Sunday 11 December 2022

नागालँड


दर वर्षी डिसेम्बरच्या पहिल्या आठवड्यात नागालँड मध्ये किसामा गावाजवळ हॉर्नबिल फेस्टिवल साजरा केला जातो. आम्ही अर्थात तिथे नोव्हेंबर मधेच गेल्यामुळे, हा उत्सव प्रत्यक्ष पाहायला मिळणं शक्यच नव्हतं. पण किसामामध्ये चाललेल्या पूर्वतयारीमधून सुद्धा दिसणारी नागालँडच्या पारंपरिक प्रथा, कला आणि नागा संस्कृतीची वैशिष्ठ्ये ह्यांची झलक फारच उद्बोधक होती - विशेषतः  माझ्या सारख्या ह्याविषयी पूर्णपणे अनभिज्ञ असणाऱ्याला. तिथे मुख्य तयारी चालली होती ती नागालँडच्या १६ जमातींचे (tribes)  मोरुंग (Community Hall) बांधण्याची.

मोरुंग हे पूर्वापार प्रत्येक नागा जमातीच्या समाजजीवनाचं केंद्रस्थान होतं आणि जरी आधुनिक काळात नागा समाज झपाट्याने बदलत असला तरी कोहिमा/दिमापूर सारखी मोठी शहरं सोडली तर इतरत्र अजूनही काही प्रमाणात त्याचं महत्व टिकून आहे. एकेकाळी मोरुंग होती, संध्याकाळी शेतावरून दमून भागून आल्यावर एकमेकांशी सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्याची जागा, जमातीच्या भवितव्याबद्दलचे निर्णय सर्वानुमते घेण्यासाठी ज्येष्ठ पुढाऱ्यांची भेटण्याची जागा, गावातील वयात येऊ घातलेल्या आणि लग्न करून संसार अजून न थाटलेल्या तरुणांच्या वसतिगृहाची आणि त्यांना जमातीचा इतिहास, परंपरा आणि निष्ठा ह्याचे शिक्षण देण्याची जागा. आणि आजही हे मोरुंग गावागावातील सार्वजनिक आयुष्याचा महत्वाचा भाग आहेत.


एका दृष्टीने मोरुंग त्या त्या जमातीच्या व्यक्तित्वाचं एक महत्वाचं प्रतीक आहे, त्यामुळे असेल कदाचित, पण हे गावागावातील मोरुंगसुद्धा त्या त्या जमातीच्या वैशिष्ठ्यपूर्ण शैलीमध्ये सजवलेले दिसतात. आणि हॉर्नबिल उत्सवासारख्या प्रसंगीतर मोरुंग सजविण्याची चढाओढच सगळ्या जमातींमध्ये लागते. उदाहरणार्थ कोन्याक आणि चांग ह्या दोन जमातींचे हे मोरुंग (पहिले दोन फोटो) आणि त्यांची नेत्रदीपक सजावट पहा. आणि तरी मी हे फोटो काढले तेंव्हा दोन्ही अर्धवटच बांधून झाले होते.


जरी ही पारंपरिक tribal समाजव्यवस्था काळाबरोबर बदलत असली तरीही कोहिमा सारखं शहर सोडून बाहेर पडल्यावर खोनोमा किंवा झुलेके सारख्या खेड्यांमध्ये हिंडताना जाणवतं की स्थानिक लोकांची स्वत्वाची जाणीव अजूनही त्याच्या कुळाच्या  (Clan) आणि अशी अनेक कुळे एकत्र जोडली जाऊन बनलेल्या जमातीच्या (Tribe) व्यक्तित्वाशी अपरिवर्तनीय रीतीने जोडलेली आहे. त्यामुळे तिथे  “भाऊ” किंवा “काका” अश्या शब्दांचा अर्थ आपल्याला अनपेक्षित एव्हढा व्यापक होऊ शकतो. आणि कुटुंब ह्या शब्दाची व्याप्ती अर्धाधिक गाव सामावून घेऊ शकते. स्थूलमानाने जरी सर्व नागा समाजाच्या परंपरा आणि संस्कृती समसमान असली तरी वेगवेगळ्या जमातींच्या दैनंदिन व्यवहारातील फरक मात्र  सहज जाणवण्या सारखे आहेत. 


