Wednesday 7 December 2022

सिलोलीची अद्भुत दुनिया - २


मागच्या अंकात उल्लेख केलेल्या लगुना होंडाचे फोटो (पहा मागील भागातील शेवटचा फोटो) काढून होईपर्यंत सूर्य पश्चिमेकडील माऊंट अरारालच्या (१९००० फूट) उंच शिखराच्या मागे जाऊ लागला. आधीच आम्ही समुद्र सपाटीपासून जवळ जवळ १४००० फुटांवर असल्यामुळे थंडी वाजतच होती. त्यात थोडीशी उब देणाऱ्या किरणांनी पळ काढायला सुरुवात केल्यावर थंडीने नाकाचा शेंडा आणि कानांच्या पाळ्यांचे लचके काढायला सुरुवात केली. त्यामुळे आम्ही माउंट ट्रेस पुंतास (मराठीत त्रिशूल) हे उत्तुंग शिखर उजव्या बाजूला टाकून आमच्या रात्रीच्या निवाऱ्याच्या - टेका डेल देसीएर्तो (अक्षरशः वाळवंटातील आसरा) - दिशेने गाडी काढली.


डोकं टेकायला जागा होती, शेकोटीच्या बाजूला बसून पोटाला आधार द्यायला गरम सूप आणि रोस्ट चिकन होतं, रात्री बर्फ पडलाच तर डोक्यावर छत होतं. आणखी काय पाहिजे? रात्री बर्फ काही पडलं नाही पण रात्री शून्याखाली तपमान गेल्यामुळे थिजलेले दवबिंदूंचे स्फटिक सकाळच्या कोवळ्या उन्हात हिऱ्यांसारखे चमकत होते.

सकाळी आम्हाला पाहिलं ठिकाण गाठायचं होतं ते म्हणजे आर्बोल द पीद्रा (मराठीत अश्मवृक्ष). दगडाचं झाड?? प्रागैतिहासिक काळातील भौगर्भिक उत्पातांच्या ज्या खुणा अजूनही मागे राहिल्या आहेत त्यातीलच ही एक. झाडाच्या आकाराची १५-२० फूट उंचीची  शिळा! (पहिला आणि दुसरा फोटो. फोटोत उजवीकडे मागे सुप्त ज्वालामुखी कौवाना १८००० फूट).


पण नुसतं हे दगडाचं झाडंच नव्हे तर येथे संपूर्ण  पठारावर, मागील अंकात आपण पाहिलेल्या वॅले द रोकास सारखेच चित्रविचित्र आकारांत निसर्गानेच कातलेले प्रचंड कातळ पसरलेले होते. पण ह्या वैराण दिसणाऱ्या वाळवंटातही जीवन सुखरूप आहे ह्याचा पुरावा देणारा एक कुल्पेओ (लांडग्याचा मावसभाऊ) सुद्धा तेव्हढ्यात एका कातळामागून डोकावून गेला. ह्या सर्व दृश्याला पार्श्वभूमी होती सिलोली वाळवंटाच्या विलक्षण नारिंगी, तपकिरी रंगछटांची. मी माझ्या प्रवासांत अनेक वेगवेगळी वाळवंट पहिली - राजस्थानातील थर, आफ्रिकेतील सहारा, मंगोलियातील गोबी, अमेरिकेतील मोहेव, पण असे चमकदार रंग पाहिल्यानेच पाहत होतो. 

पण निसर्गाच्या रंगसंगतीचा एक वेगळाच चमत्कार आणखी तासाभरातच आम्हाला दिसणार होता, हे मात्र आमच्या गाईडने आम्हाला सांगितलं नव्हतं! “हा पहा लगूना कोलोराडा” एका टेकाडाला वळसा घालून पुढे गेल्यावर आमचा गाईड म्हणाला. “कोलोराडा”??? ह्या स्पॅनिश नावाप्रमाणे बघितलं तर समोरच्या विस्तीर्ण सरोवराचा रंग लाल, तांबडा असायला हवा होता. समोर तर डोळ्यांना सुखवणारी निळाई पसरलेली होती.

लाल रंगाचे ठिपके फक्त त्या पाण्यात फिरणाऱ्या फ्लेमिंगोच्या पंखांवर दिसत होते. “थांबा, थोडा धीर धरा, सूर्य अजून  पूर्ण वर आला नाही आहे” आमचा गाईड म्हणाला. आणि खरंच जसजसा सूर्य पलीकडच्या डोंगराआडून वर आला तसतसा एखादा प्रचंड कुंचला समोरच्या त्याहूनही प्रचंड कॅनव्हासवर फिरावा तसा सरोवराच्या पलीकडच्या काठापासून आमच्या समोरच्या पाण्यावर गुलाबी रंग पसरत आला आणि पाण्याची निळाई हळूहळू नाहीशी झाली. (पहा पुढचे दोन फोटो - पोचलो तेंव्हाचा आणि पाऊण तासानंतरचा).


