कोव्हिडचा आलेख बऱ्यापैकी उतरणीला लागलेला पाहून मध्यप्रदेशात पन्ना टायगर रिझर्व्हला भेट देऊन प्राणी/पक्षी निरीक्षणाचा बेत आम्ही आखला होता. पन्ना पासून खजुराहो अगदी जवळ, फक्त अर्ध्या पाऊण तासाचा रस्ता. त्यामुळे त्याचाही समावेश कार्यक्रमात होता.
युट्युब वर शोधल्यावर खजुराहो बद्दलचे पंचवीस-तीस व्हिडिओ मला सापडले. दुर्दैवाने त्यातील एकही, कुठल्याही अधिकृत संस्थेने (Archaeological Survey of India, MP Tourism इत्यादी) किंवा माहितगार व्यक्तीने बनविलेला नव्हता. त्यातील फक्त दोन व्हिडिओ (जे खजुराहो मधील कोणा टूर गाईडने स्वतःची जाहिरात करण्यासाठी केले असावे असं दिसत होतं) संतुलित म्हणावे असे होते. बाकी सर्व व्हिडिओची शीर्षकं “संभोग से समाधी तक”, “Kamasutra Temples”, “खजुराहोके कामुक प्रतिमाओंका रहस्य” किंवा त्यासमान शब्द वापरून बनवलेली होती.
खजुराहोबद्दल जे काही थोडं आणि विवादास्पद ऐकिवात होतं त्याला पुष्टी देणारीच ही सर्व शीर्षकं दिसत होती. आणि त्यांतील विवेचन (खरं तर त्यात जे काही होतं त्याला “विवेचन” हा शब्द अनाठायी प्रतिष्ठा देणारा आहे) सुद्धा खजुराहोबद्दलच्या प्रवादांना पूरक होतं.
अर्थात खजुराहो म्हणजे निव्वळ कामुकतेचं स्मारक हे सर्वसाधारणपणे प्रचलित असलेलं समीकरण खरं असणंही शक्य होतंच. कारण शृंगार आणि नग्नतेचं आपल्या प्राचीन संस्कृतीला वावडं नव्हतं आणि त्यांच्या कलात्मक अभिव्यक्तीलाही प्रतिबंधही नव्हता. तांत्रिक पंथांच्या कर्मकांडात तर लैंगिक व्यवहारांना महत्वाचं स्थान होतं. तेंव्हा त्या पंथाच्या अनुयायांनी उभारलेल्या “धर्मस्थळात” कामाविष्कारांच्या अभिव्यक्तीला प्राधान्य दिलं जाणं समजण्यासारखं होतं. पण खजुराहोसकट बुंदेलखंडावर साधारण नवव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत टिकलेल्या चंदेलांच्या राज्यात प्रमुख धर्म होते हिंदू आणि जैन. तेंव्हा त्या काळात एखादं शिव, विष्णू किंवा पार्श्वनाथ ह्यांचं देऊळ फक्त आणि फक्त ह्याच कारणासाठी उभारालं जाईल आणि ते सुद्धा चंदेला घराण्याच्या हिंदू राजाकडून?
प्रत्यक्ष जाऊन पहिल्या शिवाय ह्या प्रश्नांना काही उत्तर मिळणार नव्हतं. कारण ASI च्या वेबसाईटवर सुद्धा मला खजुराहो बद्दल जे तुटपुंजी ऐतिहासिक माहिती असलेलं एकच पान मिळालं, त्यावरही दिसणाऱ्या तीन फोटोंपैकी दोन प्रामुख्याने संभोगावस्थेतील जोडप्यांच्या मूर्तीचेच आहेत! ह्या पानावर एक खजुराहोच्या संकुलाची "Virtual tour" आहे ती थोडीशी उपयुक्त आहे. कारण बाकी काही नाही तरी निदान खजुराहोच्या संकुलाची व्याप्ती किती मोठी आहे ह्याची कल्पना त्यावरून येते.
पन्नाहून खजुराहोला जायला निघालो तेंव्हा बारीक बारीक पावसाला सुरुवात झाली. खजुराहोला पोचेपर्यंत, जुलै महिन्यासारखा धो धो पाऊस पडायला लागला. त्यामुळे त्या दिवशी देवळं पाहायला जाण्याचा बेत आणि संध्याकाळी होणारा “Sound and Light” शो रद्दच झाला. दुसऱ्या दिवशी सकाळीही पावसाला खंड पडला नव्हता. मग तसेच भाड्याने ४-५ छत्र्या मिळवून पुढचे ५-६ तास, एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात कॅमेरा धरून समोर दिसणारा मंत्रमुग्ध करणारा शिल्पकलेचा अविष्कार बघत घालविले. तिसरा हात जर असता तर सर्व वेळ त्याचं बोट आश्चर्याने तोंडात घातलं गेलं असतं.
