Tuesday, 24 October 2023

 विसरलेले समाज - २ : टुलोर

 चिले देशातील अटाकामा असा प्रदेश आहे जिथे अनेक ठिकाणी गेल्या ५०० वर्षात पाऊसच पडलेला नाही. आणि जेथे पडतो तेथेही संपूर्ण वर्षभरात सरासरी फक्त १०-१५ मि.मी. एव्हढाच पडतो. सहारा सारख्या वाळवंटातही अटाकामापेक्षा दसपट अधिक पाऊस पडतो. पण अश्या ह्या रखरखाटात सुद्धा जीवन आपला पाय रोवून राहिलेलं आढळतं. ५०० हून अधिक जातीच्या वनस्पती, आणि त्यांच्या आधाराने जगणारे  ग्वानाको आणि वायकुनिया सारखे शाकाहारी प्राणी, टोळ, फुलपाखरं, गांधीलमाशांसारखे कीटक, त्यांच्यावर जगणारे विविध पक्षी, आणि कोल्ह्यासारखे शिकारी प्राणी अशी एक संपूर्ण जीवन-साखळीच पिढ्यानु-पिढ्या ह्या वैराण वाळवंटात नांदते आहे. अर्थातच ह्या जीवन साखळीत सर्वात वरच्या स्थानावर मनुष्य प्राणीही आलाच.

आज अस्तित्वात असलेले जे १० विविध मानवी समुदाय चिले देशातील मूळ रहिवासी मानले जातात, त्यातील अटाकामेनो किंवा लिकान अंताई वंशाचे लोकं आज सध्या जिथे सान पेद्रो द अटाकामा हे शहर आहे त्या परिसरात राहतात. मात्र ह्या अटाकामेनो समाजाचा ज्ञात इतिहास ख्रिस्तोत्तर ७व्या /८व्या शतकांपर्यंतच जातो, म्हणजे ह्या भागातील प्रसिद्ध टिवानाकू साम्राज्याच्या सुवर्णकाळापर्यंत. आणि अटाकामेनो संस्कृतीच्या इतिहासात ह्या टिवानाकूच्या प्रभावाच्या स्पष्ट खुणा आजही दिसतात. पण मग ख्रिस्तपूर्व सु. ८००० (अटाकामा मधील मानवी वास्तव्याच्या पहिल्या खुणांचा काळ) ते  टिवानाकू ह्या मधल्या काळात इथे काय घडलं?

 


मी मुळात अटाकामामध्ये गेलो होतो ते एका संपूर्णपणे वेगळ्या प्रदेशातील कधी न अनुभवलेला निसर्ग पाहायला - मून व्हॅली, तातिओ गायझर, रेनबो माउंटन सारखे, आपण चंद्र किंवा मंगळासारख्या परग्रहावरच आहो की काय असं भासविणारे भूप्रदेश (पहा पहिला फोटो - अटाकामाच्या वाळवंटातील काही दृश्यं) पाहून परतताना आमचा वाटाड्या आम्हाला मून व्हॅली जवळच टुलोर गावाजवळील पुरातन भग्नावषेशांकडे घेऊन गेला. आणि निसर्गयात्रे बरोबरच एक वेगळीच सांस्कृतिक सफरही पदरी पडली.

मून व्हॅली नजीकच्या आजच्या वैराण वाळवंटात १० हजार वर्षांपूर्वी मात्र फार वेगळी परिस्थिती होती. सान पेद्रो आणि वियामा नद्यांमुळे येथे निर्माण झालेल्या ओऍसिस सारख्या भागात प्राचीन मानवी टोळ्यांनी आपली भटकी/शिकारी (hunter-gatherer) जीवनशैली त्यागून एका जागी स्थिर राहून शेतीवर जगण्याचा मार्ग स्वीकारला. सुमारे ८ ते ९ हजार वर्षांपूर्वी रानटी मका दक्षिण मेक्सिकोमध्ये माणसाळवला (domesticated) गेला आणि पुढील काही शतकात अँडीज पर्वतराजीच्या आश्रयाने राहणाऱ्या टुलोर सारख्या अनेक समाजाचं मुख्य पीक बनला (आजमितीला ह्या भागात ५५ वेगवेगळ्या जातीचे मके पिकतात!). ह्या शिवाय एतद्देशीय उंटसदृश वंशातील (Camelids) रानटी प्रजाती माणसाळवून त्यांचा शेतीसाठी (किंवा त्यांच्या मांसाचा आणि दुधाचा आपल्या आहारात) उपयोगही टुलोर समाजाने केला असावा. आज दक्षिण अमेरिकेत दिसणारे लामा, किंवा वायकुनिया सारखे प्राणी त्यांचेच सध्याचे वंशज.