गावाच्या वेशीवरील सजावट (तिसरा फोटो - खोनोमा ह्या अंगामी गावाच्या वेशीवर चितारलेलं हे भित्तीचित्र पहा) पाहून हे कुठल्या नागा जमातीचं गाव आहे हे सांगता येतं.  खोनोमा मधे अंगामी पद्धतीने शिजवलेला रोहू मासा आणि वोखा मधील एखाद्या लोथा घरातील जेवणातला रोहू माझ्या सारख्या नवख्याच्या जिभेलाही वेगळा लागतो. परंतु जमाती-जमाती मधील  मुख्य दरी आहे बोली भाषेची. १६ जमातींच्या एकमेकाला न कळणाऱ्या १६ बोली भाषा (ह्या १६ जमाती फक्त नागालँड मधल्या. नागालँड बाहेरील  म्हणजे आसाम,मणिपूर, अरुणाचल आणि  म्यानमार मधील सर्व नागा जमाती मोजल्या तर एकूण जवळ जवळ ४० तरी भरतील) ! माओ जमातीच्या एखाद्या सदस्याला कोणा रेंगमाशी संवाद साधायचा असेल तर नागालीश (म्हणजे आसामी आणि बंगाली भाषांच्या मिश्रणातून तयार झालेली भाषा) चा आधार घ्यावा लागतो.

नागा समाजाची स्वत्वाची आणि आपल्या स्वातंत्र्याची भावना कायमच अतिशय तीव्र राहिलेली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच इतरत्र भारतामध्ये ब्रिटिशांनी जवळ जवळ निरंकुश सत्ता प्रस्थापित केली होती. पण १८७९ मध्ये खोनोमा मध्ये अंगामी सैन्याचा पराभव होई पर्यंत (चौथा फोटो - खोनोमा गावातील किल्ला जिथे शेवटची नागा-ब्रिटिश लढाई झाली)  नागा जमातींचा लढा ब्रिटिश सत्तेविरुद्ध सतत सुरूच होता. आणि खोनोमाच्या लढाई नंतर “जितं मया” म्हणून जरी ब्रिटिशांनी आपलीच पाठ थोपटली असली तरी खोनोमा गावाच्या मागच्या उंच शिखरावरील कामचलाऊ गढीत आश्रय घेतलेल्या अंगामी  सैन्याला नमविण्याचा विचार त्यांनी  सोडून दिला. आणि  १८८० मध्ये नागा जमातींचे प्रमुख आणि ब्रिटिश ह्यांच्यातील झालेलय युद्धबंदी करारातील दोन पक्षांची भूमिकाही  जित आणि जेता अशी असण्यापेक्षा परस्परसहकार्याची होती. ह्या गढीच्या ठिकाणी एक पक्कं स्मारक बांधण्याचं काम सध्या चालू आहे.


१९४७ मध्ये  भारताच्या स्वातंत्र्या नंतरही जवळ जवळ १९९७ पर्यंत नागालँडमधील अस्थिरता कायम होती. आणि अजूनही संपूर्णपणे नागा समाजाची स्वायत्ततेची भावना विस्मृतीच्या पडद्याआड गेली आहे असं म्हणता येणार नाही. खोनोमा गावच्या शिवेवरील ह्या ख्रिसानिसा सेई ह्यांच्या स्मारकाचा फोटो पहा (पाचवा फोटो). त्यावरील शिलालेख जरा निरखून वाचा. “नागा भारतीय नाहीत आणि त्यांचा देश भारताचा एक भाग नाही. हे सत्य आम्ही कधीच विसरणार नाही” अशा अर्थाची घोषणा ह्यावर लिहिली आहे. आज आमच्या सारख्या “इंडियन” पाहुण्यांना हे स्मारक मुद्दाम दाखविले जाते!