धर्माच्या किंवा त्याच्याशी संबंधित इतर गोष्टींच्या (आख्यायिका, दंतकथा, नीतिकथा) प्रभावामुळे सर्व जगभर निर्माण झालेल्या कलाकृती हा माझ्या फार कुतूहलाचा (अभ्यासाचा नव्हे) विषय आहे. धर्म ह्या संकल्पनेने आणि त्यातून निर्माण झालेल्या संस्थांनी मानवी समाजाचं भलं केलं कि बुरं केलं हा वेगळा वादाचा मुद्दा झाला. एक गोष्ट मात्र निर्विवाद. सर्वार्थाने धर्मनिरपेक्ष अशी कला (Secular art) ही अर्वाचीन काळातली, कदाचित गेल्या शे-दोनशे वर्षातील घडामोड आहे. त्या आधीच्या हजारो वर्षांच्या इतिहासात धर्माच्या प्रेरणेतून किंवा धार्मिक संस्थांच्या प्रत्यक्ष सहभागातून सर्व जगभर सर्व प्रकारच्या कलाविष्कारांना खतपाणी मिळालेलं आपल्याला दिसतं. आणि त्यातून अगणित उत्तमोत्तम, डोळे दिपविणाऱ्या कलाकृती निर्माण झाल्या. आणि एका दृष्टीने त्या कलाकृती मानवी समाजाच्या प्रवासाचा आणि जडण घडणीचा आलेखही आपल्या समोर मांडताना दिसतात.
कधीकधी असंही म्हटलं जातं की कोणातरी राजाच्या किंवा धर्मगुरूंच्या अहंकाराखातर अश्या कलाकृतींची निर्मिती करताना किती सामान्य लोकांचं रक्त सांडलं असेल, किती लोकांना गुलाम केलं गेलं असेल, किती लोकांच्या अश्रू आणि अस्थींनी अश्या वास्तूंचा पाया भरला असेल? पण हे सर्व समजा जरी खरं मानलं तरी त्यातून निर्माण झालेल्या ह्या कलाकृतींची कला म्हणून गुणवत्त्ता कमी ठरत नाही. दुसरं असं की ज्या काळात ही निर्मिती झाली त्या काळात तरी धर्म ही इतकी मनाला संमोहित करणारी गोष्ट होती (आणि तेंव्हाच का कदाचित आजही) की लोकांनी आपलं रक्त ह्या वास्तू निर्माण करण्यासाठी खुशीने सुद्धा सांडलं असेल.
खजुराहोच्या बाबतीतही हे सर्व खरंच आहे. ज्या काळात (दहाव्या शतकापासून ते सुमारे बाराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत) खजुराहोच्या देवळांची निर्मिती झाली, त्या काळातील तंत्रज्ञान आणि साधनं पाहता मानवी हातांनी अगणित कष्ट उपसल्या शिवाय अश्या वास्तू आणि त्यावरील कलाकृती उभारणं शक्यंच नव्हतं. मात्र ह्या कष्टांतून जे निर्माण झालं ते थक्क करणारं आहे. तसंच आधी मी म्हटल्याप्रमाणे नवव्या ते तेराव्या शतकातल्या मध्य भारतातील समाजस्थितीचं चित्रंही त्यात प्रतिबिंबित झालेलं आपल्याला दिसतं.
एकाच आराखड्याचं निष्ठेने पालन करून सुद्धा असं वैविध्य निर्माण करणे हे उच्च सर्जनशीलतेचं निदर्शक आहे. त्याचं एक उदाहरण म्हणून हे दोन फोटो पहा (दुसरा आणि तिसरा) - दोन्ही नरसिंह अवताराची चित्रं आहेत. पाहिलं लक्ष्मण मंदिराच्या भिंतीवरचं, दुसरं चतुर्भुज मंदिरातील. दोन्हीतील तपशील संपूर्णपणे वेगळा.
किंवा हे लक्ष्मण आणि कंदरिय महादेव मंदिरांचे मुख्य कळस (चौथा/पाचवा फोटो) - दोघांचा आकृतिबंध एकच, एकाच प्रकारचे मूलभूत घटक वापरलेले, पण बारकाईने पहा, त्या सर्वांचा एकत्रित अविष्कार पूर्णपणे भिन्न.
अथवा पहा आठवा फोटो - विष्णू आणि लक्ष्मीचा आणि नववा - बहुधा कामदेवाचा. दोन्हीतील पेहरावांचे आणि अलंकारांचे बारकावे बघा.
किंवा हा दहावा फोटो - कंदरिय महादेव मंदिराच्या भिंतीच्या एका भागाचा. बारकाईने पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की ह्यातील प्रत्येक मूर्ती, इतर सर्वांपेक्षा निराळी आहे.