आम्ही जर मध्यान्ह होई पर्यंत तिथे थांबलो असतो तर कुंकवा सारखा लाल रंगही दिसला असता. पण आम्हाला अनेक असे चमत्कार वाटेत पाहून संध्याकाळच्या आत चिले देशाची सीमा ओलांडणं जरूर होतं. 


आमचा पुढचा थांबा होता सोल द मन्याना (शब्दशः “उगवता सूर्य”). नरकात जाणाऱ्या पापात्म्यांना उकळत्या पाण्याच्या कुंडात किंवा गरम तेलाच्या कढईत बुडविण्याची शिक्षा अनंत कालपर्यंत दिली जाते असं म्हणतात. नरकाची ही कल्पना सोल द मन्याना सारख्या एखाद्या जागेवरूनच कोणालातरी सुचली असणार (पहा पाचवा फोटो).

कारण एका मोठ्या पठारावर इथे आहेत सर्वत्र पसरलेली उकळत्या पाण्याची उंच उडणारी कारंजी, तप्त गंधकाची डबकी, आत पडलात तर क्षणात हाडं सुद्धा विरघळून जातील अशी वाफेचे बुडबुडे येणारी दलदल. 


निदान इथल्या सर्व गोष्टींमध्ये काहीतरी सुसंगती होती - डबकी, झरे, कारंजी, दलदल, सर्वच जाळून/भाजून जीव घेणारी. पण आणखी थोडं पुढे गेल्यावर आलं सरोवर लगुना सलादा (मराठी मध्ये खारं सरोवर) आणि  तेर्मास द पोल्कस (शब्दशः मराठीत; गरम झरे) ही छोटी वस्ती (पहा सहावा फोटो).



एकाच सरोवराच्या एका कोपऱ्यात सुमारे ४५ ̊ सेल्शिअस म्हणजे अंगाला चांगले चटके बसतील इतकं गरम तर दुसऱ्या बाजूला बोट बुडवलं तर गोठून जाईल एव्हढं थंड पाणी. आम्ही एकीकडे  काठावर नखशिखांत गरम कपडे घालून थंडीपासून आपला बचाव करत होतो, तर त्या गरम पाण्याच्या भागात कोणीतरी दोघे नुसत्या चड्ड्या घालून पोहत होते! आम्हालाही त्यात एक डुबकी मारायला चाललं असतं पण दुपारी ३ वाजायच्या आत बोलिव्हियाची सीमा ओलांडून चिले मध्ये प्रवेश करणं जरूर होतं. कारण त्यानंतर चिलेची  इमिग्रेशनची चौकी बंद झाली असती आणि आम्हाला आणखी एक रात्र त्या वाळवंटात १४००० फुटांवरील रक्त गोठविणाऱ्या थंडीत कुडकुडत घालवावी लागली असती (शेवटी झालं तसंच, पण त्या गोंधळाची कथा पुन्हा कधीतरी). त्यामुळे लगुना सलादा वरून वाटेत लागणाऱ्या लगुना बियांका (मराठीत सफेद)



आणि लगुना व्हर्दे (हिरवे सरोवर) सारख्या अनोख्या रंगांच्या सरोवरांची शोभा बघण्यातसुद्धा फार वेळ ना घालवता  गाडी हितो काहोनच्या सीमेवरील वस्तीच्या दिशेने भरधाव सोडली. 


ह्यापूर्वी मी वाळवंट अनेक पहिली - थर, कछचं रण, सहारा, मंगोलियात तर उलानबतार ह्या राजधानीच्या ठिकाणी जाताना मी एक संपूर्ण दिवस प्रवास गोबी वाळवंटातून केला होता. ह्या सर्व ठिकाणांचा स्थायीभाव म्हणजे सर्वत्र असणारा एकसारखेपणा - कुठल्याही दिशेला पहा, तेच ते दृश्य, तेच वाळूचे ढिगारे, तोच एकरंगी रखरखाट. सिलोली वाळवंटासारखं वैविध्य, रंगांची उधळण (ह्या शेवटच्या फोटो मध्ये रंगांच्या किती छटा आहेत त्या मोजा), धूर ओकणाऱ्या जागृत ज्वालामुखी पासून डोळे निवविणाऱ्या निळ्या सरोवरांपर्यंत दिसणारे अनेक चमत्कार मात्र मी कधीच अनुभवले नव्हते. 


No comments:

Post a Comment

  विसरलेले समाज - २ : टुलोर   चिले देशातील अटाकामा असा प्रदेश आहे जिथे अनेक ठिकाणी गेल्या ५०० वर्षात पाऊसच पडलेला नाही. आणि जेथे पडतो तेथे...