अर्थात अशी एखादी पूर्वेतिहासाची खूण  किंवा स्थानिक लोकांशी बोलताना सहज संभाषणात येणारा “तुमच्या इंडियात अमुक अमूक” असा एखादा उल्लेख सोडला तर, ह्या भूतकाळातील राजकीय बेबनावाची किंवा त्याला निगडित झालेल्या हिंसाचाराची थोडीसुद्धा जाणीव आजच्या नागालँड मध्ये भटकताना आम्हाला झाली नाही. आम्ही अगदी लहान लहान खेड्यापाड्यात आणि निर्मनुष्य जंगलात दिवस-रात्र फिरलो. कुठेही आणि कधीही, कसलीही धोक्याची भावना आम्हाला जाणवली नाही. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीच्या तोंडावर स्वागताचं हास्य होतं आणि अगदी थोडीशी ओळख झाल्यावर सुद्धा घरी येण्याचं आमंत्रण होतं. 

खास नागा पंच-पक्वान्नांचा (म्हणजे पोर्क, हॉर्नेट्स आणि सिल्कवर्म्स! - सहावा फोटो) आस्वाद घेण्याकरता आम्हाला नागालँड मध्ये फिरण्यासाठी ज्याने गाडी पुरविली होती तो आम्हाला इतका आग्रह करून आपल्या घरी घेऊन गेला की लग्नाच्या पंगतीत जिलब्या खायला सुद्धा कोणी एव्हढा आग्रह हल्ली करत नाहीत!

पण हे सर्व खरं पहाता सगळं विषयान्तरच झालं! कारण आम्ही नागालँडला जायचं मुळात  ठरवलं होतं ते तिथलं सृष्टी सौन्दर्य पाहायला!

नागालँड मधील दोयांग जलाशयाचा परिसर हा अमूर फाल्कन (ससाणा किंवा बाज) ह्या पक्ष्याच्या दर वर्षी होणाऱ्या सायबेरिया ते दक्षिण आफ्रिका ह्या स्थलांतराच्या मार्गावरील विसावा घेणायची प्रमुख जागा आहे. साधारण ऑक्टोबर च्या सुमारास लाखोंच्या संख्येने हे अमूर ससाणे ह्या परिसरात येऊन काही काळ थांबतात. हिंदी महासागर ओलांडून जाण्याआधी क्षणभर विश्रांतीसाठी! एकेकाळी ह्या ससाण्यांची हजारोंच्या संख्येने (एका अंदाजाप्रमाणे जवळपास १३००० ते १४००० दर दिवशी) इथे हत्या केली जात होती. साधारण २०१२-१३ पासून निसर्ग-प्रेमी गटांच्या अथक प्रयत्नांमुळे ह्या हत्येला बंदी घालण्यात आली. हे अमूर फाल्कन बघणे हा आमचा एक प्रमुख हेतू होता. तसंच झूको व्हॅली ह्या नागालँडच्या “Valley of  Flowers” बद्दलही आम्ही खूप ऐकलं होतं. आणि एकूणच निसर्गाने जशी  निर्माण केली तशी अक्षत, मानवाने विनाकारण न तुडवलेली सृष्टी आता आपल्या जवळपास शोधूनही सापडणं कठीण होत चाललं आहे. नागालँडमध्ये तशी ती सापडेल अशी आशा होती.


झूको व्हॅलीला जाण्यासाठी ४-५ तासांचा ट्रेक करावा लागतो. ह्या ट्रेकची सुरुवात जिथून होते त्या विस्वामा खेड्याच्या दिशेने जायला कोहिमा सोडून आम्ही निघालो आणि नागालँडच्या अंतर्भागात शिरल्यावर पहिला धक्का बसला. आणि पुढच्या ८-१० दिवसात नागालँडच्या ग्रामीण भागात फिरताना हा अनुभव पुन्हा पुन्हा येणार होता. अशी कळाहीन खेडेगावं, कच्चा रस्ता सुद्धा म्हणता येणार नाही असे रस्ते, इतकी जीर्ण-शीर्ण  घरं कित्येक दशकांपूर्वी  कोकण किंवा मराठवाड्याच्या मागास भागात फिरताना दिसत.  त्या काळात कोकणातल्या माझ्या गावी जाताना आपली २-४ हाडं ST मध्ये रात्रभर धक्के खाताना हरवायचीच हे अपेक्षितच होत. पण गेल्या काही वर्षात मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात अश्या प्रगत राज्यातून झालेल्या प्रवासात अगदी प्राथमिक सुविधांचासुद्धा इतका अभाव कधी दिसला नव्हता. त्यामुळे असं काही पाहण्याची माझ्या डोळयांची सवय आता  मोडली होती. आणि अगदी उत्तराखंड आणि सिक्कीम सारख्या तुलनेने अविकसित प्रदेशातही असं काही दृष्टीपथात आलं नव्हतं. आपल्याच देशातील एखाद्या प्रदेशात पायाभूत सुविधा नाहीत म्हणजे किती नाहीत ह्याची कल्पना प्रत्यक्ष अनुभवल्या शिवाय मी करू शकलो नसतो. उदाहरणार्थ, अगदी वोखा सारख्या एका मोठ्या जिल्ह्याच्या प्रमुख शहरात एकही पक्का रस्ता नाही! नागालँड मधल्या राजकीय अस्थिरतेचा हा परिणाम आहे की ही राजकीय अस्थिरता हा ह्या विकासाच्या अभावाचा परिणाम आहे हे मी तरी सांगू शकणार नाही.

