तुम्ही हॅरी पॉटरचे सिनेमे पाहिले आहेत का? त्या मालिकेतील प्रत्येक सिनेमात एकदा तरी डायगॉन ॲली नावाच्या रस्त्यावरची दृश्यं पडद्यावर दिसतात. डायगॉन ॲली म्हणजे जादूटोणा आणि चेटूक-माटुक करण्यासाठी लागणाऱ्या सर्व चित्तचक्षुचमत्कारिक साधनांचा खच्च भरलेला बाजार.
गुप्त धन शोधायचं आहे? बेडकाची शेपटी आणि झुरळाच्या मिश्या घालून केलेलं तेल डोळ्यात घालायला तुम्हाला इथेच मिळेल. शत्रूवर करणी करायची आहे? हे घ्या एक बाहुली आणि त्यात टोचायच्या सुयांचं “शत्रुदमन” “kit” आणि त्या सोबत शत्रूच्या दुःखावर डागण्या देण्यासाठी ढाळायला ही नक्राश्रूंची बाटली फुकट! असं काय काय तुम्हाला तिथे मिळू शकेल. पण त्यासाठी तुम्हाला त्या सिनेमातल्या जगात जायला लागेल, आणि ते कसं काय जायचं ते मला तरी माहित नाही.
काय मिळेल तुम्हाला तिथे?
इथे काय मिळत नाही?
ॲन्डीज पर्वतराजीत गिर्यारोहणाच्या
मोहिमेवर जाऊन सुखरूप परत यायचं आहे? ही
पहा कॉन्डॉर पक्षाची मंतरलेली मूर्ती, खुशाल खिशात ठेवून काळजी न करता मोहिमेवर
जा. पाठीचं दुखणं आहे? हा पहा बेडकाच्या पावडर पासून
बनवलेला काढा. थकल्या थकल्या सारखं वाटतं? व्हायाग्रा/बियाग्रा कशाला हवं? हा
पहा विराकोचाचा (इंकांचा देवाधिदेव) ताईत. दंडाला बांधा आणि काळजी करणं सोडून
द्या. किनोआ धान्याची शेतात नव्याने पेरणी करायची आहे? हा
यातीरी (आयमारा जमातीतील चेटक्या+पुजारी+भविष्यवेत्ता) सांगेल तुम्हाला कसला यज्ञ
करायचा ते?
काही तर इतक्या बीभत्स दिसत होत्या की त्यांचे फोटोसुद्धा इथे जोडणं शक्य नाही.
उत्तम आरोग्य हवे असेल तर पाचामामाचा (पृथ्वी आणि त्यावर तसेच त्याखाली उगविणाऱ्या सर्व गोष्टींची देवता) मॅग्नेट होता. दुष्ट शक्तींना दूर ठेवणारा घुबडाची पिसं लावलेला मॅग्नेट होता, वाळलेला बेडूक कशासाठी होता हे काही मला शेवट पर्यंत कळलं नाही. मी शेवटी सर्वात निरुपद्रवी असा मनःशांती मिळवून देणारा विराकोचाचा दगडावर कोरलेला चेहरा असेलेला मॅग्नेट निवडून दुकाना बाहेर पडलो.
बोलिव्हिया हा अनेक चित्तवेधक
विरोधाभासांनी भरलेला देश आहे. हजारो वर्षं
चालत आलेली ही जादू-टोण्याची परंपरा एकीकडे अजूनही अव्याहत सुरु आहे. तर
दुसरीकडे ला पाझ सारखं आधुनिक राजधानीचं शहर, तेथून
जवळच टिवानाकू सारख्या ऐतिहासिक पण गूढ, रहस्यमय संस्कृतीचे अवशेष (आपण ह्या बद्दल
पूर्वी बोललो आहोत). तिसरीकडे युयुनी सारखं जगातील सर्वात मोठं मिठाचं वाळवंट (Salt
flats) आणि त्या पलीकडे अनेक चमत्कारांनी भरलेलं सिलोली वाळवंट.
विराकोचाच्या त्या मॅग्नेटमुळे मला मनःशांती किती मिळाली कुणास ठाऊक पण त्याच्या
कृपेनेच कदाचित असेल ह्या पूर्वी कधीही न आलेले अनुभव ह्या प्रवासात घेता आले. – ह्या
सर्वांचीच थोडक्यात ओळख पुढच्या काही लेखांत.
No comments:
Post a Comment