Wednesday, 7 December 2022

सिलोलीची अद्भुत दुनिया - १

बोलिव्हियातील उयुनीचे मिठाचे पठार ओलांडून तुम्ही जर दक्षिणेला चिले देशाच्या सीमेकडे जाऊ लागला तर थोड्याच काळात  सिलोली वाळवंटाच्या अद्भुत प्रदेशात जाऊन पोचता. पण पहिले काही मैल आजूबाजूचा खडकाळ, वैराण, शुष्क  प्रदेश, सान क्रिस्तोबल सारखी कळाहीन गावं,त्यातील धुळीत माखलेली घरं पाहून आपण हा उपद्व्याप का करतो आहोत असा प्रश्न आपल्यालाच पडतो. त्यातच हा संपूर्ण प्रदेश समुद्रसपाटीपासून जवळ जवळ ४५०० मीटर ( १४७०० फूट) उंचीवर असल्यामुळे बोचरी थंडी तुमचे लचके तोडत असतेच. 

आपल्याला निसर्गाचे काय काय चमत्कार सामोरे येणार आहेत ह्याची पहिली झलक दिसते सान क्रिस्तोबल मागे टाकल्यावर.  

कल्पना करा दोन्ही बाजूला १८-२० हजार फूट उंच शिखरं, त्यामधून वाहणारी रुंद नदी. पण नदीत पाण्याऐवजी उकळता लाव्हा वाहातो आहे - आणि एका क्षणी तो लाव्हा थंड होऊन गोठून गेला तर काय मागे राहील?


मागे राहील एक दगडांची नदी. व्हॅले द रोकास (मराठीत दगडांची दरी) अशीच एक थिजलेली दगडांची नदी आहे (पहिला फोटो).

काठावर उभं राहिलं तर असंच भासतं कि कुठल्याही क्षणी एक प्रचंड गडगडाट करून हा दगडांचा प्रवाह पुन्हा वाहू लागेल. ह्या “नदीच्या” पात्रात शतकानुशतकाच्या वादळवाऱ्यांनी घासून, तासून ह्या दगडांतून अकल्पनीय आकारांची शिल्पं निर्माण केली आहेत (दुसरा फोटो). 

सिलोली वाळवंटाचा सर्वच प्रदेश ज्वालामुखींच्या उद्रेकातून निर्माण झालेला आहे. आज आपल्याला माहित असलेल्या, जगातील सर्वात मोठ्या १० सुपर-व्होल्कॅनो पैकी ५ ह्या भागात (सिलोली, अटाकामा) आहेत. सुपर-व्होल्कॅनो म्हणजे असा ज्वालामुखी ज्यातून (जेंव्हा त्याचा स्फोट होईल तेंव्हा) १००० घन की.मी. पेक्षा जास्त घनफळाचे पदार्थ (लाव्हा,दगड,धूळ इत्यादी) फेकले जाऊ शकतात. सुपर-व्होल्कॅनोच्या स्फोटात संपूर्ण पृथ्वीचं वातावरण बदलून टाकण्याची किंवा संपूर्ण सजीव प्रजाती नामशेष करण्याची क्षमता असू शकते. अर्थात सुपर-व्होल्कॅनोचे स्फोट काही दररोज होत नाहीत. आमच्या प्रवासाचा मार्ग ज्या दोन सुपर-व्होल्कॅनोच्या क्षेत्राजवळून गेला (पास्तोस ग्रांदेस आणि सेरो ग्वाचा) त्यांचा शेवटचा उद्रेक सुमारे १७ लाख वर्षांपूर्वी झाला असावा. पण ह्या भूतकाळातल्या उलथापालथींच्या अनेक खुणा मात्र आजही आपल्याला दिसतात. व्हॅले द रोकास ही त्यातलीच एक. 


पण व्हॅले द रोकास मागे टाकून सिलोलीच्या ह्या निर्मनुष्य (तीन दिवसांच्या ह्या प्रवासात फक्त जेवायला आणि रात्र काढायला ज्या सरायांमध्ये आम्ही थांबलो केवळ तेंव्हाच आम्हाला दुसऱ्या माणसाचं दर्शन झालं),  वैराण वाळवंटात तुम्ही पुढे निघाल्यावर पहिली गोष्ट दिसते ती डोक्यावरच्या टोपीत पिसांचा तुरा खोवल्या  सारखं दिसणारं ओलाग्यु ह्या सद्ध्या जागृत असलेल्या ज्वालामुखीचं २०००० फूट उंच शिखर आणि त्याच्या मुखातून सतत आकाशात फेकल्या जाणाऱ्या शुभ्र वाफेचा झोत.