मी येथपर्यंत खजुराहोच्या वर्णानासाठी सुमारे ५०० शब्द खर्च केले आहेत आणि तरी "Kamsutra Temple" ह्या खजुरहोच्या दुनियाभरच्या प्रसिद्धीला अनुरूप एकही उल्लेख त्यात आलेला नाही. त्याचं कारणही मी वर वर्णन केलेल्या कंदरिय महादेव मंदिराच्या भिंतीच्या फोटोवरून स्पष्ट होईल. ह्या भिंती समोर उभं राहिल्यावर फोटोमध्ये जसं दिसत आहे तसंच दृश्य प्रत्यक्ष डोळ्याला दिसतं. ह्या फोटो मध्ये ३-४ संभोगावस्थेतील जोडप्यांची चित्रं आहेत. त्यात एक समलिंगी संभोगाचं सुद्धा आहे. खोलात जाऊन निरखून बघितलं तरच ती तुम्हाला सापडतील. जर आमच्या गाईडने आपल्या विजेरीचा झोत टाकून आमचं लक्ष मुद्दाम वेधलं नसतं तर थक्क करणारा एव्हढा महान शिल्पकलेचा अविष्कार डोळ्यासमोर असताना त्यातील “त्या” चार चित्रांकडे आमचं लक्ष सुद्धा गेलं नसतं.
आधी म्हटल्या प्रमाणे कलेच्या अविष्कारात त्या त्या काळातील समाजस्थितीचं प्रतिबिंब असतंच. खजुराहोच्या शिल्प कलेतही, देवादिकांच्या चित्रांबरोबरच (एकूण संख्येच्या दृष्टीने पाहिलं तर धार्मिक प्रतिमाच बहुसंख्येने आहेत), सामान्य जीवनातील घटनांना (काहींचे फोटो आधीच आपण पाहिले) उदाहरणार्थ, शिकारीला जाणारा राजा, राजाचा दरबार, संगीताची मैफिल इतकच काय तर ओझी वाहणारे हमाल आणि रस्त्यात चाललेली मारामारी ह्यांनाही येथे स्थान आहे. कामभावना तर गृहस्थाश्रमाचा पायाच आहे. त्यामुळे खजुराहोच्या शिल्पात कामभावनेलाही स्थान असण्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं किंवा आक्षेपार्ह असण्याचं कारण नाही. मोजमापच करायचं असेल तर एकूण शिल्पांपैकी संख्येने १०% पेक्षाही कमी शिल्पं (आणि प्रत्यक्षात वापरलेलं क्षेत्रफळ मोजलं तर त्याही पेक्ष्या कमी) कामुक वर्गात मोडणारी आहेत. संभोगक्रीडेची चित्रं पाहायची ह्या एकाच उद्देशाने जे खजुराहोला जातील त्यांना ती दिसतीलच. पण म्हणून खजुराहो म्हणजे “कामक्रीडेचं चित्रमय पाठ्यपुस्तक” अशी त्याची प्रसिद्धी करणाऱ्यांची वृत्ती निव्वळ आंबटशौकी असंच म्हणायला पाहिजे.
मी पूर्वेला जपान/कंबोडियातील शिन्तो आणि हिंदू/बौद्ध प्रेरणेतून निर्माण झालेल्या कलाकृती पासून पश्चिमेला पेरू/बोलिव्हियातील तिवानाकु/इंका देवालयापर्यंत (आणि मधल्या युरोप, इजिप्त सारख्या प्रदेशांत) जगभरातील विविध संस्कृतिंची प्रार्थनास्थळं बघत हिंडलो. कुठल्याही धर्मभावनेने नव्हे तर त्या त्या ठिकाणी आढळणाऱ्या कलाकृती निरखण्यासाठी. खजुराहोला जो कलाविष्कार दिसला, तो कुठल्याही कसोटीनुसार त्यातील मी पाहिलेल्या सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक आहे.
मोहमद असीम नेहाल नावाच्या कवीची एक सुंदर
कविता आहे (मराठीत त्याचं रूपांतर काहीसं असं आहे) –
“प्रत्येक भग्न भिंतीचा प्रत्येक दगड म्हणजे
त्या भिंतीच्या शांततेमध्ये दडलेली एक कथा आहे,
त्यांवरून एक हळूवार हात फिरवा,
जिवंत होऊन सांगतील ते तुम्हाला ह्या कथा
–
प्रेमाच्या, क्रौर्याच्या,
मत्सराच्या, औदार्याच्या आणि मृत्युच्याही,
पण तुमच्या छातीत एक हृदय पाहिजे ती शांतता ऐकण्यासाठी”.
आणि खजुराहोच्या बाबतीत मी पुढे जाऊन असंही म्हणेन
“आणि पाहिजे नजर आंबटशौकाने अंध न झालेली”
मगच दिसेल तुम्हाला खजुराहोचं अद्भुत!
No comments:
Post a Comment