Wednesday, 7 December 2022

सायबेरियाची राजकन्या

मी मंगोलियाला जाण्याचं मुख्य कारण होतं मला उलानबाटर मध्ये आगगाडी पकडायची होती सायबेरियाला जायला. सायबेरियापासून पश्चिमेला मॉस्को आणि पुढे सेंट पिटर्सबर्ग पर्यंतच्या ह्या  प्रवासातील काही अनुभवांबद्दल (बुर्यातीया, तातरस्तान) मी आधीच लिहिलेलं कदाचित तुमच्या स्मरणात असेल. हा लेख आहे मुख्यतः इर्कुतस्क ह्या सायबेरियाच्या प्रमुख शहरातील एका असामान्य घरातील एका अविस्मरणीय अनुभवाबद्दल.

रशियन साम्राज्याने सायबेरियाची भूमी पादाक्रांत करायला सुरुवात केली सोळाव्या शतकाच्या शेवटी. पॅसिफिक महासागरापर्यंतचा हा अफाट प्रदेश रशियन साम्राज्याला जोडला गेल्यावर तिथे नांदणाऱ्या तातर, बुरयात, ओस्त्याक अशा मूळ रहिवाशांवर जरब बसविण्यासाठी ह्या जिंकलेल्या प्रदेशात ठिकठिकाणी सैन्याची ठाणी उभारली गेली. १७व्या शतकाच्या मध्यावर, अंगारा नदीच्या किनाऱ्यावर याकोव्ह पोखाबोव्ह नावाच्या रशियन अधिकाऱ्याने बांधलेला इर्कुतस्कचा किल्ला हे त्यातील एक प्रमुख ठाणं. पहिला फोटो - पोखाबोव्हच्या आजच्या इर्कुतस्कमधील स्मारकाचा.


तत्कालीन रशियाच्या राजवटीला करांच्या रूपाने लूट करण्यावाचून सायबेरियाशी इतर काही देणं-घेणं नव्हतं. त्यामुळे इर्कुतस्कच्या स्थापनेचा मूळ उद्देशही स्थानिक जनतेला करवसुली साठी पिळून काढणं, आणि ह्या जुलुमजबरदस्तीला विरोध करणाऱ्यांना तुरुंगात खितपत ठेवणं असा होता. त्यामुळे कायमस्वरूपी  सैनिकी ठाणं बांधण्याआधीच पाहिलं पक्कं बांधकाम अंगारा नदीतील इर्कुत बेटावर केलं गेलं ते एका तुरुंगाचं! 


पुढील कित्येक शतकं (अगदी कम्युनिस्ट राजवटीच्या अखेर पर्यंत) राज्यकर्त्यांच्या नावडत्या व्यक्तीना सक्तमजुरीत पिचत ठेवण्याची जागा म्हणून पूर्व सायबेरियाची जी दुष्कीर्ती (ज्याचं विदारक वर्णन सोल्झेनित्सेनच्या “गुलाग आर्चिपेलागो” सारख्या पुस्तकात सापडतं) झाली त्याची सुरुवातच एका दृष्टीने इर्कुतस्कच्या स्थापने पासून झाली असं म्हणता येईल. 


“तडीपार कैद्यांची काळ-कोठडी” अशी सुरुवात झालेल्या ह्या नगरीची “पूर्वेकडचे पॅरिस” असे परिवर्तन होण्याला  सुरुवात झाली १९व्या शतकाच्या सुरुवातीला. 


फ्रेंच राज्यक्रांतीने प्रभावित होऊन एक नवा उदारमतवाद त्याकाळी रशियामध्ये पसरू लागला  होता. तत्कालीन झार अलेक्झांडरचे निकटवर्ती नातेवाईक आणि  उमरावच ह्या नव्या मनूचा प्रसार करणाऱ्यांचे अग्रणी होते. त्यांनी “Union of Salvation” (मुक्ती संघ) नावाची  संघटनाही स्थापन केली होती. परंतु अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर नव्या राजवटीत पारंपरिक एकाधिकारशाहीच पुढे चालणार, असं दिसल्यावर १८२५च्या डिसेंबर महिन्यात ह्या मुक्ती संघाच्या पुढाऱ्यांनी नव्या झारच्या विरुद्ध बंड पुकारलं. परंतु निव्वळ ध्येयवाद क्रांती घडवायला पुरेसा नसतो. झार निकोलसने मुक्ती संघटनेच्या अनुयायांची कत्तल करून त्यांच्या पुढाऱ्यांना सायबेरियात सक्त मजुरीसाठी पाठवून दिलं. त्यातील एक होता प्रिन्स सर्गी वोल्कोन्स्की - राजघराण्याचा जवळचा आप्त. त्याची पत्नी मारिया ही सुद्धा रशियाच्या सर्वात मानांकित सेनाधिपती राएवस्कीची मुलगी. ह्या फसलेल्या बंडाळीच्या केवळ एकच वर्ष आधी त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना एक तान्हा मुलगाही होता. 


एकवेळ थडग्यात पुरलेली व्यक्ती पुन्हा जीवंत होऊन वर आली असती पण एकदा सायबेरियात तडीपार झालेला मनुष्य धडधाकट परतून आलेला कोणी पहिला नव्हता. तिकडे सर्गी इर्कुतस्कच्याही पूर्वेला चिता छावणी मध्ये चाबकाच्या फटक्याखाली दगड फोडत होता, आणि इकडे सेंट पिटर्सबर्गमध्ये मारिया झार निकोलस बरोबर झगडत होती, निदान स्वतःला तरी सायबेरियाला जाऊन नवऱ्याला भेटण्याची परवानगी मिळविण्यासाठी. त्यासाठी तिने सर्व वाडवडिलार्जित संपत्ती आणि बिरुदांचा त्याग केला. शेवटी आपल्या बाळालाही बरोबर न नेण्याच्या अटीवर तिला इर्कुतस्कला जाण्याची परवानगी मिळाली. 


एकटी, जवळ एक पैसाही नाही, वाटेत कोणीही तिला मदत करू नये असा सरकारी फतवा असताना, तिने हा ५७०० कि.मी. चा खडतर प्रवास कसा केला ह्याचं हृदयद्रावक वर्णन “Princess of Siberia” ह्या पुस्तकात तुम्हाला सापडेल. 


काय होतं सायबेरियात त्या काळात? जीवन-मरणाच्या सीमेवर कसं तरी जगणाच्या प्रयत्नात हरणाऱ्या कंगाल शेतकऱ्यांची वस्ती, अष्मयुगीन किंवा कदाचित एखादंच पाऊल पुढे अशी, कुठल्याही प्रकारे संस्कृतिचा स्पर्शही नसलेली जीवनशैली, अनन्वित छळ सोसणाऱ्या कैद्यांच्या वसाहती. मारियाने पुढच्या २६ वर्षांत ह्या अंधकारात जगताना “संस्कृती” सायबेरियात आणली. ज्यांना “शिक्षण” म्हणजे काय हे माहित सुद्धा नव्हतं त्यांच्या साठी शिक्षण आणलं. स्थानिक प्रशासनाबरोबर सतत झगडून, टीचभर अंधारकोठडीत खिचपत पडलेल्या कैद्यांना स्वतःच्या झोपड्या बांधून मोकळ्या आकाशाखाली राहण्याची सवलत मिळविली. तिने आपलं “प्रिन्सेस” हे अधिकृत बिरुद सेंट पीटर्सबर्ग मधेच सोडून दिलं होतं पण स्थानिक जनतेने उत्स्फूर्तपणे तिला Princess of Siberia म्हणायला सुरुवात केली. पण सर्वात महत्वाचं म्हणजे तिने ह्या वैराण प्रदेशात संगीत आणलं. सर्गी आणि मारियाला जेंव्हा स्वतःच घर बांधायची परवानगी मिळाली, तेंव्हा तिचं घर गायक, वादक, संगीतकारांचं पूर्वेकडील केंद्रस्थान बनलं. इर्कुतस्कच्या सांस्कृतिक परिवर्तनाची सुरुवात इथूनच झाली.