नागालँडच्या अस्पृष्ट, निष्कलंक निसर्गाची श्रीमंती ह्या पार्श्वभूमीवर अधिकच थक्क करणारी  होती. झूको व्हॅलीला जाणे हे प्रबळ ईच्छाशक्ती असलेल्या (आणि हाडं मजबूत असलेल्या) माणसाचं काम आहे. जवळ जवळ ४ तासांचा उभा चढ, दमछाक झाल्यावर आपला द्रुतगतीने चालणारा श्वास थोडा काबूमध्ये आणण्यासाठी क्षणभरही उभं राहण्यास वाटेत जागा नसलेला, आणि त्यानंतर खिंड उतरून कॅम्पसाईट कडे जाणारा दोन-सव्वादोन तासांचा चढ-उतार.


पण वाटेतील घनदाट अरण्य, डोंगरमाथा ओलांडून पलीकडच्या बाजूला खिंडीत उतरल्यावर दिसणारा पांढरा शुभ्र फुलांचा मैलोन्मैल पसरलेला गालिचा,  आणि डोंगर उतारावरचा गालिचा जिथे संपतो तेथून सुरु होणाऱ्या झूको व्हॅलीतील हिरवाईच्या अगण्य छटा श्रमांनी धडधडणारी छाती आणि गुढघ्यांतून ऐकू येणाऱ्या तक्रारीं ह्यांचा विसर पाडणाऱ्या होत्या (पहा पुढचे ३ फोटो).  


तरी आम्ही स्थानिक जाणकारांच्या मते  झूकोमध्ये महिनाभर तरी उशिरा पोचलो होतो. आम्ही पोचलो तो पर्यंत तिथे फुलणाऱ्या बहुरंगी रानफुलांपैकी फक्त पांढऱ्या फुलांचा (Pearly Everlasting)  बहर टिकून होता. त्यात मधूनच पिवळ्या-सोनेरी (Ragworts) फुलांचे ताटवे चमकत होते. 


त्याक्षणी जे दृष्य दिसत होतं त्यापेक्षाही एक महिन्यापूर्वी अधिक सुंदर म्हणजे काय दिसत असेल ह्याची आम्ही कल्पना तरी करू शकत होतो. मात्र जिथे आम्ही दोन रात्री राहण्याचा बेत केला होता ती कॅम्पसाईट म्हणजे केवळ वर्षानुवर्षांच्या साठलेल्या कचऱ्याचा ढीग असेल अशी कल्पना मात्र आम्ही केली नव्हती. मात्र अश्या त्या  कॅम्पसाईट मध्ये रात्रीच्या आसऱ्याची “सुविधा” पुरविण्याच्या बदल्यात आम्हाला  किती पैसे मोजावे लागतील ह्याचं दर पत्रक कुठल्यातरी स्थानिक तरुण मित्रमंडळाच्या नावाने तिथे लावलेलं होतं.  त्यामुळे एक रात्र कशीबशी काढून दुसऱ्याच दिवशी झूकोच्या अवर्णनीय निसर्गाकडे पाठ करून आम्ही खोनोमा गावात आमचा मुक्काम हलविला.


