मी हॉटेलमध्ये पोचल्याबरोबर खोलीत शिरून दार बंद केलं, आणि पहिली गोष्ट केली म्हणजे हाताच्या बोटाला थेंबभर पाणी लावून ते भिंतीवर घासलं आणि तोंडात घातलं. आता वय साठीच्या पुढे गेल्यामुळे अगदीच लहान मुलासारखं भिंत थेट जिभेनं चाटून पाहण्याचं धैर्य काही मला झालं नाही! कारण आमचं उयुनी (बोलिव्हिया) वाळवंटाच्या सीमेवरचं हे हॉटेल मिठाच्या विटांनी बांधलं आहे असं ऐकिवात होत. भिंतीच्या विटा जरी मिठाच्या बनविलेल्या दिसत असल्या (खडे-मिठाचे स्फटिक त्यात स्पष्ट दिसत होते) तरी चाटलेलं बोट काही खारट लागलं नाही. माझ्यासारख्या पाहुण्यांनी चाटून चाटून भिंतींना खड्डे पाडू नये म्हणून बहुधा त्यावर कसलं तरी संरक्षक पण पारदर्शक रोगण लावलेलं होतं. (पहिला फोटो)
अर्थात आमचं हॉटेल मिठाच्या विटांनी बांधलं ह्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नव्हतं. कारण आजूबाजूच्या १०००० स्क्वे. की.मी. पेक्षाही मोठ्या परिसरात मिठाशिवाय दुसरं काहीच नाही. सालार दे उयुनी किंवा उयुनी सॉल्ट फ्लॅट्स - ह्याचं मराठीत नक्की भाषांतर कसं करावं हे मलातरी माहित नाही. मिठाचं मैदान असं म्हटलं तर त्याच्या प्रचंड आकाराची (१०००० स्क्वे. की.मी) कल्पना वाचणाऱ्याला येणार नाही. मिठाचं वाळवंट म्हणावं तर तिथे कणभर सुद्धा वाळू दिसायची नाही. आपल्या देशातही कछच्या वाळवंटाचा काही भाग दर वर्षी काही महिने असाच मिठाने झाकलेला असतो. पण मूलतः तो प्रदेश वाळवंटच आहे. दर वर्षी पावसाळ्यात नजीकच्या समुद्राचं पाणी ह्या वाळवंटी प्रदेशावर पसरतं आणि पाऊस संपल्यावर त्याचं बाष्पीभवन होऊन मिठाचा थर मागे राहतो.
सालार दे उयुनी मात्र सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वी तिथे असलेल्या तलावाचं (लेक मिंचिन) पाणी भूगर्भात घडलेल्या घडामोडींमुळे आटून गेल्यामुळे निर्माण झालं. ह्या उलथापालथी नंतर समुद्रसपाटीपासून सुमारे ३७०० मीटर्स (१२००० फूट) उंचावरच्या ह्या पठारावर मागे राहिला, तो मुख्यतः मीठ (सोडियम क्लोराईड) आणि मॅग्नेशियम क्लोराईड, लिथियम क्लोराईड ह्यांनी बनलेला कित्येक मीटर खोल थर. येथील लिथियमचा साठा सर्व जगातील लिथियम पैकी सुमारे ७ टक्के इतका मोठा आहे. लिथीयमला आजच्या पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याच्या प्रयत्नांमध्ये फार महत्व आहे. कारण पर्यावरणनाशक विद्युत उत्पादनाला (खनिज तेल, कोळसा वापरून होणाऱ्या) पर्यायी कुठल्याही पद्धती (सौर ऊर्जा, पवन ऊर्जा इत्यादी) ऊर्जेचा साठा करण्याच्या कार्यक्षम बॅटरी तंत्रज्ञानाशिवाय व्यवहार्य होणं शक्य नाही, आणि लिथियम हा ह्या बॅटरीमधील प्रमुख घटक आहे. उयुनीचं हे शुभ्र पठार इतकं सपाट आहे, की ह्या पठाराच्या समुद्रसपाटीपासूनच्या उंचीमध्ये एक मीटर पेक्षा कमी भिन्नता त्याच्या १०००० स्क्वे.की.मी क्षेत्रात आढळून येते. त्यामुळे अवकाशात फिरणाऱ्या उपग्रहांमधील अल्टीमीटर (समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्याचं यंत्र) किती अचूक आहेत हे ठरविण्यासाठी (कॅलिब्रेशन) ह्या पठाराचा वापर केला जातो!