मारियाच्या ह्या घराचा आज म्युझियम झाला आहे. आणि नियमितपणे संगीताच्या मेहफिली घरात सादर करण्याची मारियाने सुरु केलेली प्रथा १०० वर्षांनंतरही आजतागायत तिथे अव्याहत चालू आहे. तिथे बसून पाश्चिमात्य शास्त्रीय संगीताचा जलसा ऐकणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. ह्या साध्यासुध्या घराच्या (दुसरा फोटो) बाजूने तुम्ही गेलात तर तुम्ही पुन्हा वळूनसुद्धा त्याच्याकडे  पाहणार नाही. 



तीन आठवड्यांच्या रशियाच्या प्रवासात मी अनेक भव्य, नेत्रदीपक  इमारती पहिल्या -


उदाहरणार्थ मॉस्कोतील सेंट बेसीलचं कॅथीड्रल(तिसरा फोटो),


कझान मधील “मंगल कार्यालय” जिथे १०० लग्न समारंभ एकाच वेळी होऊ शकतात (चौथा फोटो),



मॉस्को युनिव्हर्सिटी (पाचवा फोटो), 


सेंट पीटर्सबर्ग मधील चर्च ऑफ द सेव्हियर (सहावा फोटो) आणि अगणित कितीतरी.
















पण मारियाच्या ह्या साध्या घराएव्हढं महत्वाचं आणि हृदयाला भिडणारं त्यात काहीच नव्हतं.

चेंगीज खानाचा देश

शाळेत बहुदा सहावी-सातवीत असताना इतिहासाच्या पुस्तकात चेंगीज खान आणि त्याच्या साम्राज्याची थोडीशी माहिती वाचनात आली होती. त्यात नक्की काय शब्द वापरले होते आणि काय वर्णन होतं ते काही आठवत नाही. पण ते वाचून मनात ठसलेलं चित्रं मात्र होतं, वाटेत येईल ते बेचिराख करत विद्युतवेगाने पुढे जाणाऱ्या टोळधाडीचं! एकूणच सुरुवातीला जे काही वाचनात आलं त्यात चेंगीज खानाची प्रतिमा ही क्रूरकर्मा, लुटारु सैन्याचा रक्तपिपासू अधिपती अशीच रंगविलेली होती. अगदी चंगेझ खान ह्या १९५७ सालच्या हिंदी सिनेमात शेख मुख्तारने रंगविलेल्या किंवा १९६५ सालच्या हॉलिवूड च्या Genghis Khan ह्या सिनेमात ओमार शरिफने साकारलेल्या चेंगीज खानाचं व्यक्तिमत्वही ह्या प्रतिमेला सुसंगत असंच होतं.

पाच-सहा वर्षांपूर्वी जेंव्हा मी मंगोलियाला जायचा बेत केला, तेंव्हा जिथे जाणार त्याबद्दल काहीतरी थोडीफार माहिती असलेली बरी म्हणून मंगोलियाच्या इतिहासाची तोंड ओळख करून घ्यायला जरा सुरुवात केली. आणि आश्चर्याचे अनेक धक्के मला बसू लागले. चेंगीज खानाची निव्वळ “विध्वंसक” अशी प्रतिमा थोडी त्याच्यावर अन्याय करणारी आहे असं वाटू लागलं. त्याने पूर्वेच्या तांगुट आणि जिन साम्राज्यांपासून पश्चिमेला पोलंड पर्यंतची राज्यें  एकामागून एक उद्ध्वस्त केली हे तर खरंच, पण त्याचबरोबर मानवी इतिहासातील आज पर्यंतचं सर्वात मोठं “एकसंध” साम्राज्य त्याजागी निर्माण केलं हे ही तितकंच खरं (एकोणिसाव्या शतकातील ब्रिटिश साम्राज्याचं एकूण क्षेत्रफळ जरी चेंगीज खानाच्या साम्राज्य पेक्षा जास्त असलं तरी, त्याचा भूभाग अनेक तुकड्यात विभागलेला होता). एका बाजूने त्याच्या लष्करी मोहिमांमध्ये हजारो/लाखो लोकं मारले गेले हे खरंच. पण त्याच बरोबर ज्या राजे-रजवाड्यांना त्याने कंठस्नान घातलं तेही काही गंगेचं पाणी पिऊन राज्य करणारे नव्हते. त्यामुळे कारा खिताई (Qara Khitai - सध्याच्या चीनच्या पश्चिमेचा प्रदेश) साम्राज्याचा जेंव्हा चेंगीज खानाच्या “निष्ठूर” सैन्याने पाडाव केला तेंव्हा तेथील उघूर (Uyghur) ह्या बौद्ध जमातीने त्यांचं आपले तारणहार म्हणूनच स्वागत केलं हे ही तितकंच खरं! 

परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे हे मंगोल साम्राज्य आश्चर्य वाटावं एव्हढं उदारमतवादी, सर्वसमावेशक तत्वांवर आधारित होतं. संपूर्ण साम्रज्यात सामान नागरी आणि लष्करी कायदा निश्चित करणारी प्रणाली चेंगीज खानाने निर्माण केली (“यासा” नावाची). धर्म, वंश, कुटुंब/जमात अश्या  बाबींना राज्य-शकटात स्थान नव्हतं. कोणालाही (अगदी नव्याने जिंकलेल्या पूर्वीच्या शत्रू-राज्यातील नागरिकांना सुद्धा) स्वतःच्या निव्वळ अंगभूत गुणांच्या बळावर राज्य-प्रशासनात सर्वोच्च पदापर्यंत पोचणं शक्य होतं. शिक्षक आणि वैद्य अशा व्यावसायिकांना खास कर सवलती दिल्या जात. चेंगीज खान स्वतः “तेंगरिझम” ह्या प्राचीन, मूलतः  निसर्गपूजक धर्माचा अनुयायी होता (“खान” ही मंगोलियन “पदवी” होती. त्याचा कुठल्याही धर्माशी संबंध नव्हता) पण त्याच्या मंगोल साम्राज्यासारखं सर्वार्थाने धर्मनिरपेक्ष राज्य त्याच्या आधी (आणि कदाचित अगदी आजपर्यंत सुद्धा) प्रस्थापित झालेलं आपल्याला इतिहासात दिसत  नाही. 



पण तरीसुद्धा पूर्वीपासून मनात ठसलेली चेंगीज खानाची “कर्दनकाळ” ही प्रतिमा पूर्णपणे पुसली नव्हती. त्यामुळे उलानबाटरला (मंगोलियाची राजधानी) पोचल्यावर जिकडे तिकडे चेंगीज खानाची स्मारकं (अगदी शहराशेजारच्या टेकडीवर सुद्धा टेकडीचा दर्शनी भाग पूर्ण भरेल एव्हढ्या मोठ्या  चेंगीझखानाच्या चेहेऱ्यासकट - दुसरा फोटो) दिसल्यावर सुरुवातीला आश्चर्याचे धक्के बसलेच. जसजसा  स्थानिक लोकांशी संवाद झाला तसतसं चेंगीज खानाचं मंगोलियन जनमानसातील महत्वही लक्षात येऊ लागलं.