 

टुलोरच्या अवशेषांचं सर्वप्रथम नजरेत भरणारं वैशिष्ठय म्हणजे, त्यांची स्थापत्य-शैली. ह्या आधीही मी अनेक प्राचीन संस्कृतींचे अवशेष पहिले होते - भारतातील धोलावीरा/लोथल, कंबोडियामधील ख्मेर साम्राज्य, ईजिप्त, सँटोरिनी बेटावरील अक्रोटीरी, अगदी दक्षिण अमेरिकेतीलही नाझका, चावीन, वारी, टिवानाकू सारखे अनेक. पण असं, जिथे वर्तुळ हा एकच आकृतिबंध वापरून बांधलेलं सर्व काही आहे - घरं, धान्य साठविण्याची वखार, सभागृह सर्वकाही वर्तुळाकृती, मी कधीच पाहिलं नव्हतं. 

साबणाचं पाणी खळबळून त्यावर भरपूर सारा फेस काढल्यावर त्या फेसात जसा एकमेकाला चिकटलेल्या वेगवेगळ्या मापाच्या पण फक्त वर्तुळाकृती बुडबुड्यांचा समूह दिसेल अगदी तसंच हे गाव दिसत असलं पाहिजे. 

पहा दुसरा फोटो (मी काढलेला) आणि  तिसरा, ह्या गावाच्या नकाशाचा फोटो (ह्याठिकाणी उत्खनन करणाऱ्या शात्रज्ञांनी बनविलेला). पण हे गाव नांदतं असताना कसं दिसत असेल? पहा चौथा फोटो, उत्खननात सापडलेल्या भग्नावशेषांचा वापर करून बनविलेल्या घरांच्या प्रतिकृतीचा. तिसरा (नकाशाचा) आणि हा चौथा फोटो जर एकत्रित निरखून पहिला तर येथील स्थापत्याचं आणखी एक वैशिष्ठय तुमच्या लक्षात येईल - गावातील बहुतेक इमारती, आच्छादित बोळकांड्यानी एकमेकाला थेट जोडलेल्या होत्या. आपल्या घरातून गावाच्या चावडीवर जायचं असेल तर घराबाहेर रस्त्यावर जायला नको! ह्या बोळकांड्या वापरून शेजाऱ्यांच्या घरातून थेट जायचं!

 

संपूर्ण गावही उंच तटबंदीने वेढलेलं असणार. मात्र ही तटबंदी वायव्येकडील वाळवंटावरून वाहत येणाऱ्या वावधुळीपासून गावाचं संरक्षण करण्याकरिता बांधलेली असावी. कारण ह्या प्रदेशात ज्यांच्यापासून संरक्षणाची गरज भासावी असे कुठलेही हिंस्र प्राणी कधीच नव्हते.

 







एकूणच टुलोरचं स्थापत्य आणि बांधकामाचं तंत्र (मातीच्या विटा आणि घुमट (Self-Supporting vaults)) पाहून एक अंदाज असा आहे की बोलिव्हियातील ओरुरो विभागातील वांकारानी टोळ्या सुमारे ख्रिस्तपूर्व ५ - ६व्या शतकात टुलोर येथे स्थलांतरीत झाल्या असाव्या. कारण त्यांच्याही घरं /गावांची रचना टुलोरशी मिळतीजुळती होती - आजही ओरुरो प्रांतात ग्रामीण भागात अश्या प्रकारची घरं दिसतात.

टुलोर मध्ये साधारण ख्रिस्तपूर्व ४०० ते ख्रिस्तोत्तर २०० वर्षांपर्यंत वस्ती असावी असं आजपर्यंत मिळालेल्या अवशेषांवरून वाटतं. पण त्यावरून ह्या समाजाबद्दल - त्यांच्या चालीरीती, तंत्रज्ञान, धर्मविचार, राजकीय संस्था अश्या कुठलीही बाबतीत नक्की अनुमान काढता येत नाही. उत्तम दर्जाच्या कुंभारकामाचे नमुने ह्या अवशेषांत मिळाले आहेत (पहा पाचवा फोटो), तसंच दगडांपासून बनविलेली अवजारं - धान्य दळायची जाती, जमीन खणायची फावडी, सुऱ्या इत्यादी जरी मिळाली असली तरी धातूच्या वस्तू बनविण्याची कला त्यांना कितपत अवगत होती ते नक्की सांगता येत नाही. मिळालेल्या काही थडग्यातील अवशेषांवरून मुद्दाम कृत्रिम रित्या (उदाहरणार्थ, डोक्याच्या दोन्ही बाजूला कायम घट्ट फळ्या बांधून) डोक्याच्या कवटीचा आकार निमुळता बनवण्याची पद्धत प्रचलित होती असं दिसतं. मात्र ह्या मागे काही धार्मिक कारण होतं की काही सौन्दर्य विचार होता (जसं ब्रह्मदेशातील काही आदिवासी समाजात स्त्रियांची मान मुद्दाम धातूच्या कड्या लहानपणापासून घालून लांब केली जात असे) ते सांगता येत नाही. 

