Wednesday 7 December 2022

नाविकांचे स्मारक

मी युरोप बद्दल फारसं काही ह्या सदरात आतापर्यंत लिहिलं नव्हतं. त्याचं मुख्य कारण म्हणजे युरोप तसा आपल्या जास्त परिचयाचा प्रदेश आहे. आपल्यापैकी अनेक लोकं युरोपचा प्रवास करून आलेले आहेत, कित्येक युरोपमध्ये दीर्घकाळ राहिलेले आहेत. त्यामुळे मला आधी वाटलं की ज्याबद्दल आपल्याला बरीच माहिती आहे अश्या ठिकाणांबद्दल लिहिण्यात किंवा वाचण्यात फारसं हशील नाही.  पण मग वाटलं की माझ्या युरोपमधल्या प्रवासांत जे काही थोडं वेगळं काहीतरी पाहायला /अनुभवायला मिळालं त्याबद्दल तरी ह्या आणि ह्याच्या पुढील २-३ लेखात लिहावं. 


साधारण सोळाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते एकोणिसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत, छोट्याश्या युरोपमधील राज्यांनी सर्व जगावर सत्ता गाजविली. स्पेन, इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड सारख्या प्रमुख सत्तांपासून ते अगदी बेल्जियम सारख्या नखभर आकाराच्या देशांपर्यंत सर्वांनी. ह्या जगड्व्याळ साम्राज्यांचा पाया मात्र घातला गेला होता स्पेन आणि पोर्तुगालमधील महत्वाकांक्षी नाविकांच्या पंधराव्या शतकातील सप्तसमुद्र पालथे घालणाऱ्या धाडसी सागरी मोहिमांमुळे. 


ह्या मोहिमांचा इतिहास अतिशय रोमांचक आहे. मात्र तो वाचताना आणि त्याचं शिल्परूपातील  लिस्बन मधील स्मारक न्याहाळताना  माझ्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहिला तो हा - ह्या चित्तथरारक मोहिमांच्या  फक्त १००-१५० वर्षांच्या कालखंडात अशी काय जादू होती की ज्या देशाने त्या काळाच्या आधी किंवा नंतरही कुठल्याही प्रकारे लक्षणीय असं फारसं काहीही केलेलं दिसत नाही, त्या पोर्तुगाल सारख्या एका लहानश्या  देशाने सप्तसमुद्रांवर (स्पेन सोडला तर निरंकुश) राज्य केलं? 


कदाचित ह्या प्रश्नाचं उत्तर लिस्बन ह्या पोर्तुगालच्या राजधानी  मधील तागुस नदीच्या काठावरील नाविकांच्या स्मारकात दडलेलं असेल. ह्या स्मारकाचं अधिकृत नाव जरी Padrão dos Descobrimentos - शब्दशः, “शोधांचे स्मारक” असलं तरी मुख्यतः हे पोर्तुगालच्या दर्यावर्दींनी लावलेले “शोध” युरोपला अज्ञात असलेल्या  जगातील वेगवेगळ्या प्रदेशांचे असल्यामुळे, माझ्या मते त्याला त्या धाडसी नाविकांचंच  स्मारक म्हणणं जास्त योग्य आहे. 


मी खरंतर लिस्बनला गेलो होतो माझ्या कामासाठी. पण काम अपेक्षेपेक्षा लवकर संपल्यामुळे पुढची  कोपेनहेगनची फ्लाईट पकडण्या आधी  एक भाकड दिवस हातात होता.  मग मी हॉटेलच्या रिसेप्शनिस्टच्या मदतीने एक वयस्क आणि लिस्बनचा स्थानिक ड्राइव्हर शोधून त्याची टॅक्सी दिवसभराकरिता ठरविली. कारण आजकाल अशा  मोठ्या शहरात टॅक्सीवाले बहुतेक बाहेरून कुठून तरी आलेले असतात आणि त्यांना गूगल मॅप्सच्या मदतीने एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याखेरीज शहराची काही माहिती असेलच ह्याची खात्री देता येत नाही. 