उलानबाटरमधील सर्वात भव्य आणि लक्षवेधक इमारत आहे चेंगीज खानाचं स्मारक - मध्यभागी चेंगीज खान स्वतः, एकीकडे ओगदेई खान हा त्याचा मुलगा आणि दुसरी कडे कुब्लाई खान हा नातू. ही इमारत म्हणजे मंगोलियाची  संसद, राष्ट्रपतींचं कार्यालय, मंत्रालय वगैरे असलेल्या गव्हर्नमेंट हाऊस चा दर्शनी भाग (पहिला आणि तिसरा फोटो). 


कुब्लाई खानाच्या मृत्यू नंतर मात्र मंगोलियाच्या नशिबी ते पूर्वीचे वैभवाचे दिवस कधीच आले नाही. पुढील अनेक शतके आधी सतत चालणारी यादवी युद्धं, चीनच्या चिंग साम्राज्याने मंगोलिया जिंकून केलेली दडपशाही, स्टालिनच्या काळात सोविएत रशियाने केलेल्या कत्तली, अश्या घडामॊडीत मंगोलिया सतत चिरडला गेला. आधुनिक काळातील मंगोलियाच्या सर्वात मोठा वीरपुरुष म्हणजे सुखबाटर (चौथा फोटो त्याच्या स्मारकाचा).


त्याने विखुरलेल्या मंगोलियन टोळ्यांची एकजुट करून सोविएत रशियाच्या मदतीने, चिनी सत्तेचं जोखड मंगोलियाच्या मानगुटीवरून झुगारून दिलं. मात्र हा स्वातंत्र्याचा आनंद काही फार काळ टिकला नाही. रशियाचं  बाहुलं म्हणून प्रस्थापित झालेल्या  कम्युनिस्ट राजवटीत प्रजेवरील अत्याचार मागील पानावरुन पुढे चालूच राहिले ते १९९२ साली नवीन राज्यघटना आस्तित्वात येऊन १९९६ साली पहिलं खरंखुरं लोकशाही सरकार प्रस्थापित होई पर्यंत (ह्या दडपशाहीपासून मिळालेल्या मुक्तीचं अतिशय हृद्य स्मारकही चेंगीज खानाच्या स्मारकाजवळच आहे  - पाचवा  फोटो). 
  


आजच्या मंगोलियामध्ये त्यामुळे शतकानुशतके चालत आलेली भटक्या जमातींची जीवनशैली, श्रद्धाळू बौद्ध आचार-विचार आणि आधुनिक औद्योगिकरणामुळे समाजजीवनात होणारी परिवर्तने ह्यांचं जटिल मिश्रण पाहायला मिळतं.


अजूनही २५% जनता घोड्याच्या पाठीवर आपला संसार लादून भटकं जीवन जगते (सहावा फोटो - गीर नावाच्या तंबूंची अस्थायी छावणी).

उलानबटार मध्ये फिरताना अत्याधुनिक ऑफिस कॉम्प्लेक्सच्या आवाराला लागूनच चोजिन लामाचं शेकडो वर्ष जुनं देऊळ दिसतं (सातवा फोटो).

गानदानतेंगचिनलेनच्या भव्य बुद्धमंदिराबरोबच पारंपरिक निसर्गपूजक देवऋषींची पूजास्थळंही  पाहायला मिळतात (आठवा फोटो).

मंगोलियाच्या आठवणी अनेक आहेत मात्र शब्द मर्यादेमुळे बाकी सर्व पुन्हा कधीतरी.


सिलोलीची अद्भुत दुनिया - २


मागच्या अंकात उल्लेख केलेल्या लगुना होंडाचे फोटो (पहा मागील भागातील शेवटचा फोटो) काढून होईपर्यंत सूर्य पश्चिमेकडील माऊंट अरारालच्या (१९००० फूट) उंच शिखराच्या मागे जाऊ लागला. आधीच आम्ही समुद्र सपाटीपासून जवळ जवळ १४००० फुटांवर असल्यामुळे थंडी वाजतच होती. त्यात थोडीशी उब देणाऱ्या किरणांनी पळ काढायला सुरुवात केल्यावर थंडीने नाकाचा शेंडा आणि कानांच्या पाळ्यांचे लचके काढायला सुरुवात केली. त्यामुळे आम्ही माउंट ट्रेस पुंतास (मराठीत त्रिशूल) हे उत्तुंग शिखर उजव्या बाजूला टाकून आमच्या रात्रीच्या निवाऱ्याच्या - टेका डेल देसीएर्तो (अक्षरशः वाळवंटातील आसरा) - दिशेने गाडी काढली.


डोकं टेकायला जागा होती, शेकोटीच्या बाजूला बसून पोटाला आधार द्यायला गरम सूप आणि रोस्ट चिकन होतं, रात्री बर्फ पडलाच तर डोक्यावर छत होतं. आणखी काय पाहिजे? रात्री बर्फ काही पडलं नाही पण रात्री शून्याखाली तपमान गेल्यामुळे थिजलेले दवबिंदूंचे स्फटिक सकाळच्या कोवळ्या उन्हात हिऱ्यांसारखे चमकत होते.

सकाळी आम्हाला पाहिलं ठिकाण गाठायचं होतं ते म्हणजे आर्बोल द पीद्रा (मराठीत अश्मवृक्ष). दगडाचं झाड?? प्रागैतिहासिक काळातील भौगर्भिक उत्पातांच्या ज्या खुणा अजूनही मागे राहिल्या आहेत त्यातीलच ही एक. झाडाच्या आकाराची १५-२० फूट उंचीची  शिळा! (पहिला आणि दुसरा फोटो. फोटोत उजवीकडे मागे सुप्त ज्वालामुखी कौवाना १८००० फूट).


पण नुसतं हे दगडाचं झाडंच नव्हे तर येथे संपूर्ण  पठारावर, मागील अंकात आपण पाहिलेल्या वॅले द रोकास सारखेच चित्रविचित्र आकारांत निसर्गानेच कातलेले प्रचंड कातळ पसरलेले होते. पण ह्या वैराण दिसणाऱ्या वाळवंटातही जीवन सुखरूप आहे ह्याचा पुरावा देणारा एक कुल्पेओ (लांडग्याचा मावसभाऊ) सुद्धा तेव्हढ्यात एका कातळामागून डोकावून गेला. ह्या सर्व दृश्याला पार्श्वभूमी होती सिलोली वाळवंटाच्या विलक्षण नारिंगी, तपकिरी रंगछटांची. मी माझ्या प्रवासांत अनेक वेगवेगळी वाळवंट पहिली - राजस्थानातील थर, आफ्रिकेतील सहारा, मंगोलियातील गोबी, अमेरिकेतील मोहेव, पण असे चमकदार रंग पाहिल्यानेच पाहत होतो. 

पण निसर्गाच्या रंगसंगतीचा एक वेगळाच चमत्कार आणखी तासाभरातच आम्हाला दिसणार होता, हे मात्र आमच्या गाईडने आम्हाला सांगितलं नव्हतं! “हा पहा लगूना कोलोराडा” एका टेकाडाला वळसा घालून पुढे गेल्यावर आमचा गाईड म्हणाला. “कोलोराडा”??? ह्या स्पॅनिश नावाप्रमाणे बघितलं तर समोरच्या विस्तीर्ण सरोवराचा रंग लाल, तांबडा असायला हवा होता. समोर तर डोळ्यांना सुखवणारी निळाई पसरलेली होती.