येथे सापडलेल्या वस्तू (उदाहरणार्थ ऑब्सिडीयन किंवा मॅलाकाइट सारख्या ह्या परिसरात न मिळणाऱ्या दगडांच्या वस्तू, धातूची अवजारे, टुलोरच्या कुंभारकामा पेक्षा वेगळे तंत्र वापरून केल्यासारखी वाटणारी भांडी इ.) पाहून येथील उत्खनन करणाऱ्या शात्रज्ञांच्या मते टुलोरकरांचा व्यापारी/सामाजिक संबंध चिलेचा समुद्रकिनारा, बोलिव्हियातील पठारं किंवा अँडीज पर्वतराजी पलीकडला आजचा अर्जेन्टिना अशा दूर दूर च्या समाजांशी असला पाहिजे.

साधारण ख्रिस्तोत्तर २०० च्या सुमारास  सान पेद्रो नदीचा मार्ग झपाट्याने बदलत गेला आणि त्यामुळे येथे पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होऊन, तसंच वायव्येला पूर्वीपासूनच असलेल्या वाळवंटाचं आक्रमण वाढून हा सारा परिसर बहुधा शेतीला आणि म्हणून मनुष्य वस्तीला निकामी झाला असावा. प्रचलित समजुतीनुसार येथील समाज येथून परागंदा होऊन दुसरी कडे स्थायिक झाला आणि आजचा अटाकामेनो समाज हे त्यांचेच वंशज आहेत. 

मात्र १९५६ साली रेव्ह. गस्टावो ल पेज ह्या पुरातत्वशास्त्रज्ञाने टुलोरचे अवशेष शोधून काढेपर्यंत, ह्या पूर्वसूरींची स्मृती पूर्णपणे पुसून गेली होती!

प्रत्यक्ष भेटीत स्थानिकांकडून जे मी ऐकलं त्याला पूरक म्हणून ज्या दोन शोधनिबंधांचा मी मुख्यतः आधार हे लिहिण्यासाठी घेतला त्यांच्या  links खाली दिल्या आहेत. त्यातील पहिला स्पॅनिश भाषेत असल्यामुळे वाचण्या आधी तुम्हाला Google Translate च्या मदतीने त्याचं इंग्रजीत भाषांतर करून घ्यावं लागेल.

1. http://www.chungara.cl/Vols/1986/Vol16-17/Tulor_posibilidades_y_limitaciones_de_un_ecosistema.pdf

2.   http://www.chungara.cl/Vols/2010/Vol42-2/02-NUNEZ-CHUNGARA-42-2.pdf

 

विसरलेले समाज - १ : नाझका 

आजलुप्त झालेले प्राचीन समाज किंवा संस्कृती”, असं म्हटल्यावर चटकन डोळ्यापुढे ३-४ ठराविक नावं येतात - हराप्पा, धोलावीरा इ. भोवतालची सिंधू संस्कृती किंवा प्राचीन इजिप्त अथवा मेसोपोटेमिया (सुमेर, बाबिलॉन इ.). मी मुद्दामच ह्या यादीत भारतीय आणि चिनी संस्कृतीचं नाव घेतलं नाही कारण जरी दोन्ही प्राचीन असल्या आणि त्यांच्या स्वरूपात काळाच्या ओघात जमीन-अस्मानाचा बदल झाला असला तरी दोन्ही संस्कृती अजून जिवंतच आहेत. 

