तुम्ही जर ग्रीस मध्ये अथेन्सला भेट दिली असेल तर ॲक्रोपोलिस आणि त्यातील जगप्रसिद्ध पार्थेनॉन नक्कीच बघितलं असणार. पण तुम्हाला पार्थेनॉनचं गतवैभव पूर्णपणे अनुभवायचं असेल तर फक्त अथेन्सला जाणं पुरेसं नाही. कारण एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच अर्ध्याहून अधिक पार्थेनॉन त्याचे तुकडे, तुकडे करून लॉर्ड एल्जिन ह्या ब्रिटिश उमरावाने चोरून इंग्लंडला नेलं.
युरोपमध्ये भटकताना आणि तिथल्या म्युझियम किंवा प्रासादांतील थक्क करणाऱ्या कलाकृती पाहताना, त्यातील कित्येक कलाकृती म्हणजे असाच एल्जिनसारख्यानी सर्व जगात ठिकठिकाणी टाकलेल्या डाक्यातील माल आहे आणि ही दरोडेखोरी किती मोठ्या प्रमाणात आणि किती दीर्घ काळ केली गेली, ह्याची सुरुवातीला मला अजिबात कल्पना नव्हती. त्याची जाणीव व्हायला लागली युरोप बाहेरच्या - आपल्या भारतासकट इजिप्त, कंबोडिया, पेरू अश्या दूर दूर च्या देशात फिरताना, तेथील भग्नावशेष समोर आल्यावर.
साधारण सोळाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते एकोणिसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत, छोट्याश्या युरोपमधील विविध राज्यांनी सर्व जगावर सत्ता गाजविली. आणि ह्याकाळात आपल्या जगभरातील वसाहतींतून अगणित संपत्ती त्यांनी आपल्या देशात नेली. आज श्योनब्रून (Schönbrunn), व्हर्साय (Versailles) किंवा बकिंगहॅमच्या राजवाड्यांत जे वैभव आपल्याला दिसतं त्याचं मूळ अश्या लुटलेल्या धनसंपत्तीतच आहे.
अर्थात जित समूहांच्या संपत्तीची लुटालूट जेत्यांनी करण्याचा प्रघात पूर्वापार सर्वत्र चालत आलेला आहे - मग ती सोळाव्या शतकात स्पेनने केलेली पराभूत इंका साम्राज्याची लूट असो, किंवा चौथ्या शतकात मगधाच्या गुप्त साम्राज्याने माळवा आणि गुजरातेतील राज्ये जिंकून पळविलेली धन-संपत्ती असो.
पण एखाद्या जित राष्ट्राचा सांस्कृतिक वारसाच - त्याच्या ऐतिहासिक आणि भावनिक मूल्याचा विचार न करता, तोडफोड आणि प्रसंगी त्यांचा विध्वंस करून, केवळ शोभेच्या वस्तू म्हणून पळवून नेण्याचा प्रघात मात्र युरोपातच घातला गेला असं वाटतं.
आपण पार्थेनॉन पासूनच सुरुवात करू. पार्थेनॉनमधील कलाकृतींची लूट १२ वर्ष सातत्याने चालू होती - संगमरवरी मूर्ती, कोरीव काम केलेल्या चित्रपट्टया (friezes), भिंती फोडून काढलेले कलाकुसरीने भरलेले तुकडे, जमीन खणून उचकटलेले स्तंभ, जहाजं भरभरून लॉर्ड एल्जिनने इंग्लंडला नेले. त्याचं एकच उदाहरण आपण थोड्या विस्ताराने पाहू.
पार्थेनॉन आज कश्या अवस्थेत दिसतं त्याचा हा पहिला फोटो पहा. पार्थेनॉनचे उतरते छप्पर आणि त्याचे भव्य स्तंभ ह्या मधील त्रिकोणी पोकळी एकेकाळी अतिशय सुंदर शिल्पांनी पूर्ण भरलेली होती. त्यांची वर्णनं अथेन्सच्या वैभवकाळात तिथे गेलेल्या प्रवाश्यानी लिहून ठेवली आहेत. ह्या दोन (पूर्व आणि पश्चिमेच्या) त्रिकोणांमध्ये एकूण ५० पुतळे होते.