लाल रंगाचे ठिपके फक्त त्या पाण्यात फिरणाऱ्या फ्लेमिंगोच्या पंखांवर दिसत होते. “थांबा, थोडा धीर धरा, सूर्य अजून  पूर्ण वर आला नाही आहे” आमचा गाईड म्हणाला. आणि खरंच जसजसा सूर्य पलीकडच्या डोंगराआडून वर आला तसतसा एखादा प्रचंड कुंचला समोरच्या त्याहूनही प्रचंड कॅनव्हासवर फिरावा तसा सरोवराच्या पलीकडच्या काठापासून आमच्या समोरच्या पाण्यावर गुलाबी रंग पसरत आला आणि पाण्याची निळाई हळूहळू नाहीशी झाली. (पहा पुढचे दोन फोटो - पोचलो तेंव्हाचा आणि पाऊण तासानंतरचा).


आम्ही जर मध्यान्ह होई पर्यंत तिथे थांबलो असतो तर कुंकवा सारखा लाल रंगही दिसला असता. पण आम्हाला अनेक असे चमत्कार वाटेत पाहून संध्याकाळच्या आत चिले देशाची सीमा ओलांडणं जरूर होतं. 


आमचा पुढचा थांबा होता सोल द मन्याना (शब्दशः “उगवता सूर्य”). नरकात जाणाऱ्या पापात्म्यांना उकळत्या पाण्याच्या कुंडात किंवा गरम तेलाच्या कढईत बुडविण्याची शिक्षा अनंत कालपर्यंत दिली जाते असं म्हणतात. नरकाची ही कल्पना सोल द मन्याना सारख्या एखाद्या जागेवरूनच कोणालातरी सुचली असणार (पहा पाचवा फोटो).

कारण एका मोठ्या पठारावर इथे आहेत सर्वत्र पसरलेली उकळत्या पाण्याची उंच उडणारी कारंजी, तप्त गंधकाची डबकी, आत पडलात तर क्षणात हाडं सुद्धा विरघळून जातील अशी वाफेचे बुडबुडे येणारी दलदल. 


निदान इथल्या सर्व गोष्टींमध्ये काहीतरी सुसंगती होती - डबकी, झरे, कारंजी, दलदल, सर्वच जाळून/भाजून जीव घेणारी. पण आणखी थोडं पुढे गेल्यावर आलं सरोवर लगुना सलादा (मराठी मध्ये खारं सरोवर) आणि  तेर्मास द पोल्कस (शब्दशः मराठीत; गरम झरे) ही छोटी वस्ती (पहा सहावा फोटो).



एकाच सरोवराच्या एका कोपऱ्यात सुमारे ४५ ̊ सेल्शिअस म्हणजे अंगाला चांगले चटके बसतील इतकं गरम तर दुसऱ्या बाजूला बोट बुडवलं तर गोठून जाईल एव्हढं थंड पाणी. आम्ही एकीकडे  काठावर नखशिखांत गरम कपडे घालून थंडीपासून आपला बचाव करत होतो, तर त्या गरम पाण्याच्या भागात कोणीतरी दोघे नुसत्या चड्ड्या घालून पोहत होते! आम्हालाही त्यात एक डुबकी मारायला चाललं असतं पण दुपारी ३ वाजायच्या आत बोलिव्हियाची सीमा ओलांडून चिले मध्ये प्रवेश करणं जरूर होतं. कारण त्यानंतर चिलेची  इमिग्रेशनची चौकी बंद झाली असती आणि आम्हाला आणखी एक रात्र त्या वाळवंटात १४००० फुटांवरील रक्त गोठविणाऱ्या थंडीत कुडकुडत घालवावी लागली असती (शेवटी झालं तसंच, पण त्या गोंधळाची कथा पुन्हा कधीतरी). त्यामुळे लगुना सलादा वरून वाटेत लागणाऱ्या लगुना बियांका (मराठीत सफेद)



आणि लगुना व्हर्दे (हिरवे सरोवर) सारख्या अनोख्या रंगांच्या सरोवरांची शोभा बघण्यातसुद्धा फार वेळ ना घालवता  गाडी हितो काहोनच्या सीमेवरील वस्तीच्या दिशेने भरधाव सोडली. 


ह्यापूर्वी मी वाळवंट अनेक पहिली - थर, कछचं रण, सहारा, मंगोलियात तर उलानबतार ह्या राजधानीच्या ठिकाणी जाताना मी एक संपूर्ण दिवस प्रवास गोबी वाळवंटातून केला होता. ह्या सर्व ठिकाणांचा स्थायीभाव म्हणजे सर्वत्र असणारा एकसारखेपणा - कुठल्याही दिशेला पहा, तेच ते दृश्य, तेच वाळूचे ढिगारे, तोच एकरंगी रखरखाट. सिलोली वाळवंटासारखं वैविध्य, रंगांची उधळण (ह्या शेवटच्या फोटो मध्ये रंगांच्या किती छटा आहेत त्या मोजा), धूर ओकणाऱ्या जागृत ज्वालामुखी पासून डोळे निवविणाऱ्या निळ्या सरोवरांपर्यंत दिसणारे अनेक चमत्कार मात्र मी कधीच अनुभवले नव्हते. 


सिलोलीची अद्भुत दुनिया - १

बोलिव्हियातील उयुनीचे मिठाचे पठार ओलांडून तुम्ही जर दक्षिणेला चिले देशाच्या सीमेकडे जाऊ लागला तर थोड्याच काळात  सिलोली वाळवंटाच्या अद्भुत प्रदेशात जाऊन पोचता. पण पहिले काही मैल आजूबाजूचा खडकाळ, वैराण, शुष्क  प्रदेश, सान क्रिस्तोबल सारखी कळाहीन गावं,त्यातील धुळीत माखलेली घरं पाहून आपण हा उपद्व्याप का करतो आहोत असा प्रश्न आपल्यालाच पडतो. त्यातच हा संपूर्ण प्रदेश समुद्रसपाटीपासून जवळ जवळ ४५०० मीटर ( १४७०० फूट) उंचीवर असल्यामुळे बोचरी थंडी तुमचे लचके तोडत असतेच. 

आपल्याला निसर्गाचे काय काय चमत्कार सामोरे येणार आहेत ह्याची पहिली झलक दिसते सान क्रिस्तोबल मागे टाकल्यावर.  

कल्पना करा दोन्ही बाजूला १८-२० हजार फूट उंच शिखरं, त्यामधून वाहणारी रुंद नदी. पण नदीत पाण्याऐवजी उकळता लाव्हा वाहातो आहे - आणि एका क्षणी तो लाव्हा थंड होऊन गोठून गेला तर काय मागे राहील?


मागे राहील एक दगडांची नदी. व्हॅले द रोकास (मराठीत दगडांची दरी) अशीच एक थिजलेली दगडांची नदी आहे (पहिला फोटो).

काठावर उभं राहिलं तर असंच भासतं कि कुठल्याही क्षणी एक प्रचंड गडगडाट करून हा दगडांचा प्रवाह पुन्हा वाहू लागेल. ह्या “नदीच्या” पात्रात शतकानुशतकाच्या वादळवाऱ्यांनी घासून, तासून ह्या दगडांतून अकल्पनीय आकारांची शिल्पं निर्माण केली आहेत (दुसरा फोटो). 