 माझ्या दुनियाभराच्या भटकंतीत, अनेक, तुलनेने अप्रसिद्ध अश्या प्राचीन समाजांचे चकित करणारे अवशेष सामोरे आले. त्यातील काही समाज उगम-समृद्धी-विनाश अश्या नैसर्गिक चक्रात लुप्त झाले असतील, तर काही एखाद्या दुर्दैवी उत्पातात उध्वस्त झाले असतील. परंतु अगदी आधुनिक काळापर्यंत, ते संपूर्णपणे विस्मृतीच्या पडद्याआड गेले होते आणि गेल्या केवळ एक-दोन शतकांमध्येच पुरातत्वशास्त्रज्ञांच्या प्रयासांमुळे पुन्हा एकदा ते जगासमोर आले. आजही त्यांच्याबद्दल सांगोपांग माहिती मिळाली आहे असं नाही. त्यांनी मागे ठेवलेल्या अवशेषांवरून ते समाज आणि त्यांचे सभासद कसे दिसत असतील, कसे राहत असतील, काय भाषा बोलत असतील, त्यांची समाजव्यवस्था आणि राजकीय यंत्रणा कशी असेल, धार्मिक आचार-विचार काय असतील ह्याबद्दल फक्त कल्पनाच आपण करू शकतो. 

 ह्या मालिकेतल्या पहिल्या लेखात आपण जाणार आहोत पेरू मध्ये नाझका शहराजवळील वैराण प्रदेशात. नाझका आज जगप्रसिद्ध आहे ते १५००-२००० वर्षांपूर्वी त्यांनी रेखाटलेल्या कातळ-चित्रांसाठी. वाळवंटात मैलोन्मैल पसरलेल्या चित्रांतील काही तर इतकी विस्तृत आहेत की त्यांची पूर्ण कल्पना फक्त विमानात बसून १००० फूट उंचावर गेल्यावरच येउ शकते. पहा पहिले दोन फोटो. मात्र ही कातळ-चित्रं आश्चर्याने तोंडात बोट घालायला लावणारी असली तरी, ज्या समाजाची ती मागे राहिलेली खूण आहे त्यांच्या बद्दल उपलब्ध माहिती आजही फारच तुटपुंजी आहे. 

 



हा नाझका समाज बहरला पेरूतील आजच्या पराकास आणि नाझका ह्या शहरांमधील वैराण भागात (पहा तिसरा फोटो - नाझका नदीच्या खोऱ्याचा) ख्रिस्तपूर्व १००-२०० ते ख्रिस्तोत्तर ७००-८०० ह्या सुमारे आठ-नऊ शतकांमध्ये. त्याच्या सामाजिक/सांस्कृतिक वैशिष्ठ्यांबद्दल आज आपण फक्त थोडाफार अंदाजच करु शकतो - त्यांची अजून अस्तित्वात राहिलेली भांडी-कुंडी, कापड-चोपड, कबरस्थानं आणि अर्थातच कातळ-चित्रं ह्यांवरून. 

त्यांनी स्वतः बद्दल एक अक्षरही लिहून ठेवलेलं नाही. किंबहुना त्यांना कुठल्याही स्वरूपात लेखन कला अवगत होती असं वाटत नाही. 

 पण उपलब्ध अवशेषांवरून असं दिसतं कि ह्या समाजाची दोन प्रमुख केंद्रं होती. काहुआची (Cahuachi) हे अध्यात्मिक केंद्र तर व्हेंटीया (Ventilla) हे नागरी व्यवहाराचं केंद्र. अर्थात व्हेंटीया जरी नागरी केंद्र असलं तरी ते राजकीय सत्ता-केंद्रही होतं असं मात्र ठामपणे म्हणता येणार नाही. कारण नाझका नदीचं  खोरं, पिस्को खोरं आणि अकारी खोरं ह्या विभागात पसरलेला हा समाज जरी एकाच सामायिक संस्कृतीने बांधला गेला असला तरी तो अनेक स्थानिक नेते आणि त्यांचे अनुयायी ह्यामध्ये राजकीय दृष्ट्या विखुरलेला असावा.  

निर्जल वाळवंटी प्रदेशात वसलेला असल्यामुळे पाणी आणि शेती उत्पादन हा त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता. काहुआची हे त्यांचं धार्मिक उत्सव साजरे करण्याचं प्रमुख तीर्थस्थान बनण्याचं कारणही  तिथे असलेलं पाण्याचं वैपुल्य हेच असावं. काहुआचीच्या परिसरात (सुमारे २५०० एकर क्षेत्रात) आढळलेले ४०-४५ ढिगारे त्यामध्ये मिळालेल्या अवशेषांवरून जेथे धार्मिक कर्मकांडं केली जात अश्या देवळांस्वरूप असावेत. आणि एकूणच काहुआचीची व्याप्ती आणि नाझकांच्या अंदाजी लोकसंख्येची तुलना केली असता, बहुसंख्य नागरिक दूर दूरच्या वस्त्यांवरूनही काहुआचीला दर वर्षी सुगीच्या हंगामात धार्मिक उत्सव साजरा करण्यासाठी येत असावेत असं म्हणता येईल. 


