलं होतं की टर्की आणि इजिप्त मध्ये प्रवास केल्यावर ख्रिश्चानिटीच्या तेथील प्राचीन पाऊलखुणांनी मला फार बुचकळ्यात टाकलं होतं. आज जरी तो संपूर्ण प्रदेश (इस्राएलचा अपवाद सोडून) इस्लामचा अनुयायी असला तरी ख्रिश्चानिटीच्या सुरुवातीच्या इतिहासातील अनेक महत्वाच्या घटना, युरोपमध्ये त्याचा सर्वदूर प्रसार होण्याआधी, ह्याचं भागात घडल्या. तो सर्वच इतिहास इथे सांगणं कठीण आहे. आज आपण त्यातील दोन महत्वाच्या पाऊलखुणा पाहू - एक टर्कीमधील आणि दुसरी इजिप्तमधील.
चौथ्या शतकाच्या सुरुवातीला रोमन सम्राट कॉन्स्टंटाईनच्या फतव्यानुसार
ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांचा छळ बंद होऊन ख्रिश्चानिटीच्या प्रसाराचा मार्ग
रोमन साम्राज्यातील प्रदेशांत (इटली, टर्की, सीरिया, लेव्हन्ट इत्यादी) मोकळा झाला
होता.
अर्थात तरीसुद्धा मूळ रोमन धर्माचे पाठीराखे आणि ह्या नवीन धर्माचे
चाहते ह्यांच्यातील तेढ आणि प्रसंगी मारामाऱ्या, कापाकाप्या संपल्या असं नाही. ह्या
सुरुवातीच्या काळात संख्याबळ पाठीशी नसल्या मुळे असेल कदाचित पण टर्कीच्या दऱ्याखोऱ्यात
अनेक नव-ख्रिश्चन समुदायांनी अवघड जागी गुहा-गुफेत किंवा जमिनीखाली भुयारांचं जाळं
खणून त्यांत आश्रय घेतला. त्यांचं एक उदाहरण (गोरेमीच्या गुहा) आपण ह्या आधीच्या लेखात
पाहिलं.
केमाक्लीचं भूमिगत शहर हे (गोरेमीपेक्षाही थक्क करणारं) आणखी एक
उदाहरण. केमाक्लीची स्थापना नक्की कधी झाली त्याबद्दल बरीच वेगवेगळी मतं आहेत. ख्रिस्त-पूर्व
७०० वर्षांपूर्वी फिरजियन टोळ्या ह्या जागी तुरळक गुफा खणून त्यांत राहत होत्या असा
सर्वसामान्य समाज आहे. परंतु काही लोकांच्या मते त्याही आधी इ.स.पू. १२०० मधेच हिट्टाईट
लोकांनी येथे जमिनीखाली आपली घरं खोदली होती. अर्थात एक गोष्ट नक्की - त्या तुरळक गुहांच्या समूहाचं
एकसंध आणि कित्येक पातळ्यांवर जमिनीखाली खोल जाणारं “शहर” मात्र चौथ्या शतकांनंतर ख्रिश्चन
धर्मियांनी बांधलं.
आता पर्यंत पुरातत्वशास्त्रज्ञांनी केमाक्लीच्या भुयारांत ८ पातळ्या
शोधून काढल्या आहेत, २०० फुटांपेक्षाही अधिक खोल जाणाऱ्या.
त्यापुढील एक हजार वर्षांपेक्षा अधिक काळ हे शहर सतत ३००० पेक्षा
जास्त लोकांचं घर आणि आश्रयस्थान होतं - प्रथम मूळ रोमन धर्माच्या अनुयायांच्या छळापासून
स्वतःला वाचविण्यासाठी, नंतर बिझन्टाईन काळात येथे होणाऱ्या अरब सैन्याच्या स्वाऱ्यांपासून
आणि नंतर चौदाव्या शतकात आलेल्या तिमूरच्या मंगोल सैन्यापासून संरक्षण करण्यासाठी,
तसंच जवळ-जवळ विसाव्या शतकापर्यंत येथे राज्य करत असलेल्या ऑटोमन सत्तेच्या छळापासून
सुटका व्हावी म्हणून.