सिलोली वाळवंटाचा सर्वच प्रदेश ज्वालामुखींच्या उद्रेकातून निर्माण झालेला आहे. आज आपल्याला माहित असलेल्या, जगातील सर्वात मोठ्या १० सुपर-व्होल्कॅनो पैकी ५ ह्या भागात (सिलोली, अटाकामा) आहेत. सुपर-व्होल्कॅनो म्हणजे असा ज्वालामुखी ज्यातून (जेंव्हा त्याचा स्फोट होईल तेंव्हा) १००० घन की.मी. पेक्षा जास्त घनफळाचे पदार्थ (लाव्हा,दगड,धूळ इत्यादी) फेकले जाऊ शकतात. सुपर-व्होल्कॅनोच्या स्फोटात संपूर्ण पृथ्वीचं वातावरण बदलून टाकण्याची किंवा संपूर्ण सजीव प्रजाती नामशेष करण्याची क्षमता असू शकते. अर्थात सुपर-व्होल्कॅनोचे स्फोट काही दररोज होत नाहीत. आमच्या प्रवासाचा मार्ग ज्या दोन सुपर-व्होल्कॅनोच्या क्षेत्राजवळून गेला (पास्तोस ग्रांदेस आणि सेरो ग्वाचा) त्यांचा शेवटचा उद्रेक सुमारे १७ लाख वर्षांपूर्वी झाला असावा. पण ह्या भूतकाळातल्या उलथापालथींच्या अनेक खुणा मात्र आजही आपल्याला दिसतात. व्हॅले द रोकास ही त्यातलीच एक. 


पण व्हॅले द रोकास मागे टाकून सिलोलीच्या ह्या निर्मनुष्य (तीन दिवसांच्या ह्या प्रवासात फक्त जेवायला आणि रात्र काढायला ज्या सरायांमध्ये आम्ही थांबलो केवळ तेंव्हाच आम्हाला दुसऱ्या माणसाचं दर्शन झालं),  वैराण वाळवंटात तुम्ही पुढे निघाल्यावर पहिली गोष्ट दिसते ती डोक्यावरच्या टोपीत पिसांचा तुरा खोवल्या  सारखं दिसणारं ओलाग्यु ह्या सद्ध्या जागृत असलेल्या ज्वालामुखीचं २०००० फूट उंच शिखर आणि त्याच्या मुखातून सतत आकाशात फेकल्या जाणाऱ्या शुभ्र वाफेचा झोत.


येथून पुढे हितो काहोनला सीमा पार करून चिले मध्ये शिरेपर्यंत ओलाग्यु सारखे जागृत आणि तोमासमील, लिकानकॅबर, कनापा, तापाकिलचा सारखे सुप्त ज्वालामुखी सतत आपली सोबत करतात.  


सिलोलीचा हा प्रदेश (आणि त्यालाच जोडून असलेलं चिले देशातील अटाकामाचं क्षेत्र) जगातील सर्वात कमी पावसाची जागा आहे. पण ह्या शुष्क प्रदेशावर निसर्गाच्या कुंचल्याने रंगविलेले देखावे तोंडात बोटं घालायला लावतात. तपकिरी, नारिंगी आणि राखाडी रंगाच्या इतक्या छटा असू शकतात अशी मी कल्पनासुद्धा केली नव्हती. (पहा तिसरा आणि चौथा फोटो).



येथील एका भागाला तर साल्वाडोर दाली डेझर्ट असंच म्हटलं जातं कारण दाली ह्या जगप्रसिद्ध चित्रकाराच्या Surrealist शैलीतून निर्माण व्हावी अशी  दृश्यं  इथे दिसतात (ह्याची झलक आणि फोटो मात्र पुढच्या भागात)


पण ह्याही पेक्षा नेत्रदीपक आहेत ती ठायी ठायी वाटेत लागणारी सरोवरं. हे वाळवंटाचे लाल, नारिंगी, सोनेरी रंग नजरेत भरतात न भरतात तेव्हढ्यात एक खिंड ओलांडून गेल्यावर लगूना कनापाची गर्द निळाई आणि त्यात विहरणारे सुंदर गुलाबी रोहित (फ्लेमिंगो) समोर येतात. येथून पुढे एकामागोमाग एक लागणारी दृष्टी सुखविणारी सरोवरं - लगूना होंडा, हेडीओंडा, त्यातील रोहित पक्षांचे थवे, मध्येच आकाशातून पाण्यावर झेप घेणारे उमदे अँडियन गल पक्षी हवेतील हाडं गोठविणाऱ्या थंडीचा सुद्धा विसर पाडतात  (पहा पुढचे तीन फोटो). 



ह्या सर्व प्रवासात एकच रंग दिसत नाही तो म्हणजे हिरवा. अर्थात ज्या प्रदेशात संपूर्ण वर्ष भरात केवळ १५ मि.मी. एव्हढाच पाऊस पडतो (अगदी सहारा वाळवंटात सुद्धा सरासरी ७६ मि.मी. म्हणजे सिलोली पेक्षा पाच पट जास्त पाऊस पडतो) तिथे हिरवळ आणि झाडं झुडुपं दिसणं कठीणच.

पण हे वाळवंट निर्मनुष्य असलं तरी जीवन विरहित मात्र नाही. ह्या वैराण, नापीक प्रदेशात सुद्धा ज्या काही थोड्या फार वनस्पती तगून राहतात, त्यावर जगणारे उंदीर, ससे, वायकुन्या (लामा, अल्पाका सारखा “Cameloid” सस्तन प्राणी) आणि त्यांची शिकार करणारे कोल्हे, प्युमा सारखे प्राणी, रोहित, गल, गिधाडं इत्यादी ८० प्रकारचे पक्षी इथे सुखाने नांदतात (आणि निर्मनुष्य परिसर असल्याने कदाचित थोडं अधिकच आनंदाने). 


अर्थात सिलोलीमधील चमत्कारांची यादी इथेच संपत नाही. सोल द मन्याना (मराठी मध्ये “पहाटेचा सूर्य”) नावाचं उकळते झरे, तप्त गंधकाची विवरे, आकाशात उंच वाफेचे झोत उडवणारे गीझर ह्यांनी भरलेलं पठार, तेर्मास द पोल्कस येथील गरम पाण्याची कुंडे, मृत ज्वालामुखीच्या उथळ विवरांत निर्माण झालेली लगूना कोलोराडा (मराठी मध्ये लाल सरोवर) सारखी सरोवरे अशा असंख्य नवलाई च्या जागांची झलक आपण पाहणार आहोत  ह्या पुढच्या भागात. 