गाडीत बसल्यावर मी त्याला सांगितलं, “पुन्हा मी ह्या तुझ्या गावात येईन की नाही कुणास ठाऊक, तेंव्हा मला कायम आठवणीत राहतील अश्या जागी तू घेऊन जा”. माझा टॅक्सीवाला सर्वात आधी मला घेऊन गेला ह्या नाविकांच्या स्मारकापाशी. मी विचारलं “का रे बाबा, इथेच तू का सर्वप्रथम आलास?”. तो म्हणाला  “कारण आमच्या इतिहासातील सुवर्ण काळाचं हे स्मारक आहे”. मी विचारलं “तुमचा सुवर्ण काळ तर ह्याच्या पुढच्या शतकात आला. कारण तेंव्हा  पोर्तुगालचं साम्राज्य ब्राझील पासून पूर्वेला मकाऊ आणि पूर्व इंडोनेशियातील बेटांपर्यंत पर्यंत पसरलं, आणि ह्या सर्व प्रदेशातून सोन्याची गंगा पोर्तुगालकडे वाहायला लागली”. त्यावर तो म्हणाला “तू म्हणतोस त्या काळात पोर्तुगालमध्ये कधी न पाहिलेली श्रीमंती आली असेलही पण सर्व जगात कोणीही न केलेली नेत्रदीपक कामगिरी आमच्या धाडसी खलाश्यांनी ज्या काळात केली, तोच माझ्या मते सर्व पोर्तुगीजांना  गर्व वाटावा असा काळ आहे. आणि जरी स्पॅनिश लोकांनी कितीही बढाया मारल्या तरी त्यांच्या  सागरी मोहिमेतील सर्वात महत्वाच्या दोन मोहिमांचे कप्तान - कोलंबस आणि मॅजेलान (ज्याच्या गलबताने सर्वात प्रथम पूर्ण पृथ्वीप्रदक्षिणा केली)  सुद्धा मुळात पोर्तुगीजच होते ”. 


अर्थात कोलंबस खरंच कुठला होता - स्पॅनिश, इटालियन की पोर्तुगीज ह्याबद्दल बरेच वाद आहेत. आणि ऐतिहासिक महत्वाच्या व्यक्ती “आपल्याच” आहेत असा दावा करून आपलं महत्व वाढवायचा प्रयत्न करण्याचा प्रघात जगातील सर्वच समाजात असतो! कारण कोलंबस आणि मॅजेलान दोघांनी त्यांच्या आयुष्यात  देशद्रोहीच समजलं  गेलं (त्यांनी स्पेनच्या झेंड्याखाली आपल्या सागरी मोहिमा काढल्या म्हणून). 


नाविकांच्या ह्या स्मारकाचं अधिकृत उदघाटन झालं ऑगस्ट १९६० मध्ये हेनरी द नॅव्हिगेटर ह्याच्या ५०० व्या पुण्यतिथीचा मुहूर्त साधून. कारण पोर्तुगालच्या ह्या सुवर्ण-काळाचा प्रमुख शिल्पकार हेनरीच होता. प्रिन्स हेनरी हा पोर्तुगालचा तत्कालीन राजा जॉन ह्याचा चौथा मुलगा. तो नुसताच राजवाड्यात बसून हुकूम सोडणारा राजपुत्र मात्र नव्हता. त्याचा मोहिमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग आणि नेतृत्व, आर्थिक पाठिंबा, त्याच्यामुळे मिळालेलं राजसत्तेचं संरक्षण आणि त्याची दूरदृष्टी हयामुळे पोर्तुगालमध्ये सागरी मोहिमांना विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्याने एक संपूर्ण गावच वसवलं.  तिथे उभरत्या नाविकांना योग्य ते शिक्षण, सागरी मोहिमांना उपयुक्त अशा Cartography (नकाशे पद्धतशीरपणे बनविण्याचं शास्त्र) आणि Navigation (नौकानयनशास्त्र) ह्यांचं संशोधन, जहाजे बांधण्याच्या वेगवेगळ्या रचनांचे प्रयोग असे अनेक उद्योग स्वखर्चाने चालू केले. त्यातूनच एका बाजूला Caravel सारखी त्याकाळातील सर्वात वेगवान जहाजं निर्माण झाली, आणि दुसऱ्या बाजूला बार्थोलोम्यु डियास, पेद्रो काब्राल, पेद्रो एस्कोबार, मार्टीम डी सोसा, वास्को द गामा असे प्रशिक्षित आणि निडर नाविक एकामागून एक बाहेर पडून सात समुद्र पालथे घालू लागले. 