मात्र ह्या इतिहासापेक्षाही जास्त जाणून घेण्यासारखं आहे, केमाक्लीचं
चकित करणारं स्थापत्य. एखाद्या गावात लागणाऱ्या सर्व सोई शेकडो फूट जमिनीखाली इथे होत्या
- घरं, प्रार्थनास्थळं, सभामंडप, अगदी दारूचे गुत्ते सुद्धा.
जमीखालील अंधारात त्याकाळात
उजेडासाठी किंवा रोजच्या स्वयंपाकासाठी फक्त लाकूड, तेल किंवा तत्सम पदार्थ जाळणे हा
एकाच मार्ग होता, त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे आतले लोक गुदमरून मेलेच असते.
पण एव्हढ्या हजारो लोकांना श्वासोच्छवासासाठी लागणारी शुद्ध हवा पुरवणे आणि आतील दूषित
हवेचा निचरा करणे ह्याची केमाक्लीमधील व्यवस्था थक्क करणारी आहे. हवा खेळती ठेवण्यासाठी
अनेक जमिनी पर्यंत जाणारे उभे मार्ग ठिकठिकाणी खोदलेले आहेत आणि तेही अश्या चातुर्याने
की वर अगदी शहराच्या डोक्यावर उभ्या असणाऱ्या माणसाला सुद्धा ते सहजी नजरेत येऊ नयेत.
त्याशिवाय पाणीपुरवठा, शहरात साचणाऱ्या घाण/कचऱ्याची विल्हेवाट असे अनेक प्रश्न - जे
जमिनीवरच्या शहरांत सुद्धा सोडवणे आव्हानात्मक असतं ते केमाक्लीमध्ये तर आणखीनच कठीण
असणार. पण शहराच्या रचनाकारानी ह्या सर्वांची उत्तरं शोधली होती (त्याच्या खुणा आपल्याला
दिसतात). पहा पहिले ४ फोटो (चर्च, दारू गाळण्याची फॅक्टरी, धान्याची कोठारं, भुयारातील वाटा) - पण नुसते फोटो बघून केमाक्लीची पूर्ण कल्पना येणं
अशक्य आहे, प्रत्यक्ष त्या भुयारातील भूलभुलैयामधून वाट शोधत फिरल्याशिवाय.
मात्र इजिप्त मधला ख्रिश्चानिटीचा
प्रवास टर्कीच्याही आधीच सुरु झाला होता असं दिसतं. ४२ सालीच संत मार्कने इजिप्तला
येऊन प्रथम अलेक्झांड्रियामध्ये चर्च स्थापलं आणि धर्म प्रसाराला सुरुवात केली होती.
परंतु ४२ साल सुद्धा फार नंतरची गोष्ट झाली
असं अनेक आख्यायिकांचं म्हणणं आहे. स्वतः मेरी, बाळ जीझसला घेऊन, त्यांच्या पाठलागावर
असलेल्या रोमन सैनिकांची नजर चुकवत आश्रयाला इजिप्तला आली होती. नाईल नदीच्या काठाने
उलटा सुलटा प्रवास (ह्या प्रवासाच्या कथित मार्गाचा नकाशा पहा पाचव्या फोटोत) करून
शेवटी आजच्या कैरोमधील अबू सेगा चर्चच्या खालच्या गुहेत त्यांना आसरा मिळाला. आणि रोमन
सैनिकांनी कंटाळून पाठलाग सोडून दिल्यावर ती दोघे परत जेरुसलेमला गेली, अश्या काहीश्या
ह्या आख्यायिका आहेत.
ज्या गुहेत ती दोघं राहिली त्याचा हा सहावा फोटो. हे जर खरं असेल,
तर इजिप्त मधील ख्रिश्चानिटीचा इतिहास हा जवळ जवळ ख्रिस्त-जन्मापासूनच सुरु झाला असं
म्हटलं पाहिजे.