नक्की ह्या उत्सवाचं स्वरूप काय होतं ते जरी सांगता येत नसलं तरी भांड्या-कुंड्यावर रेखाटलेल्या चित्रांवरून निसर्गपूजा त्यांच्या धार्मिक विचार आणि विधींच्या केंद्रस्थानी असावी. देवतांना बळी प्रदान करण्याची प्रथाही प्रचलित असावी - फक्त लामा किंवा गिनिपिग सारखे प्राणीच नव्हे तर माणसे सुद्धा.  पहा चौथा फोटोनाझका अवशेषांमध्ये मिळालेल्या एका भित्ती-चित्राचा. इतकंच नव्हे तर मानवी कवट्यांच्या माळा त्यांच्या देवतांना वाहायची पद्धत होती असंही म्हणायला जागा आहे.  कारण उत्खननात सापडलेल्या भांडयावरच्या चित्रात तसे देखावे आहेत. आणि अनेक पूजास्थानी कपाळावर मध्यभागी भोकं पाडलेल्या कवट्या आणि कित्येक थडग्यांमध्ये शिरविरहित प्रेतंही पुरलेली आढळली आहेत. 

असो. त्याच्या प्रसिद्ध कातळ-चित्रांखेरीज आणखी तीन गोष्टी चकित करणाऱ्या आहेत. 



एक - पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या प्रदेशात जमिनीखालील खोलवरच्या झऱ्यांचं पाणी दूर पर्यंत खेळविण्यासाठी केलेली कालव्यांची यंत्रणा. त्यांचा कालखंड लक्ष्यात घेता ह्या यंत्रणेची संकल्पनारचनाव्याप्ती आणि कार्यक्षमता आश्चर्य वाटावी अशी आहे. 

दोन - त्यांची विणकामातील प्रगल्भता. कापूसलोकरपक्षांची पिसं अश्या विविध गोष्टी वापरून केलेली विस्तृत आकाराची कापडंशवाच्छादनेअंगरखे इत्यादी आणि त्यावरील  ६ ते १० रंगात  विणून किंवा भरतकाम करून चितारलेली गुंतागुंतीची चित्रं आणि आकृतिबंधत्यांच्या कलाकौशल्याची साक्ष आहेत. पहा पाचवा फोटो - थडग्यातील शवावर पांघरलेल्या चादरीचा. 



तीन - पॉटरी : रोजच्या वापरातील आणि धार्मिक कर्मकांडात वापरण्याची मातीची भांडी. मातीची भांडी रंगीत चित्रांनी सजवायची सोपी पद्धत म्हणजेभांडं भट्टीत भाजून काढल्यावरत्या वर चित्रे रेखाटणे. मात्र कच्च्या मातीच्या भांड्यावर प्रथम विविध रंगी (१२ ते १४ वेगवेगळे रंग) चित्रं रेखाटायची. नंतर ती भट्टीत भाजून काढायची. ह्या भाजण्याच्या प्रक्रियेत ती चित्रं आणि त्यांचे रंग नुसते अबाधितच ठेवायचे नाही तर त्यांना अधिक झिलई आणायचीही उच्च दर्जाची कलाही त्यांनी विकसित केली होती. पहा सहावा आणि सातवा फोटो.   

 


नाझकांच्या ह्या  अवशेषांत सर्वात वादग्रस्त गोष्ट आहे अर्थातच त्यांची कातळ-चित्रं!  नाझका वाळवंटाचा  पृष्ठभाग दोन थरांत आहे. एका अरुंद (५० ते १०० से.मी. रुंद) रेषेत जर सर्वात वरच्या थरातले लाल खडे काढून टाकले, तर त्या खालील थरातील फिक्या पिवळट रंगाच्या माती-वाळूमुळे नजरेत भरणारी रेषा आपोआप तयार होते. नाझका लाईन्स नावाने प्रसिद्ध झालेली ही चित्रं हेच साधं तंत्र वापरून चितारण्यात आली आहेत. आणि ती इथे पाऊस जवळजवळ पडतच नसल्यामुळे आज १५०० वर्षांनंतरही मूळ स्वरूपात पाहायला मिळतात. त्यातील काही चित्रं एव्हढी प्रचन्ड आहेत की जमिनीवर उभं राहून ते संपूर्ण चित्रं काय असेल ह्याचा अंदाज करता येत नाही. उदाहरणार्थ वरील फोटोंपैकी Condor पक्ष्याचं चित्र १३० मी (४२५ फूट) लांब आणि ११५ मी. (३७५ फूट) रुंद आहे! 