ह्या सर्व नाविकांचे (आणि अल्बुकर्क आणि संत झेवियर्स सारखे काही थोडे ज्यांनी नाविक नसूनही इतर कारणांसाठी काही महत्वाच्या सागरी मोहिमांत भाग घेतला) पुतळे ह्या स्मारकावर उभारलेले आहेत. लिस्बनच्या बेलेम विभागात तागुस नदीच्या काठावर Caravel जहाजाच्या नाळेच्या आकाराचा एक लाइमस्टोन चा भव्य (५२ मीटर उंच) स्तंभ उभारून  त्या नाळेवर सर्वात पुढे प्रिन्स हेनरीचा आणि त्याच्या मागे दोन्ही बाजूला १६-१६ असे ३२ प्रमुख दर्यावर्दींचे प्लास्टरचे पुतळे आहेत. पहा पहिले तीन  फोटो. त्या समोरच्या चौकात एक विस्तीर्ण होकायंत्राची आकृती आहे (हे साऊथ आफ्रिकेने पोर्तुगालला सदिच्छा भेट म्हणून दिलेलं आहे).  ज्यात जगातील वेगवेगळ्या ठिकाणी जाणारे जे सागरी मार्ग पोर्तुगीज नाविकांनी शोधले ते रेखाटलेले आहेत. त्याचा  फोटो मात्र घेणं शक्य नव्हतं.  कारण जमीनीपासून २०-२५ फूट तरी उंचावर गेल्यावरच ते होकायंत्र पूर्णपणे दिसू शकतं इतकं ते मोठं आहे. 


स्मारक बघून मी गाडीकडे जायला मी मागे वळलो आणि दोन गंमती समोर दिसल्या. पहिली - सॅन फ्रान्सिस्कोच्या बे ब्रिजची हुबेहूब प्रतिकृती असा तागुस नदीवरचा पूल (कारण दोन्हीचा आर्किटेक्ट एकच होता)

आणि दुसरी - रिओ द जानेरो मधल्या कोरकोव्हाडो टेकडी वरच्या ख्राईस्ट द रीडीमर ह्या पुतळ्याची नक्कल (कदाचित ब्राझील पोर्तुगीज साम्राज्याचा एकेकाळी भाग होता त्याची आठवण म्हणून??). पहा पुढचे दोन फोटो. 


एकूणच लिस्बन फार छान शहर आहे. लिस्बनच्या रस्त्यातून फिरताना फार मजेचा अनुभव सारखा येतो - घरांवरच्या आणि गल्ली बोळांच्या पाट्यांवर डिसा, डिसोझा, मेनेझिस, मस्कारेन्हास अशी गोव्यात दिसावी अशी नावे दिसत राहतात! असो.


त्याचा अर्वाचिन भाग जगातल्या सर्व आधुनिक शहरांसारखाच  काँक्रीटच  जंगल असला तरी मूळ गाव अजून आपलं अठराव्या शतकातील व्यक्तिमत्व  टिकवून आहे. पहा शेवटचा फोटो. त्या एका भेटीनंतर काही पुन्हा लिस्बनला जायचा योग्य आला नाही - पण तिथल्या जिभेवर विरघळणाऱ्या जेवणाची आणि संध्याकाळी रॉसियोच्या चौकातली दिव्यांची रोषणाई उजळल्यावर, तिथल्या कारंज्याच्या काठावर बसून चाखलेल्या जिंझाची (चेरीपासून बनविलेली पोर्तुगीज  liqueur - ज्याला दारू म्हणणं हा त्याचा घोर अपमान आहे) चव अजून जिभेवर रेंगाळत आहे. 


तळटीप: ह्या लेखासोबतचे फोटो मात्र फारसे चांगले नाहीत. माझी ही बिझनेस ट्रिप असल्यामुळे मी माझा कॅमेरा बरोबर नेला नव्हता. सगळे फोटो त्यामुळे मोबाइल फोनच्या कॅमेऱ्याने काढलेले आहेत. तेही १३ वर्षांपूर्वीच्या “पुरातन” मोबाइल फोनवर - जेंव्हा फोटोत काहीतरी जरा रंगीबेरंगी दृश्य दिसलं कि समाधान मानायची प्रथा होती. 

 

No comments:

Post a Comment

  विसरलेले समाज - २ : टुलोर   चिले देशातील अटाकामा असा प्रदेश आहे जिथे अनेक ठिकाणी गेल्या ५०० वर्षात पाऊसच पडलेला नाही. आणि जेथे पडतो तेथे...