Wednesday, 7 December 2022

सायबेरियाची राजकन्या

मी मंगोलियाला जाण्याचं मुख्य कारण होतं मला उलानबाटर मध्ये आगगाडी पकडायची होती सायबेरियाला जायला. सायबेरियापासून पश्चिमेला मॉस्को आणि पुढे सेंट पिटर्सबर्ग पर्यंतच्या ह्या  प्रवासातील काही अनुभवांबद्दल (बुर्यातीया, तातरस्तान) मी आधीच लिहिलेलं कदाचित तुमच्या स्मरणात असेल. हा लेख आहे मुख्यतः इर्कुतस्क ह्या सायबेरियाच्या प्रमुख शहरातील एका असामान्य घरातील एका अविस्मरणीय अनुभवाबद्दल.

रशियन साम्राज्याने सायबेरियाची भूमी पादाक्रांत करायला सुरुवात केली सोळाव्या शतकाच्या शेवटी. पॅसिफिक महासागरापर्यंतचा हा अफाट प्रदेश रशियन साम्राज्याला जोडला गेल्यावर तिथे नांदणाऱ्या तातर, बुरयात, ओस्त्याक अशा मूळ रहिवाशांवर जरब बसविण्यासाठी ह्या जिंकलेल्या प्रदेशात ठिकठिकाणी सैन्याची ठाणी उभारली गेली. १७व्या शतकाच्या मध्यावर, अंगारा नदीच्या किनाऱ्यावर याकोव्ह पोखाबोव्ह नावाच्या रशियन अधिकाऱ्याने बांधलेला इर्कुतस्कचा किल्ला हे त्यातील एक प्रमुख ठाणं. पहिला फोटो - पोखाबोव्हच्या आजच्या इर्कुतस्कमधील स्मारकाचा.


तत्कालीन रशियाच्या राजवटीला करांच्या रूपाने लूट करण्यावाचून सायबेरियाशी इतर काही देणं-घेणं नव्हतं. त्यामुळे इर्कुतस्कच्या स्थापनेचा मूळ उद्देशही स्थानिक जनतेला करवसुली साठी पिळून काढणं, आणि ह्या जुलुमजबरदस्तीला विरोध करणाऱ्यांना तुरुंगात खितपत ठेवणं असा होता. त्यामुळे कायमस्वरूपी  सैनिकी ठाणं बांधण्याआधीच पाहिलं पक्कं बांधकाम अंगारा नदीतील इर्कुत बेटावर केलं गेलं ते एका तुरुंगाचं! 


पुढील कित्येक शतकं (अगदी कम्युनिस्ट राजवटीच्या अखेर पर्यंत) राज्यकर्त्यांच्या नावडत्या व्यक्तीना सक्तमजुरीत पिचत ठेवण्याची जागा म्हणून पूर्व सायबेरियाची जी दुष्कीर्ती (ज्याचं विदारक वर्णन सोल्झेनित्सेनच्या “गुलाग आर्चिपेलागो” सारख्या पुस्तकात सापडतं) झाली त्याची सुरुवातच एका दृष्टीने इर्कुतस्कच्या स्थापने पासून झाली असं म्हणता येईल. 


“तडीपार कैद्यांची काळ-कोठडी” अशी सुरुवात झालेल्या ह्या नगरीची “पूर्वेकडचे पॅरिस” असे परिवर्तन होण्याला  सुरुवात झाली १९व्या शतकाच्या सुरुवातीला. 


फ्रेंच राज्यक्रांतीने प्रभावित होऊन एक नवा उदारमतवाद त्याकाळी रशियामध्ये पसरू लागला  होता. तत्कालीन झार अलेक्झांडरचे निकटवर्ती नातेवाईक आणि  उमरावच ह्या नव्या मनूचा प्रसार करणाऱ्यांचे अग्रणी होते. त्यांनी “Union of Salvation” (मुक्ती संघ) नावाची  संघटनाही स्थापन केली होती. परंतु अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर नव्या राजवटीत पारंपरिक एकाधिकारशाहीच पुढे चालणार, असं दिसल्यावर १८२५च्या डिसेंबर महिन्यात ह्या मुक्ती संघाच्या पुढाऱ्यांनी नव्या झारच्या विरुद्ध बंड पुकारलं. परंतु निव्वळ ध्येयवाद क्रांती घडवायला पुरेसा नसतो. झार निकोलसने मुक्ती संघटनेच्या अनुयायांची कत्तल करून त्यांच्या पुढाऱ्यांना सायबेरियात सक्त मजुरीसाठी पाठवून दिलं. त्यातील एक होता प्रिन्स सर्गी वोल्कोन्स्की - राजघराण्याचा जवळचा आप्त. त्याची पत्नी मारिया ही सुद्धा रशियाच्या सर्वात मानांकित सेनाधिपती राएवस्कीची मुलगी. ह्या फसलेल्या बंडाळीच्या केवळ एकच वर्ष आधी त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना एक तान्हा मुलगाही होता. 