ते पूर्णपणे पाहण्यासाठी जमिनीपासून ८००-१००० फूट उंचीवर जावं लागतं. त्यामुळेच ह्या चित्रांभोवती अनेक अतिरंजित कथा रचल्या गेल्या. वास्तव हे आहे की ही चित्रं नक्की का काढली गेली ह्या बद्दल काहीही ठोस पुरावा आज तरी उपलब्ध नाही. परंतु नाझकांच्या धर्माशी त्यांचा संबंध असावा असं म्हणायला जागा आहे. एक तर त्यांच्या निसर्गपूजेत वापरल्या जाणाऱ्या अनेक आकृती येथे दिसतात. उदाहरणार्थ Condor पक्षी किंवा देवमासा. दुसरं म्हणजे ह्यातील कित्येक आकृतींच्या आजूबाजूला काहुआची सारख्या जागी धार्मिक विधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांड्यांचे अवशेषही सापडले आहेत. 

मी पराकास, नाझका भागला भेट दिली २०१९ च्या मे महिन्यात. जाण्याआधी तेथे कातळ-चित्रांखेरीज इतर काही पाहण्या-अनुभवण्यासारखं असेल ह्याची मला अजिबात कल्पना नव्हती. माझे डोळे उघडले प्रथम लिमा (पेरू देशाची राजधानी) येथील लार्को म्युझियम पाहिल्यावर. लार्को म्युझियममध्ये नाझकांसहित पेरूतील अनेक प्राचीन संस्कृतींचे अवशेष - पॉटरी, कापडं, चित्रं, पुतळे, दागिने बघायला मिळतात, त्यातून प्रतीत होणारी प्राचीन कला, तंत्रज्ञान आणि समाज-जीवन आश्चर्याने थक्क करणार आहे. 

ह्या लेखात नाझकांच्या सर्वच वैशिष्ठ्यांचं तपशीलवार वर्णन करणं शक्य नाही. परंतु त्यांच्याबद्दल अधिक माहिती करून घ्यायची असेल तर - ज्या तीन निबंधांचा मी ह्या लेखासाठी मुख्यतः आधार घेतला, त्यांच्या online links खाली दिल्या आहेत. 

मात्र जाताजाता नाझकांचं एक वैशिष्ठ्य सांगितल्या शिवाय राहवत नाही. आपल्या पर्यावरणाचा आपल्याच हाताने विनाश करून उध्वस्त झालेला इतिहासाला माहीत असलेला हा सर्वात जुना समाज असेल. उपलब्ध खुणांवरून असं वाटतं की जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणण्यासाठी त्यांनी ह्या प्रदेशात सर्वत्र पसरलेल्या हुरांगो (Huarango - Prosopis pallida) झुडूपांच्या अरण्याचा नाश केला. त्यामुळे आठव्या शतकात अकस्मात (El Nino ह्या वातावरणातील बदलांमुळे) जेंव्हा अतिवृष्टी आणि पूर आले तेंव्हा ह्या अरण्याअभावी नाझकांच्या संपूर्ण प्रदेशाची धूप होऊन वाताहत झाली. आणि हा संपूर्ण समाजच पुढच्या काही दशकांत कोलमडला. 

अर्थात इतिहासात अशी पर्यावरणाच्या विनाशाची अनेक उदाहरणं असली तरी आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहता, त्यावरून आपण काही शिकलो असं काही म्हणता येणार नाही! 

संदर्भ: 

 https://people.umass.edu/proulx/online_pubs/Nasca_Overview_Zurich.pdf

https://people.umass.edu/proulx/online_pubs/Nasca_Headhunting_Zurich.pdf

https://people.umass.edu/proulx/online_pubs/Nasca_Ceramic_Iconography_Overview.pdf

  विसरलेले समाज - २ : टुलोर   चिले देशातील अटाकामा असा प्रदेश आहे जिथे अनेक ठिकाणी गेल्या ५०० वर्षात पाऊसच पडलेला नाही. आणि जेथे पडतो तेथे...