खोनोमा गावाच्या  ऐतिहासिक महत्व बद्दल मी आधीच बोललो आहे.  पुढचे ६-७ दिवस आमचा मुख्य उद्देश होता खोनोमा, झुलेके आणि वोखा जिल्ह्यातील पंगती (जिथे अमूर फाल्कन आपल्या स्थलांतराचे दरम्यान विश्रांती साठी थांबतात) अशा गावाभोवतालच्या जंगलातून फिरण्याचा आणि जमल्यास थोडं पक्षी निरीक्षण करण्याचा.  आधी उल्लेख केला होता त्या विकासाच्या अभावाची दुसरी बाजू म्हणून कदाचित असेल, पण असं  डोळे तृप्त करणारं , अस्पर्श्य अरण्यवैभव गावांची शिव ओलांडल्या बरोबर सामोरं येईल असा अनुभव महाराष्ट्रात तरी गेल्या काही दशकात मी घेतला नव्हता. 

पंगती गाव तर दोयांग जलाशयाच्या काठावरच आहे असं म्हणता येईल. दोयांगचा विस्तृत परिसर लुझर्न (स्वित्झर्लंड) सारख्या प्रसिद्ध जलाशयापुढेही  निसर्गशोभेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे कमी पडणार नाही (पहा पुढचे दोन फोटो). पक्षी निरीक्षणाबाबतीत मात्र अनुभव थोडा निराशा करणारा होता. एकतर अरण्य सर्वत्र इतकं दाट होतं कि आजूबाजूला पक्ष्यांची गाणी सतत कानावर पडत असून सुद्धा दाट पानांच्या छत्रीत लपलेले पक्षी दिसणं कठीण होतं. दुसरं म्हणजे ज्याला आपल्या परिसरातील पक्ष्याची ठिकाणं आणि सवयी माहित आहेत अश्या स्थानिक माहितगार मार्गदर्शकाविना त्यांना शोधून काढणं कठीणच होतं. त्यामुळे पंगती मध्ये जरी शेकडो अमूर फाल्कनचे थवे उडताना किंवा विजेच्या तारेवर झोके घेताना दिसले असले, तरी ते बऱ्यापैकी लांबूनच. 


अर्थात जिथे माणसांचा वावर नाही आणि झाडाझुडुपांनी समृद्ध अशा जागी विविध पक्षी असतातच, त्यामुळे १५-२० प्रकारचे पक्षी दिसलेच त्यातील  एक दोन सहजी न दिसणारेही निघाले (पुढचे दोन फोटो Broad-tailed Nightjar आणि Kalij-Pheasant)  - . त्यामुळे ही ट्रिप अगदीच भाकड गेली असं नाही.

पण एकूणच नागालँडचा अनुभव संमिश्र असाच म्हणावा लागेल. नागालँडचा इतिहास, संस्कृती आणि समाज ह्याबद्दल काही नवीन शिकायला मिळालं. अर्थात फक्त १०-१५ दिवस एखाद्या नव्या ठिकाणी घालविल्यावर मी काही फार सखोल ज्ञान गोळा केलं असं नाही. पण आपल्याच देशातला एक प्रदेश आपल्याला कसा एखाद्या परदेशापेक्षाही जास्त अनोळखी असू शकतो ह्याची जाणीव झाली हे ही थोडं नाही. निसर्ग वैभव तर भरभरून पाहिलं पण त्याही पेक्षा दिमापूर किंवा कोहिमासारख्या शहरांच्या बाहेर पडून लहान लहान गावातील जीवन प्रत्यक्ष तिथे राहून पाहता आलं ही ही एक जमेची बाजू. पण प्रवास करताना अगदी जबाबदार Eco-tourist म्हणून सुद्धा ज्या किमान सोयींची अपेक्षा करणं रास्त आहे त्यांचा थोडातरी विकास झाला पाहिजे.

No comments:

Post a Comment

  विसरलेले समाज - २ : टुलोर   चिले देशातील अटाकामा असा प्रदेश आहे जिथे अनेक ठिकाणी गेल्या ५०० वर्षात पाऊसच पडलेला नाही. आणि जेथे पडतो तेथे...