हे अबू सेगा चर्च आणि “लटकतं” चर्च म्हणून
प्रसिद्ध असलेलं पण “देवाची आई संत मेरीचं इजिप्तच्या बाबिलॉन मधील चर्च” अश्या लांबलचक
नावाचं चर्च ईजिप्तमधील सर्वात प्राचीन ख्रिश्चन प्रार्थनास्थळं मानली जातात (संत मार्कने
स्थापलेल्या पहिल्या शतकातील अलेक्झांड्रिया मधल्या चर्चची मूळ इमारत आज अस्तित्वात
नाही). मुळातील बाबिलॉनचा किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका रोमन गढीच्या अवशेषांवर
हे चर्च उभं केलेलं आहे. त्याला “लटकतं” म्हणण्याचं कारण म्हणजे चर्चचं मुख्य सभागृह
त्या रोमन गढीतील जाण्या-येण्याच्या मुख्य मार्गावर अधांतरी बांधलेलं आहे. ह्या “लटकत्या” चर्चची रचना फार पाहण्यासारखी आहे
(पहा सातवा फोटो). एका बाजूने वेगवेगळ्या काळात बांधलेले बांधकामाचे थर, त्याच्या खोलातील
पुरातन पाया पासून आजच्या चर्च (आठवा फोटो) पर्यंत स्पष्ट ओळखता येतात.
ही गढी नक्की कधी आणि कोणी बांधली ह्याबद्दल
मात्र अनेक वाद आहेत. जेंव्हा रोमन सेनांनी इजिप्तच्या प्राचीन राजसत्तेचा पराभव करून
आपलं राज्य स्थापन केलं तेंव्हा हा मूळ किल्ला बांधला असा एक समज आहे. तर दुसऱ्या कथेप्रमाणे
फॅरो सेसोस्ट्रीस (किंवा सेनुस्रेत) ह्याने पुरातन बाबिलॉन बरोबरच्या लढायांत धरून
आणलेले कैदी ठेवण्यासाठी ही गढी बांधली. पण तिसरी कथा अशी आहे की सत्य ह्याच्या बरोबर
उलटं आहे. बाबिलॉनचा राजा नेब्यूकाडनझर ह्याने इजिप्तच्या सेनेचा पराभव करून पकडलेले
कैदी ठेवण्यासाठी हा तुरुंग बांधला. जे काही असेल ते - पण अशा पुरातन प्रार्थनास्थळांच्या
भोवती ख्रिश्चन धर्म प्राचीन इजिप्त मध्ये वृद्धिंगत राहिला तो सातव्या शतकात खलिफा रशिदच्या सैन्याने
इजिप्तमधील रोमन सत्तेचा पाडाव करेपर्यंत.
आजही ह्या मूळ ईजिप्शियन ख्रिश्चन (कॉप्टिक
ख्रिश्चन) समाजाचे वंशज इजिप्तमध्ये पुष्कळ आहेत. खरं तर ख्रिश्चन धर्माच्या टर्की
आणि इजिप्तमधील इतिहासाचा शोध घेण्याची कल्पना सुद्धा माझ्या डोक्यात आली ती ईजिप्तमधील
कार्नाकचं देऊळ पाहून परत येताना आमच्या टॅक्सी चालकाबरोबर झालेल्या बोलण्या मधून.
तो दिवस होता ख्रिसमसचा. टॅक्सीत बसल्याबरोबर चालक मागे वळून आम्हाला “Merry
Christmas” म्हणाला. इजिप्तसारख्या मुस्लिम देशात ही नवलाईची गोष्ट होती म्हणून मी
चौकशी केली तर तो निघाला कॉप्टिक ख्रिश्चन
- विस्मरणात गेलेल्या पिढयांपूर्वीपासून ख्रिश्चन असलेल्या कुटुंबातला. त्याने सांगितलेल्या
दंतकथांतून माझं कुतूहल जागृत झालं आणि मग कैरो/अलेक्झांड्रियाला गेल्यावर वर वर्णन
केलेल्या स्थळांना आम्ही भेट दिली!
No comments:
Post a Comment