भूगर्भशास्त्रज्ञांच्या मतानुसार, सुमारे १८-२० कोटी वर्षांपूर्वी गोंडवन ह्या महाखंडाचे तुकडे व्हायला सुरुवात झाली - त्यातूनंच आजचे आफ्रिका, अण्टार्क्टिका, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय उपखंड असे तुकडे वेगवेगळे निघाले. सुमारे ८-९ कोटी वर्षांपूर्वी मादागास्कर बेट भारतीय उपखंडा पासून तुटून वेगळं झालं. आणि आजपर्यंत एव्हढा दीर्घ काळ जगातील सर्व प्रमुख भूखंडांपासून विलग राहिल्यामुळे मादागास्कर मधील जीवनाची उत्क्रांती पूर्णपणे वेगळ्या वाटेने होत राहिली. समुद्रातून वाहून योगायोगाने मादागास्करला जी काही जीवन बीजे जगाच्या इतर भागातून पोचली असतील आणि त्यांचा स्थानिक जीवनाबरोबर संकर होऊन जे काही आनुवंशिक (Genetic) साधर्म्य मादागास्कर आणि इतर जगातील संबंधित प्रजातींमध्ये निर्माण झालं असेल तेव्हढंच. त्यामुळे मादागास्कर मधील ८५% वनस्पती आणि प्राणी दोहोंच्या प्रजाती जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत. म्हणूनच मादागास्करच्या जंगलातून आणि दऱ्याखोऱ्यातून फिरणे हा एक अद्वितीय अनुभव आहे - झाडं, पानं, फुलं, कीटक, जलचर, वनचर सर्व काही पूर्वी कधीही न पाहिलेलं!
“लीमर” (Lemur) हा ही त्यातलाच एक प्राणी - जगात कुठेही न आढळणारा. लीमर हा Primate (ज्यामध्ये माकड, वानर, गोरिला, लोरीस ह्यासारखे प्राणी आणि मानव सुद्धा समाविष्ट आहेत) ह्या गटात मोडणारा प्राणी आहे. मात्र लीमर आणि आणि माकडं ह्यांच्या दिसण्यात आणि वागण्यात साम्य आढळलं तरी लीमर म्हणजे माकड नव्हे. जीवशास्त्रानुसार माकड, एप, माणूस वगैरे प्राण्यांचा सिमियन गटात समावेश होतो तर लीमर हा स्ट्रेपसिऱ्हीनी गटात मोडतो. सुमारे ६-७ कोटी वर्षांपूर्वी ह्या आज आढळणाऱ्या प्राण्यांच्या (मानवसकट) वंशवेली कुठल्यातरी समाईक पूर्वजापासून वेगवेगळ्या झाल्या असाव्यात. आणि त्याच सुमारास भूगर्भातील उलथापालथीमुळे विलगलेल्या मादागास्करवर अडकलेल्या ह्या पूर्वजांची पुढच्या उत्क्रांतीची वाटचाल आपल्या भाऊबंदांपेक्षा वेगळ्या वाटेने होऊन त्याची परिणीती आज दिसणाऱ्या लीमरमध्ये झाली असावी.
अर्थात सिनेमातले आणि प्रत्यक्षातले लीमर ह्यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. लीमरच्या जाती-पातीत दिसण्या/वागण्यात, सामाजिक व्यवहारांत, खाण्यापिण्यात, वसतीक्षेत्रांत किती विलक्षण वैविध्य आहे हे मला मादागास्करला जाईपर्यंत अजिबात माहिती नव्हतं.
लीमरच्या प्रजातीच १००च्या वर आहेत. त्यात निशाचर जाती आहेत, दिनचरही आहेत, एकपत्नीव्रती आहेत तसेच मोठा जनानखाना बाळगणाऱ्या आहेत, मांसाहारी आहेत तश्याच संपूर्ण शाकाहारी आहेत, आणि शाकाहारी जातींतही फक्त पानं किंवा फक्त फळं किंवा फक्त झाडाचा चीक खाणाऱ्यासुद्धा आहेत, कधीच पाणी न पिणाऱ्या आहेत, जमिनीवर भटकणाऱ्या आहेत, वृक्षांच्या शेंड्यावरच कायम वास्तव्य करणाऱ्याही आहेत!
आकारानेही तुमच्या तळहातावर बसू शकतील अश्या केवळ ३०-४० ग्राम वजनाच्या निशाचर Mouse-Lemur (दुसरा फोटो)पासून ते १०-१२ किलो वजनाच्या Indri पर्यंत (तिसरा फोटो)!
पण त्याच रणांगणाच्या केवळ एक फूट खालच्या फांदीवर दोन Red Fronted Brown लीमर (पाचवा फोटो) शांतपणे बसून वर चालेल्या मारामारीची मजा बघत होते!
सकाळी अँडासिबेच्या हिरव्यागार ट्रॉपिकल जंगलात शिरताना पावसाचा थोडासा सुखद शिडकावा झाला आणि नंतर सूर्य वर आला तरी आजूबाजूच्या दाट वनराईच्या शेंड्यांवर धुक्याची दुलई अजून होती. त्यामुळे आम्ही जरा काळजीतच होतो कारण आम्ही होतो Indri आणि Golden Sifaka च्या मागावर. हे दोन्ही लीमर क्वचितच जमिनीवर उतरतात. त्यांचं कायम वास्तव्य झाडांच्या शेंड्यावरच, ५०-६० फूट उंचीवर. तेव्हढ्यात आम्हाला ऐकू आलं उच्चरवात चाललेलं Indri चं गाणं - Indri च्या ह्या संगीतात आणि देवमाश्याच्या ललकारीत कमालीचं साम्य आहे. आणि आवाजाचा माग काढीत जरासं पुढे गेल्यावर दिसली सकाळच्या न्याहारीत मग्न असलेली त्यांची टोळी.
अँडासिबेच्या जंगलात जरी दिनचर लीमरच्या अनेक जाती दिसल्या असल्या तरी, रात्री बराच काळ झाडा-झुडुपांना ठेचकाळत फिरूनही निशाचरांचं दर्शन मात्र झालं नव्हतं.
असो.पाहिलेल्या सर्वच लीमर जातींचं आणि मादागास्कर मधल्या सर्वच निसर्गाच्या चमत्कारांचं वर्णन शब्दमर्यादेमुळे इथे करणं शक्य नाही.
पण त्यातील सिंगी (Tsingi) ह्या विलक्षण जागेची तोंडओळख पुढच्या लेखात.
No comments:
Post a Comment