Wednesday, 7 December 2022

चेंगीज खानाचा देश

शाळेत बहुदा सहावी-सातवीत असताना इतिहासाच्या पुस्तकात चेंगीज खान आणि त्याच्या साम्राज्याची थोडीशी माहिती वाचनात आली होती. त्यात नक्की काय शब्द वापरले होते आणि काय वर्णन होतं ते काही आठवत नाही. पण ते वाचून मनात ठसलेलं चित्रं मात्र होतं, वाटेत येईल ते बेचिराख करत विद्युतवेगाने पुढे जाणाऱ्या टोळधाडीचं! एकूणच सुरुवातीला जे काही वाचनात आलं त्यात चेंगीज खानाची प्रतिमा ही क्रूरकर्मा, लुटारु सैन्याचा रक्तपिपासू अधिपती अशीच रंगविलेली होती. अगदी चंगेझ खान ह्या १९५७ सालच्या हिंदी सिनेमात शेख मुख्तारने रंगविलेल्या किंवा १९६५ सालच्या हॉलिवूड च्या Genghis Khan ह्या सिनेमात ओमार शरिफने साकारलेल्या चेंगीज खानाचं व्यक्तिमत्वही ह्या प्रतिमेला सुसंगत असंच होतं.

पाच-सहा वर्षांपूर्वी जेंव्हा मी मंगोलियाला जायचा बेत केला, तेंव्हा जिथे जाणार त्याबद्दल काहीतरी थोडीफार माहिती असलेली बरी म्हणून मंगोलियाच्या इतिहासाची तोंड ओळख करून घ्यायला जरा सुरुवात केली. आणि आश्चर्याचे अनेक धक्के मला बसू लागले. चेंगीज खानाची निव्वळ “विध्वंसक” अशी प्रतिमा थोडी त्याच्यावर अन्याय करणारी आहे असं वाटू लागलं. त्याने पूर्वेच्या तांगुट आणि जिन साम्राज्यांपासून पश्चिमेला पोलंड पर्यंतची राज्यें  एकामागून एक उद्ध्वस्त केली हे तर खरंच, पण त्याचबरोबर मानवी इतिहासातील आज पर्यंतचं सर्वात मोठं “एकसंध” साम्राज्य त्याजागी निर्माण केलं हे ही तितकंच खरं (एकोणिसाव्या शतकातील ब्रिटिश साम्राज्याचं एकूण क्षेत्रफळ जरी चेंगीज खानाच्या साम्राज्य पेक्षा जास्त असलं तरी, त्याचा भूभाग अनेक तुकड्यात विभागलेला होता). एका बाजूने त्याच्या लष्करी मोहिमांमध्ये हजारो/लाखो लोकं मारले गेले हे खरंच. पण त्याच बरोबर ज्या राजे-रजवाड्यांना त्याने कंठस्नान घातलं तेही काही गंगेचं पाणी पिऊन राज्य करणारे नव्हते. त्यामुळे कारा खिताई (Qara Khitai - सध्याच्या चीनच्या पश्चिमेचा प्रदेश) साम्राज्याचा जेंव्हा चेंगीज खानाच्या “निष्ठूर” सैन्याने पाडाव केला तेंव्हा तेथील उघूर (Uyghur) ह्या बौद्ध जमातीने त्यांचं आपले तारणहार म्हणूनच स्वागत केलं हे ही तितकंच खरं! 

परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे हे मंगोल साम्राज्य आश्चर्य वाटावं एव्हढं उदारमतवादी, सर्वसमावेशक तत्वांवर आधारित होतं. संपूर्ण साम्रज्यात सामान नागरी आणि लष्करी कायदा निश्चित करणारी प्रणाली चेंगीज खानाने निर्माण केली (“यासा” नावाची). धर्म, वंश, कुटुंब/जमात अश्या  बाबींना राज्य-शकटात स्थान नव्हतं. कोणालाही (अगदी नव्याने जिंकलेल्या पूर्वीच्या शत्रू-राज्यातील नागरिकांना सुद्धा) स्वतःच्या निव्वळ अंगभूत गुणांच्या बळावर राज्य-प्रशासनात सर्वोच्च पदापर्यंत पोचणं शक्य होतं. शिक्षक आणि वैद्य अशा व्यावसायिकांना खास कर सवलती दिल्या जात. चेंगीज खान स्वतः “तेंगरिझम” ह्या प्राचीन, मूलतः  निसर्गपूजक धर्माचा अनुयायी होता (“खान” ही मंगोलियन “पदवी” होती. त्याचा कुठल्याही धर्माशी संबंध नव्हता) पण त्याच्या मंगोल साम्राज्यासारखं सर्वार्थाने धर्मनिरपेक्ष राज्य त्याच्या आधी (आणि कदाचित अगदी आजपर्यंत सुद्धा) प्रस्थापित झालेलं आपल्याला इतिहासात दिसत  नाही. 