Monday, 5 December 2022

सालार दे उयुनी

मी हॉटेलमध्ये पोचल्याबरोबर खोलीत शिरून दार बंद केलं, आणि पहिली गोष्ट केली म्हणजे हाताच्या बोटाला थेंबभर पाणी लावून ते भिंतीवर घासलं आणि तोंडात घातलं. आता वय साठीच्या पुढे गेल्यामुळे अगदीच लहान मुलासारखं भिंत थेट जिभेनं चाटून पाहण्याचं धैर्य काही मला झालं नाही! कारण आमचं उयुनी (बोलिव्हिया) वाळवंटाच्या सीमेवरचं हे हॉटेल मिठाच्या विटांनी बांधलं आहे असं ऐकिवात होत. भिंतीच्या विटा जरी मिठाच्या बनविलेल्या दिसत असल्या (खडे-मिठाचे स्फटिक त्यात स्पष्ट दिसत होते) तरी चाटलेलं बोट काही खारट लागलं नाही. माझ्यासारख्या पाहुण्यांनी चाटून चाटून भिंतींना खड्डे पाडू नये म्हणून बहुधा त्यावर कसलं तरी संरक्षक पण पारदर्शक रोगण लावलेलं होतं. (पहिला फोटो)
अर्थात आमचं हॉटेल मिठाच्या विटांनी बांधलं ह्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नव्हतं. कारण आजूबाजूच्या १०००० स्क्वे. की.मी. पेक्षाही मोठ्या परिसरात मिठाशिवाय दुसरं काहीच नाही. सालार दे उयुनी किंवा उयुनी सॉल्ट फ्लॅट्स - ह्याचं मराठीत नक्की भाषांतर कसं करावं हे मलातरी माहित नाही. मिठाचं मैदान असं म्हटलं तर त्याच्या प्रचंड आकाराची (१०००० स्क्वे. की.मी) कल्पना वाचणाऱ्याला येणार नाही. मिठाचं वाळवंट म्हणावं तर तिथे कणभर सुद्धा वाळू दिसायची नाही. आपल्या देशातही कछच्या वाळवंटाचा काही भाग दर वर्षी काही महिने असाच मिठाने झाकलेला असतो. पण मूलतः तो प्रदेश वाळवंटच आहे. दर वर्षी पावसाळ्यात नजीकच्या समुद्राचं पाणी ह्या वाळवंटी प्रदेशावर पसरतं आणि पाऊस संपल्यावर त्याचं बाष्पीभवन होऊन मिठाचा थर मागे राहतो.

सालार दे उयुनी मात्र सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वी तिथे असलेल्या तलावाचं (लेक मिंचिन) पाणी भूगर्भात घडलेल्या घडामोडींमुळे आटून गेल्यामुळे निर्माण झालं. ह्या उलथापालथी नंतर समुद्रसपाटीपासून सुमारे ३७०० मीटर्स (१२००० फूट) उंचावरच्या ह्या पठारावर मागे राहिला, तो मुख्यतः मीठ (सोडियम क्लोराईड) आणि मॅग्नेशियम क्लोराईड, लिथियम क्लोराईड ह्यांनी बनलेला कित्येक मीटर खोल थर. येथील लिथियमचा साठा सर्व जगातील लिथियम पैकी सुमारे ७ टक्के इतका मोठा आहे. लिथीयमला आजच्या पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याच्या प्रयत्नांमध्ये फार महत्व आहे. कारण पर्यावरणनाशक विद्युत उत्पादनाला (खनिज तेल, कोळसा वापरून होणाऱ्या) पर्यायी कुठल्याही पद्धती (सौर ऊर्जा, पवन ऊर्जा इत्यादी) ऊर्जेचा साठा करण्याच्या कार्यक्षम बॅटरी तंत्रज्ञानाशिवाय व्यवहार्य होणं शक्य नाही, आणि लिथियम हा ह्या बॅटरीमधील प्रमुख घटक आहे. उयुनीचं हे शुभ्र पठार इतकं सपाट आहे, की ह्या पठाराच्या समुद्रसपाटीपासूनच्या उंचीमध्ये एक मीटर पेक्षा कमी भिन्नता त्याच्या १०००० स्क्वे.की.मी क्षेत्रात आढळून येते. त्यामुळे अवकाशात फिरणाऱ्या उपग्रहांमधील अल्टीमीटर (समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्याचं यंत्र) किती अचूक आहेत हे ठरविण्यासाठी (कॅलिब्रेशन) ह्या पठाराचा वापर केला जातो!

अर्थात उयुनीची जादू ह्या अश्या रुक्ष माहितीमध्ये दडलेली नाहीच. उयुनीची जादू आहे त्याच्या अथांगतेत, अमर्यादित विशालतेत. ती आहे त्याला शब्दात पकडण्याच्या कुठल्याही प्रयत्नांच्या असमर्थतेत, आणि कुठल्याही कॅमेऱ्याच्या फोटोत बद्ध होण्याच्या अशक्यतेत.

किनाऱ्यावर उभं राहून समुद्राचं नजर पोचेल तेथपर्यंत दिसणार निळं पाणी किंवा एखाद्या डोंगर माथ्यावरून दिसणारं अथांग आकाश पाहण्याची आपल्याला सवय असते. पण अश्या जागी काहीतरी सतत घडत असतं, समोरच्या दृश्यामध्ये काहीतरी वैविध्य असत. एखादी लाट समुद्राच्या पाण्यात उसळी घेते, आकाशातून एखादा ढग तरंगत जातो किंवा एखादी घार दूरवर घिरक्या घेताना दिसते. जरा नजर वळवली तर एखादी माडांची राई दिसते, डोंगराच्या उतारावर हिरव्या गवतात पडलेला पिवळ्या फुलांचा सडा दिसतो. बाकी काही नसलं तरी वाऱ्याचा आवाज कानावर पडतो.

उयुनीच्या पठारावर उभे राहिल्यावर फक्त दोनच रंग नजर फिरवावी तिथे दिसतात - डोळे दिपवणारा, शुभ्र एकसंध पांढरा आणि तो संपतो तेथपासून दिसणारा गर्द निळा. भवताली संपूर्ण अंधार झाल्यावर जशी पूर्व कुठली, पश्चिम कुठली अशी दिशांची जाणीव पूर्णपणे नाहीशी होते, तसंच इथे चकचकीत सूर्यप्रकाशात होऊन जातं. आणि निःस्तब्धता तर अशी, की आपल्याच पापण्यांची फडफड आपल्याच कानावर पडावी, आपल्याच हृदयाचे ठोके ढोल वाजविल्यासारखे आपल्यालाच ऐकू यावेत.

समोर पाहण्यासारखं काहीही - म्हणजे एखादा हिमालयासारखा उत्तुंग पर्वत, वेरूळ सारखी थक्क करणारी कलाकृती, अथांग सागर, फुलांचा गालिचा घातलेलं कास सारखं पठार असं काहीही - नसतानासुद्धा आपण काहीतरी भव्य, नेत्रदीपक पाहत आहोत असा अनुभव ह्यापूर्वी मलातरी कधीच आला नव्हता. ही दृष्टीला न दिसणारी पण मनाला जाणविणारी भव्यता फोटो मध्ये पकडणं मला तरी शक्य नाही - पण तरी सुद्धा दोन फोटो वानगी दाखल इथे जोडले आहेत.

जो लेक मिंचिन आटल्यामुळे उयुनीची निर्मिती झाली त्याचे अवशेष काही भागात अजूनही आहेत. आणि उयुनीचा तो भाग पाण्याच्या अगदी उथळ (२ - ४ सेंटीमीटर) थराखाली झाकलेला आहे. हे पाणी इतकं अविचल असतं की त्याचा कित्येक की.मी. व्याप्तीचा आरसा बनतो (चौथा फोटो).
इथे पाऊस क्वचितच पडतो आणि जेंव्हा पडतो तेंव्हा अगदी थोडा पडतो. परंतु जेंव्हा तो पडतो तेंव्हा जवळ जवळ संपूर्ण उयुनीचा असा प्रचंड आरसा होतो. आणि सूर्यास्ताच्या वेळी ह्या आरशात निर्माण झालेलं दृश्य केवळ अवर्णनीय असतं (शेवटचा फोटो)

उयुनीला लागूनच सुरु होणारं आणि चिले देशाच्या सीमेपर्यंत पसरलेलं सिलोली वाळवंट हा ही असाच चमत्कारांनी भरलेला अद्भुत प्रदेश आहे. त्याचा प्रवास पुढच्या दोन लेखात.