अर्थात उयुनीची जादू ह्या अश्या रुक्ष माहितीमध्ये दडलेली नाहीच. उयुनीची जादू आहे त्याच्या अथांगतेत, अमर्यादित विशालतेत. ती आहे त्याला शब्दात पकडण्याच्या कुठल्याही प्रयत्नांच्या असमर्थतेत, आणि कुठल्याही कॅमेऱ्याच्या फोटोत बद्ध होण्याच्या अशक्यतेत.
किनाऱ्यावर उभं राहून समुद्राचं नजर पोचेल तेथपर्यंत दिसणार निळं पाणी किंवा एखाद्या डोंगर माथ्यावरून दिसणारं अथांग आकाश पाहण्याची आपल्याला सवय असते. पण अश्या जागी काहीतरी सतत घडत असतं, समोरच्या दृश्यामध्ये काहीतरी वैविध्य असत. एखादी लाट समुद्राच्या पाण्यात उसळी घेते, आकाशातून एखादा ढग तरंगत जातो किंवा एखादी घार दूरवर घिरक्या घेताना दिसते. जरा नजर वळवली तर एखादी माडांची राई दिसते, डोंगराच्या उतारावर हिरव्या गवतात पडलेला पिवळ्या फुलांचा सडा दिसतो. बाकी काही नसलं तरी वाऱ्याचा आवाज कानावर पडतो.
उयुनीच्या पठारावर उभे राहिल्यावर फक्त दोनच रंग नजर फिरवावी तिथे दिसतात - डोळे दिपवणारा, शुभ्र एकसंध पांढरा आणि तो संपतो तेथपासून दिसणारा गर्द निळा. भवताली संपूर्ण अंधार झाल्यावर जशी पूर्व कुठली, पश्चिम कुठली अशी दिशांची जाणीव पूर्णपणे नाहीशी होते, तसंच इथे चकचकीत सूर्यप्रकाशात होऊन जातं. आणि निःस्तब्धता तर अशी, की आपल्याच पापण्यांची फडफड आपल्याच कानावर पडावी, आपल्याच हृदयाचे ठोके ढोल वाजविल्यासारखे आपल्यालाच ऐकू यावेत.
समोर पाहण्यासारखं काहीही - म्हणजे एखादा हिमालयासारखा उत्तुंग पर्वत, वेरूळ सारखी थक्क करणारी कलाकृती, अथांग सागर, फुलांचा गालिचा घातलेलं कास सारखं पठार असं काहीही - नसतानासुद्धा आपण काहीतरी भव्य, नेत्रदीपक पाहत आहोत असा अनुभव ह्यापूर्वी मलातरी कधीच आला नव्हता. ही दृष्टीला न दिसणारी पण मनाला जाणविणारी भव्यता फोटो मध्ये पकडणं मला तरी शक्य नाही - पण तरी सुद्धा दोन फोटो वानगी दाखल इथे जोडले आहेत.
जो लेक मिंचिन आटल्यामुळे उयुनीची निर्मिती झाली त्याचे अवशेष काही भागात अजूनही आहेत. आणि उयुनीचा तो भाग पाण्याच्या अगदी उथळ (२ - ४ सेंटीमीटर) थराखाली झाकलेला आहे. हे पाणी इतकं अविचल असतं की त्याचा कित्येक की.मी. व्याप्तीचा आरसा बनतो (चौथा फोटो).
इथे पाऊस क्वचितच पडतो आणि जेंव्हा पडतो तेंव्हा अगदी थोडा पडतो. परंतु जेंव्हा तो पडतो तेंव्हा जवळ जवळ संपूर्ण उयुनीचा असा प्रचंड आरसा होतो. आणि सूर्यास्ताच्या वेळी ह्या आरशात निर्माण झालेलं दृश्य केवळ अवर्णनीय असतं (शेवटचा फोटो)
उयुनीला लागूनच सुरु होणारं आणि चिले देशाच्या सीमेपर्यंत पसरलेलं सिलोली वाळवंट हा ही असाच चमत्कारांनी भरलेला अद्भुत प्रदेश आहे. त्याचा प्रवास पुढच्या दोन लेखात.
No comments:
Post a Comment