पूर्वेला देवी अथेनाच्या जन्माच्या प्रसंगाचं चित्र होतं (दुसरा फोटो) - मध्यभागी देवाधिदेव झूस सिंहासनावर आणि त्याच्या एका बाजूला हेरा, झूसची पत्नी आणि दुसऱ्या बाजूला अथेना, त्यापुढे हातात त्रिशूल घेतलेला पोसायडॉन, वीणा (lyre) घेतलेला अपोलो असे अनेक देव/देवतांचे पुतळे होते.
पश्चिमेला, अथेन्सवर कुणाची सत्ता असावी ह्यासाठी अथेना आणि पोसायडॉन ह्यांच्यात झालेल्या युद्धाचा प्रसंग दाखविलेला होता. अर्थात त्यात अथेनाचा विजय झाला (म्हणूनच जिथे युद्ध झालं त्या गावाचं नाव अथेन्स!). मध्यभागी अथेनाने अथेन्सच्या नागरिकांना भेट दिलेल्या ऑलिव्हच्या झाडाची आकृती होती. (तिसरा फोटो). मात्र ह्या अप्रतिम शिल्पातील एक तुकडा सुद्धा तुम्हाला आज अथेन्स मध्ये पाहायला मिळणार नाही - तिथे आहेत फक्त दोन लहान पण प्रमाणशीर प्रतिकृती, आधुनिक काळात बनविलेल्या. मूळ कलाकृती पाहायला तुम्हाला जावं लागेल एल्जिन मार्बल्स नावाचं ब्रिटिश म्युझियम मधील प्रदर्शन पाहायला. आणि ह्या एल्जिन मार्बल्स मधील प्रत्येक वस्तू जरी चोरून आणलेली आहे हे सर्वमान्य असलं, तरीही ब्रिटिश सरकारने सतत ते त्यांच्या मूळ मालकांना (ग्रीस) परत द्यायला नकार दिलेला आहे!
आता हा चौथा फोटो पहा. तुम्ही जर इटलीमध्ये रोमला गेला असाल तर सम्राट ऑगस्टस (किंवा हॅड्रियन - ह्याबद्दल इतिहासात थोडं दुमत आहे) ह्याने बांधलेलं पँथिऑन नावाचं २००० वर्षांपूर्वीचं रोमन देऊळ नक्कीच पाहिलं असेल. पण त्यासमोरच्या चौकात एक सुंदर कोरीव कामाने सजविलेला उंच स्तंभ तुम्ही निरखून पहिला आहे का?
हा इजिप्तमधून पळवून आणलेला स्तंभ आहे. हा मुळात इजिप्तचा सम्राट रामसेस दुसरा ह्याने (आजच्या कैरो जवळ) बांधलेल्या सूर्यदेवाच्या (Ra) देवळाच्या प्रवेशदारात होता. बहुधा रोमन सेनानी पॉम्पे ह्याने तो पळवून रोमला नेला.
कर्नाक ह्या इजिप्तच्या प्रसिद्ध देवालय समूहातील राजा तुतमोस तिसरा ह्याच्या देवळाबाहेरील दोन स्तंभही असेच रोमन सेनापतींनी पळविले. त्यातील एक रोममधील पियाझा सान जिओव्हानी ह्या चौकात तुम्हाला दिसेल. मी जेंव्हा तो प्रत्यक्ष पहिला तेंव्हा ही त्याची पूर्वपीठिका मला माहीतच नव्हती त्यामुळे मी त्याचा फोटो सुद्धा घेण्याचे कष्ट घेतले नाहीत.