पण तरीसुद्धा पूर्वीपासून मनात ठसलेली चेंगीज खानाची “कर्दनकाळ” ही प्रतिमा पूर्णपणे पुसली नव्हती. त्यामुळे उलानबाटरला (मंगोलियाची राजधानी) पोचल्यावर जिकडे तिकडे चेंगीज खानाची स्मारकं (अगदी शहराशेजारच्या टेकडीवर सुद्धा टेकडीचा दर्शनी भाग पूर्ण भरेल एव्हढ्या मोठ्या  चेंगीझखानाच्या चेहेऱ्यासकट - दुसरा फोटो) दिसल्यावर सुरुवातीला आश्चर्याचे धक्के बसलेच. जसजसा  स्थानिक लोकांशी संवाद झाला तसतसं चेंगीज खानाचं मंगोलियन जनमानसातील महत्वही लक्षात येऊ लागलं.


उलानबाटरमधील सर्वात भव्य आणि लक्षवेधक इमारत आहे चेंगीज खानाचं स्मारक - मध्यभागी चेंगीज खान स्वतः, एकीकडे ओगदेई खान हा त्याचा मुलगा आणि दुसरी कडे कुब्लाई खान हा नातू. ही इमारत म्हणजे मंगोलियाची  संसद, राष्ट्रपतींचं कार्यालय, मंत्रालय वगैरे असलेल्या गव्हर्नमेंट हाऊस चा दर्शनी भाग (पहिला आणि तिसरा फोटो). 


कुब्लाई खानाच्या मृत्यू नंतर मात्र मंगोलियाच्या नशिबी ते पूर्वीचे वैभवाचे दिवस कधीच आले नाही. पुढील अनेक शतके आधी सतत चालणारी यादवी युद्धं, चीनच्या चिंग साम्राज्याने मंगोलिया जिंकून केलेली दडपशाही, स्टालिनच्या काळात सोविएत रशियाने केलेल्या कत्तली, अश्या घडामॊडीत मंगोलिया सतत चिरडला गेला. आधुनिक काळातील मंगोलियाच्या सर्वात मोठा वीरपुरुष म्हणजे सुखबाटर (चौथा फोटो त्याच्या स्मारकाचा).


त्याने विखुरलेल्या मंगोलियन टोळ्यांची एकजुट करून सोविएत रशियाच्या मदतीने, चिनी सत्तेचं जोखड मंगोलियाच्या मानगुटीवरून झुगारून दिलं. मात्र हा स्वातंत्र्याचा आनंद काही फार काळ टिकला नाही. रशियाचं  बाहुलं म्हणून प्रस्थापित झालेल्या  कम्युनिस्ट राजवटीत प्रजेवरील अत्याचार मागील पानावरुन पुढे चालूच राहिले ते १९९२ साली नवीन राज्यघटना आस्तित्वात येऊन १९९६ साली पहिलं खरंखुरं लोकशाही सरकार प्रस्थापित होई पर्यंत (ह्या दडपशाहीपासून मिळालेल्या मुक्तीचं अतिशय हृद्य स्मारकही चेंगीज खानाच्या स्मारकाजवळच आहे  - पाचवा  फोटो). 
  


आजच्या मंगोलियामध्ये त्यामुळे शतकानुशतके चालत आलेली भटक्या जमातींची जीवनशैली, श्रद्धाळू बौद्ध आचार-विचार आणि आधुनिक औद्योगिकरणामुळे समाजजीवनात होणारी परिवर्तने ह्यांचं जटिल मिश्रण पाहायला मिळतं.


अजूनही २५% जनता घोड्याच्या पाठीवर आपला संसार लादून भटकं जीवन जगते (सहावा फोटो - गीर नावाच्या तंबूंची अस्थायी छावणी).

उलानबटार मध्ये फिरताना अत्याधुनिक ऑफिस कॉम्प्लेक्सच्या आवाराला लागूनच चोजिन लामाचं शेकडो वर्ष जुनं देऊळ दिसतं (सातवा फोटो).

गानदानतेंगचिनलेनच्या भव्य बुद्धमंदिराबरोबच पारंपरिक निसर्गपूजक देवऋषींची पूजास्थळंही  पाहायला मिळतात (आठवा फोटो).

मंगोलियाच्या आठवणी अनेक आहेत मात्र शब्द मर्यादेमुळे बाकी सर्व पुन्हा कधीतरी.


No comments:

Post a Comment

  विसरलेले समाज - २ : टुलोर   चिले देशातील अटाकामा असा प्रदेश आहे जिथे अनेक ठिकाणी गेल्या ५०० वर्षात पाऊसच पडलेला नाही. आणि जेथे पडतो तेथे...