एकवेळ थडग्यात पुरलेली व्यक्ती पुन्हा जीवंत होऊन वर आली असती पण एकदा सायबेरियात तडीपार झालेला मनुष्य धडधाकट परतून आलेला कोणी पहिला नव्हता. तिकडे सर्गी इर्कुतस्कच्याही पूर्वेला चिता छावणी मध्ये चाबकाच्या फटक्याखाली दगड फोडत होता, आणि इकडे सेंट पिटर्सबर्गमध्ये मारिया झार निकोलस बरोबर झगडत होती, निदान स्वतःला तरी सायबेरियाला जाऊन नवऱ्याला भेटण्याची परवानगी मिळविण्यासाठी. त्यासाठी तिने सर्व वाडवडिलार्जित संपत्ती आणि बिरुदांचा त्याग केला. शेवटी आपल्या बाळालाही बरोबर न नेण्याच्या अटीवर तिला इर्कुतस्कला जाण्याची परवानगी मिळाली. 


एकटी, जवळ एक पैसाही नाही, वाटेत कोणीही तिला मदत करू नये असा सरकारी फतवा असताना, तिने हा ५७०० कि.मी. चा खडतर प्रवास कसा केला ह्याचं हृदयद्रावक वर्णन “Princess of Siberia” ह्या पुस्तकात तुम्हाला सापडेल. 


काय होतं सायबेरियात त्या काळात? जीवन-मरणाच्या सीमेवर कसं तरी जगणाच्या प्रयत्नात हरणाऱ्या कंगाल शेतकऱ्यांची वस्ती, अष्मयुगीन किंवा कदाचित एखादंच पाऊल पुढे अशी, कुठल्याही प्रकारे संस्कृतिचा स्पर्शही नसलेली जीवनशैली, अनन्वित छळ सोसणाऱ्या कैद्यांच्या वसाहती. मारियाने पुढच्या २६ वर्षांत ह्या अंधकारात जगताना “संस्कृती” सायबेरियात आणली. ज्यांना “शिक्षण” म्हणजे काय हे माहित सुद्धा नव्हतं त्यांच्या साठी शिक्षण आणलं. स्थानिक प्रशासनाबरोबर सतत झगडून, टीचभर अंधारकोठडीत खिचपत पडलेल्या कैद्यांना स्वतःच्या झोपड्या बांधून मोकळ्या आकाशाखाली राहण्याची सवलत मिळविली. तिने आपलं “प्रिन्सेस” हे अधिकृत बिरुद सेंट पीटर्सबर्ग मधेच सोडून दिलं होतं पण स्थानिक जनतेने उत्स्फूर्तपणे तिला Princess of Siberia म्हणायला सुरुवात केली. पण सर्वात महत्वाचं म्हणजे तिने ह्या वैराण प्रदेशात संगीत आणलं. सर्गी आणि मारियाला जेंव्हा स्वतःच घर बांधायची परवानगी मिळाली, तेंव्हा तिचं घर गायक, वादक, संगीतकारांचं पूर्वेकडील केंद्रस्थान बनलं. इर्कुतस्कच्या सांस्कृतिक परिवर्तनाची सुरुवात इथूनच झाली.



मारियाच्या ह्या घराचा आज म्युझियम झाला आहे. आणि नियमितपणे संगीताच्या मेहफिली घरात सादर करण्याची मारियाने सुरु केलेली प्रथा १०० वर्षांनंतरही आजतागायत तिथे अव्याहत चालू आहे. तिथे बसून पाश्चिमात्य शास्त्रीय संगीताचा जलसा ऐकणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. ह्या साध्यासुध्या घराच्या (दुसरा फोटो) बाजूने तुम्ही गेलात तर तुम्ही पुन्हा वळूनसुद्धा त्याच्याकडे  पाहणार नाही. 



तीन आठवड्यांच्या रशियाच्या प्रवासात मी अनेक भव्य, नेत्रदीपक  इमारती पहिल्या -


उदाहरणार्थ मॉस्कोतील सेंट बेसीलचं कॅथीड्रल(तिसरा फोटो),


कझान मधील “मंगल कार्यालय” जिथे १०० लग्न समारंभ एकाच वेळी होऊ शकतात (चौथा फोटो),



मॉस्को युनिव्हर्सिटी (पाचवा फोटो), 


सेंट पीटर्सबर्ग मधील चर्च ऑफ द सेव्हियर (सहावा फोटो) आणि अगणित कितीतरी.
















पण मारियाच्या ह्या साध्या घराएव्हढं महत्वाचं आणि हृदयाला भिडणारं त्यात काहीच नव्हतं.

No comments:

Post a Comment

  विसरलेले समाज - २ : टुलोर   चिले देशातील अटाकामा असा प्रदेश आहे जिथे अनेक ठिकाणी गेल्या ५०० वर्षात पाऊसच पडलेला नाही. आणि जेथे पडतो तेथे...