Friday, 2 December 2022

ला पाझ

ला पाझ अक्षरशः आकाशात वसलेलं शहर आहे. कारण बोलीव्हियाची ही राजधानी समुद्रसपाटी पासून सरासरी ३७०० मीटर (सुमारे १२००० फूट) उंचीवर आहे.


माउंट इलिमानीच्या छायेतलं ला पाझ

चारी बाजूंना आकाशाला भिडलेल्या डोंगरांच्या मधील वर्तुळाकृती वाडग्याच्या उतरत्या भिंतींवर बांधलेलं हे शहर दृष्टीला पडलं तेंव्हा पहिली प्रतिमा माझ्या मनात उभी राहिली ती सर्कशीतल्या मृत्युगोलाची. त्यातला तो शूरवीर फटफटीचालक कसा, वर्तुळाकार फिरत फिरत मृत्युगोलाच्या तळापासून वरपर्यंत जातो, ला पाझ मधली वाहनाची रहदारी सुद्धा त्या वाडग्याच्या वरच्या काठावरून पाहिलं तर तशीच दिसते. 



माउंट इलिमानी ह्या २१००० फूट उंच शिखराच्या कुशीतील हा प्रदेश प्रागैतिहासिक काळात एका ग्लेशियरने (हिमनदी) व्यापलेला होता. कालौघात लुप्त होता होता ह्या हिमनदीने सभोवतालचे पर्वत कातून काढून बनवलेल्या खिंडीत ला पाझ वसलेलं आहे. ह्या कातकामातून निर्माण झालेल्या कडे-कपारींचे  विलक्षण आकार शहराच्या सभोवताली आजही दिसतात.

 


एखाद्या परग्रहावरचं  भासावं  असं शहराच्या सीमेवरच्या “Moon Valley” मधलं दृश्य).  


ला पाझच्या वाडग्यासारख्या रचनेमुळे, शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचं असेल तर सरळ रेषेत दिसणाऱ्या अंतराच्या तिप्पट प्रवास करावा लागतो - एक तर वाडग्याच्या काठावरून गोलाकार फिरून किंवा वाडग्याच्या काठापासून तळापर्यंत आणि परत तळातून समोरच्या काठापर्यंत.

        


त्यामुळेच आकाशातच  वसलेल्या ह्या शहरातील सार्वजनिक वाहतूक ही मुख्यतः बस किंवा ट्रेन ऐवजी आकाशातूनच जाणाऱ्या रोप-वे ने होते. रोप-वे चं हे जाळं कोळ्याच्या जाळ्यासारखं चहूदिशांना पसरलेलं आहे (चौथा फोटो).

        

आजचा बोलिव्हिया जेंव्हा स्पॅनिश साम्राज्याची वसाहत होता तेंव्हा त्याला अप्पर (म्हणजे उत्तरेचा नव्हे तर अक्षरशः “उंचावरचा”) पेरू असंच म्हणत. त्याचं बोलिव्हिया हे नाव ज्या सिमोन बोलीवार वरून ठेवण्यात आले तो संपूर्ण इतिहासातील कदाचित असा एकमेव माणूस असेल जो एकाच वेळी ६ वेगवेगळ्या स्वतंत्र राष्ट्रांचा निर्वाचित राष्ट्राध्यक्ष होता. 



परंतु बोलिव्हियाच्या स्वातंत्र्यसंग्रामाची सुरुवात बोलीवारच्याही आधी अपोलीनार हायेन आणि डॉन पेद्रो डॉमिंगो मुरीयो ह्यांनी पुकारलेल्या बंडा पासून झाली होती. दोघांचाही जन्म खानदानी सरदार कुळातील, दोघांचेही वाडे ला पाझ मध्ये एकाच रस्त्यात (काब्रा कांचा).


ह्या रस्त्याला बोलिव्हियाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनन्यसाधारण  स्थान आहे. एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात बोलिव्हियात झालेल्या जनजागृतीची सुरुवात ह्याच रस्त्यापासून झाली. येथील आजही दिसणारे साधेसुधे कॅफे, गुत्ते आणि उपाहारगृहं ही स्वत्वाची जाणीव झालेल्या देशभक्तांची गुपचूप भेटण्याची आणि त्यांना वेळप्रसंगी आसरा देणारी ठिकाणं होती.  लढ्याच्या  पहिल्या योजना इथेच आखल्या गेल्या. स्पेनच्या राजसत्तेला आव्हान देणाऱ्या घोषणा इथेच पहिल्याने पुकारल्या गेल्या. डॉन मुरीयो आणि हायेन दोघांनाही मात्र त्यांनी पुकारलेल्या ह्या बंडाबद्दल फाशी देण्यात आलं आणि त्यांच्या अनुयायांची निर्घृण कत्तल  करण्यात  आली.

 


ला पाझ मधील सर्वात महत्वाचा चौक आज डॉन मुरियो प्लाझा नावाने ओळखला जातो (पाचवा फोटो) आणि काब्रा कांचा रस्त्याला काय्ये अपोलिनार हायेन असं नाव देण्यात आलं आहे.

         


अजूनही हा रस्ता आपलं अठराव्या शतकातील रूप टिकवून आहे. पदपथावरील तसेच कॅफे, तीच जुन्या स्पॅनिश शैलीची रंगीबेरंगी घरे, तसाच फरसबंदी रस्ता - त्यावरून चालताना आपल्याला चटकन भूतकाळात घेऊन जातात (फोटो क्र. ६,७) . आज हा रस्ता ला पाझ मधील उभरत्या कलाकारांचं केंद्रस्थान आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला छोट्या


छोट्या स्टुडिओ मधील कलेच्या प्रांतातील तरुण मुशाफिरांची प्रदर्शनं, आपल्याला साल्वादोर दाली आणि पिकासोच्या काळातील पॅरिस मधील मॉंमार्त्र ची आठवण करून देतात. रस्त्यातील हायेन आणि मुरीयो ह्यांच्या मूळ वाड्यांचे  आज त्यांच्या आठवणीसाठी म्युझियम मध्ये रूपांतर करण्या आले आहे. 







ला पाझच्या रस्त्यांतून भटकणे हा त्यातील वैविध्यांमुळे (एकीकडे चेटक्यांची गल्ली -जी आपण ह्या पूर्वीच्या लेखात पहिली, दुसरीकडे कार्निवाल साठी वापरायचे चित्रविचित्र पोशाख विकण्याचा बाजार, तिसरीकडे "Moon Valley"चे विलक्षण दृश्य) जितका मनोरंजक तितकाच दमछाक करणारा अनुभव आहे.

 

 








समुद्र सपाटी पासून १२५०० फुट उंचावरील रस्त्यातून फिरताना जेंव्हा एकदम २०० पायऱ्या चढून जायचा प्रसंग येतो तेंव्हा आपल्या वयाच्या मानाने "आपण किती fit आहोत" ह्याबद्दलचे गोड गैरसमज चटकन विरून जातात.  पण ला पाझ पेक्षाही अधिक विलक्षण अश्या बोलिव्हियातील दोन ठिकाणी आपण पुढच्या अंकात जाऊ.