दुसरा (पाचवा फोटो) आज इस्तंबूलमधील सुलतान अहेमत चौकात आहे (आजचा टर्की देश एकेकाळी रोमन साम्राज्याचा भाग होता).
इजिप्तमधील लक्झरच्या देवळाबाहेर सम्राट रामसेस दुसरा ह्याने उभारलेल्या दोन स्तंभांपैकी एकच त्याच्या मूळ जागी आहे (सहावा फोटो).
दुसरा असाच फ्रेंच लोकांनी पळवून नेला. जो आज पॅरिसमध्ये काँकॉर्ड चौकात (Place de la Concorde) आहे. तो सुद्धा मी जेंव्हा पहिला तेंव्हा त्याच्याही ऐतिहासिक महत्वाची अजिबात जाणीव नसल्याने मी त्याचा फोटो घेतला नाही!
चोरून आणलं ते आणलं, पण त्यांचं ऐतिहासिक महत्व पूर्णपणे पुसून टाकून जणूकाही आपणच ह्या कलाकृतींचे शिल्पकार आहोत असा आभास निर्माण करण्यात आला.
मी मुद्दामच आपल्या देशातही झालेल्या अश्या लूटमारीची उदाहरणं इथे दिली नाही. एकतर त्याची आपल्याला थोडीफार तरी माहिती आहे. पण मुख्य म्हणजे ही सांस्कृतिक दरोडेखोरी केवळ एखाद्याच प्रदेशापुरती मर्यादित नव्हती, तर त्याची व्याप्ती जगभर होती हे सांगण्याचा माझा मुख्य उद्देश होता. अश्या दरोडेखोरीची उदाहरणं लिहायला बसलो तर अजून कितीतरी पानं भरतील.
कंबोडियातील प्रीह कहान (Preah Khan) देवळासमोर सागरमंथनाचं अद्वितीय शिल्प आहे, त्यातील सर्व देव आणि असुरांच्या मूर्तींची डोकीच फक्त कोणीतरी कापून पळवून नेली आहेत. पेरूतील कुस्को मधल्या कोरिकांचा ह्या इंका देवळातील कलाकृती त्या शुद्ध सोन्याच्या बनविलेल्या असल्यामुळे स्पॅनिश लोकांनी त्या वितळवून त्याची नाणी पडून स्पेनला पाठवून दिली. लिहावं तितकं थोडंच. आणि ही सर्व फक्त मी स्वतः पाहिलेली उदाहरणं. मी न पाहिलेली अशी उदाहरणं त्यापेक्षा शेकडो/हजारो पटींनी अधिक आहेत.
धर्मांधता आणि सत्तान्धता ह्या दोन्ही मुळे आपल्याच कलाविष्कारांचा नाश वेगवेगळ्या समूहांनी सर्वत्र केला. कुठलाही गट किंवा समाज त्याला अपवाद आहे असं म्हणता येणार नाही. मग ह्या लेखात मी फक्त युरोप बद्दलच का लिहिलं? आपण फार उदारमतवादी आहोत आणि आपणच जगातील सर्व "मागास आणि रानटी" समूहांना (आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेतील) संस्कृती म्हणजे काय हे शिकवलं असा ढोंगी दावा सर्वच युरोपियन देशांनी वेळोवेळी आपल्या वसाहतवादाचं समर्थन करताना केला आहे. पण त्यांच्याही माजघरात, त्यांच्या दरोडेखोरीची अशी अगणित मढी लपविलेली आहेत आणि त्याची कबुली कोणीही कधीही दिलेली नाही, एव्हढंच मला सांगावंसं वाटलं.
खरं आहे, सर. या युरोपियन देशांनी, मानवतेच्या नावाने अश्रू ढाळण्याचे कारणच नाही. त्यांनी आपला स्वतः चा इतिहास जर काढून वाचला, तर त्यात अश्रू सिंचन करण्यासाठी अनेक स्थळे सापडतील.
ReplyDelete