येथून पुढे हितो काहोनला सीमा पार करून चिले मध्ये शिरेपर्यंत ओलाग्यु सारखे जागृत आणि तोमासमील, लिकानकॅबर, कनापा, तापाकिलचा सारखे सुप्त ज्वालामुखी सतत आपली सोबत करतात.  


सिलोलीचा हा प्रदेश (आणि त्यालाच जोडून असलेलं चिले देशातील अटाकामाचं क्षेत्र) जगातील सर्वात कमी पावसाची जागा आहे. पण ह्या शुष्क प्रदेशावर निसर्गाच्या कुंचल्याने रंगविलेले देखावे तोंडात बोटं घालायला लावतात. तपकिरी, नारिंगी आणि राखाडी रंगाच्या इतक्या छटा असू शकतात अशी मी कल्पनासुद्धा केली नव्हती. (पहा तिसरा आणि चौथा फोटो).



येथील एका भागाला तर साल्वाडोर दाली डेझर्ट असंच म्हटलं जातं कारण दाली ह्या जगप्रसिद्ध चित्रकाराच्या Surrealist शैलीतून निर्माण व्हावी अशी  दृश्यं  इथे दिसतात (ह्याची झलक आणि फोटो मात्र पुढच्या भागात)


पण ह्याही पेक्षा नेत्रदीपक आहेत ती ठायी ठायी वाटेत लागणारी सरोवरं. हे वाळवंटाचे लाल, नारिंगी, सोनेरी रंग नजरेत भरतात न भरतात तेव्हढ्यात एक खिंड ओलांडून गेल्यावर लगूना कनापाची गर्द निळाई आणि त्यात विहरणारे सुंदर गुलाबी रोहित (फ्लेमिंगो) समोर येतात. येथून पुढे एकामागोमाग एक लागणारी दृष्टी सुखविणारी सरोवरं - लगूना होंडा, हेडीओंडा, त्यातील रोहित पक्षांचे थवे, मध्येच आकाशातून पाण्यावर झेप घेणारे उमदे अँडियन गल पक्षी हवेतील हाडं गोठविणाऱ्या थंडीचा सुद्धा विसर पाडतात  (पहा पुढचे तीन फोटो). 



ह्या सर्व प्रवासात एकच रंग दिसत नाही तो म्हणजे हिरवा. अर्थात ज्या प्रदेशात संपूर्ण वर्ष भरात केवळ १५ मि.मी. एव्हढाच पाऊस पडतो (अगदी सहारा वाळवंटात सुद्धा सरासरी ७६ मि.मी. म्हणजे सिलोली पेक्षा पाच पट जास्त पाऊस पडतो) तिथे हिरवळ आणि झाडं झुडुपं दिसणं कठीणच.

पण हे वाळवंट निर्मनुष्य असलं तरी जीवन विरहित मात्र नाही. ह्या वैराण, नापीक प्रदेशात सुद्धा ज्या काही थोड्या फार वनस्पती तगून राहतात, त्यावर जगणारे उंदीर, ससे, वायकुन्या (लामा, अल्पाका सारखा “Cameloid” सस्तन प्राणी) आणि त्यांची शिकार करणारे कोल्हे, प्युमा सारखे प्राणी, रोहित, गल, गिधाडं इत्यादी ८० प्रकारचे पक्षी इथे सुखाने नांदतात (आणि निर्मनुष्य परिसर असल्याने कदाचित थोडं अधिकच आनंदाने). 


अर्थात सिलोलीमधील चमत्कारांची यादी इथेच संपत नाही. सोल द मन्याना (मराठी मध्ये “पहाटेचा सूर्य”) नावाचं उकळते झरे, तप्त गंधकाची विवरे, आकाशात उंच वाफेचे झोत उडवणारे गीझर ह्यांनी भरलेलं पठार, तेर्मास द पोल्कस येथील गरम पाण्याची कुंडे, मृत ज्वालामुखीच्या उथळ विवरांत निर्माण झालेली लगूना कोलोराडा (मराठी मध्ये लाल सरोवर) सारखी सरोवरे अशा असंख्य नवलाई च्या जागांची झलक आपण पाहणार आहोत  ह्या पुढच्या भागात. 



No comments:

Post a Comment

  विसरलेले समाज - २ : टुलोर   चिले देशातील अटाकामा असा प्रदेश आहे जिथे अनेक ठिकाणी गेल्या ५०० वर्षात पाऊसच पडलेला नाही. आणि जेथे पडतो तेथे...