Thursday, 1 December 2022

चेटक्यांची गल्ली

तुम्ही हॅरी पॉटरचे सिनेमे पाहिले आहेत का? त्या मालिकेतील प्रत्येक सिनेमात एकदा तरी डायगॉन ॲली नावाच्या रस्त्यावरची दृश्यं पडद्यावर दिसतात. डायगॉन ॲली म्हणजे जादूटोणा आणि चेटूक-माटुक करण्यासाठी लागणाऱ्या सर्व चित्तचक्षुचमत्कारिक साधनांचा खच्च भरलेला बाजार.

गुप्त धन शोधायचं आहे? बेडकाची शेपटी आणि झुरळाच्या मिश्या घालून केलेलं तेल डोळ्यात घालायला तुम्हाला इथेच मिळेल. शत्रूवर करणी करायची आहे? हे घ्या एक बाहुली आणि त्यात टोचायच्या सुयांचं “शत्रुदमन” “kit” आणि त्या सोबत शत्रूच्या दुःखावर डागण्या देण्यासाठी ढाळायला ही नक्राश्रूंची बाटली फुकट! असं काय काय तुम्हाला तिथे मिळू शकेल. पण त्यासाठी तुम्हाला त्या सिनेमातल्या जगात जायला लागेल, आणि ते कसं काय जायचं ते मला तरी माहित नाही.


पण तुम्हाला आपल्या जगातल्या “खऱ्या-खुऱ्या” चेटक्यांच्या गल्लीत जायचं असेल तर मात्र मी तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकतो. बोलीव्हियाची राजधानी ला पाझ मधील काये द लास ब्रूहास नावाच्या गल्लीमध्ये (पहिला फोटो).

काय मिळेल तुम्हाला तिथे? 


तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट निवारण्यासाठी, सर्व दुखण्यांवर इलाज करण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीत यश मिळविण्यासाठी उपयुक्त असे मंत्र, तंत्रं, यंत्रं, रसायने आणि काढे. तसेच आपल्याला नक्की कशा प्रकारच्या जारण-मारणाची गरज आहे ह्या बद्दल सल्ला हवा असेल तर काळ्या टोप्या आणि अंगरखे घातलेले तज्ञ, अनुभवी चेटके ही येथे आपल्या सेवेसाठी तत्पर असतात.

इथे काय मिळत नाही?

ॲन्डीज पर्वतराजीत गिर्यारोहणाच्या मोहिमेवर जाऊन सुखरूप परत यायचं आहे?  ही पहा कॉन्डॉर पक्षाची मंतरलेली मूर्ती, खुशाल खिशात ठेवून काळजी न करता मोहिमेवर जा. पाठीचं दुखणं आहे? हा पहा बेडकाच्या पावडर पासून बनवलेला काढा. थकल्या थकल्या सारखं वाटतं? व्हायाग्रा/बियाग्रा कशाला हवं? हा पहा विराकोचाचा (इंकांचा देवाधिदेव) ताईत. दंडाला बांधा आणि काळजी करणं सोडून द्या. किनोआ धान्याची शेतात नव्याने पेरणी करायची आहे? हा यातीरी (आयमारा जमातीतील चेटक्या+पुजारी+भविष्यवेत्ता) सांगेल तुम्हाला कसला यज्ञ करायचा ते?


गल्लीतल्या एका दुकानाच्या पडवीत असा काहीतरी मंत्र-तंत्रांचा प्रयोग आम्ही तिथे पोचलो तेंव्हा चालूच होता. दुकानात वेगवेगळ्या प्राण्यांचे अवशेष (कवट्या, पंजे, शेपट्या आणि काही सभ्य समाजात उल्लेख न करण्यासाखे भागही) विकायला  ठेवलेले होते. 


हारीने मांडलेल्या फडताळांत रंगीबेरंगी बाटल्यांमध्ये कसली कसली रसायनं, मलमं आणि काढे भरून ठेवलेले होते.  त्यांचे उपयोग आणि कुठल्या वनस्पती किंवा प्राण्याच्या अवयवांपासून ते बनविलेले आहेत त्याची माहिती पत्रकंही होती. ताईत, “मंतरलेल्या” मूर्ती तर खचाखच भरलेल्या होत्या. (पहा फोटो क्र. २, ३, ४).

काही तर इतक्या बीभत्स दिसत होत्या की त्यांचे फोटोसुद्धा इथे जोडणं शक्य नाही. 



मला त्या गल्लीत फक्त फोटो आणि माझ्या फ्रीज वर चिकटविण्यासाठी एक मॅग्नेट (मी जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी माझं “shopping” ह्या मॅग्नेटपुरतंच मर्यादित असतं) एव्हढ्याच गोष्टी तिथे घ्यायच्या होत्या. पण मी एका दुकानात पाउल टाकल्या बरोबर “Llévate estos a casa, te convertirás en millonario” (हे घरी घेऊन जा, तू लक्षाधीश होशील) असं म्हणत एका चेटकिणीने कसल्यातरी प्राण्याचे वाळविलेले पंजे माझ्या नाकासमोर नाचवले! आमचा गाईड माझ्या मदतीला धावला. मला काय पाहिजे हे कळल्यावर त्या चेटकिणीचा उत्साह जरा कमी झाला पण नुसत्या मॅग्नेटमध्ये सुद्धा वेगवेगळ्या “शक्तीचे” अनेक प्रकार ठेवलेले होते.

उत्तम आरोग्य हवे असेल तर पाचामामाचा (पृथ्वी आणि त्यावर तसेच त्याखाली उगविणाऱ्या सर्व गोष्टींची देवता) मॅग्नेट होता. दुष्ट शक्तींना दूर ठेवणारा घुबडाची पिसं लावलेला मॅग्नेट होता, वाळलेला बेडूक कशासाठी होता हे काही मला शेवट पर्यंत कळलं नाही. मी शेवटी सर्वात निरुपद्रवी असा मनःशांती मिळवून देणारा विराकोचाचा दगडावर कोरलेला चेहरा असेलेला मॅग्नेट निवडून दुकाना बाहेर पडलो.

बोलिव्हिया हा अनेक चित्तवेधक विरोधाभासांनी भरलेला देश आहे. हजारो वर्षं  चालत आलेली ही जादू-टोण्याची परंपरा एकीकडे अजूनही अव्याहत सुरु आहे. तर दुसरीकडे ला पाझ सारखं आधुनिक राजधानीचं शहर, तेथून जवळच टिवानाकू सारख्या ऐतिहासिक पण गूढ, रहस्यमय संस्कृतीचे अवशेष (आपण ह्या बद्दल पूर्वी बोललो आहोत). तिसरीकडे युयुनी सारखं जगातील सर्वात मोठं मिठाचं वाळवंट (Salt flats) आणि त्या पलीकडे अनेक चमत्कारांनी भरलेलं सिलोली वाळवंट. विराकोचाच्या त्या मॅग्नेटमुळे मला मनःशांती किती मिळाली कुणास ठाऊक पण त्याच्या कृपेनेच कदाचित असेल ह्या पूर्वी कधीही न आलेले अनुभव ह्या प्रवासात घेता आले.   – ह्या सर्वांचीच थोडक्यात ओळख पुढच्या काही लेखांत.

  विसरलेले समाज - २ : टुलोर   चिले देशातील अटाकामा असा प्रदेश आहे जिथे अनेक ठिकाणी गेल्या ५०० वर्षात पाऊसच पडलेला नाही. आणि जेथे पडतो तेथे...