Thursday, 8 December 2022

हॅन्सीऍटीक संघ


तुम्ही जर युरोपिअन युनियनच्या वेब साईटला भेट दिलीत तर तुम्हाला तिथे युरोपिअन युनियनच्या निर्मितीची पार्श्वभूमी आणि त्याचा इतिहास ह्यांची संक्षिप्त माहिती दिसेल. त्यानुसार,अशी संघटना बनविण्याची कल्पना दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथम मांडली गेली. आणि १९५७ मध्ये झालेल्या रोमच्या करारानंतर ती प्रत्यक्षात आणण्याला वेग येऊन १९५९ मध्ये युरोपिअन पार्लमेंटची स्थापना झाल्यावर खऱ्या अर्थाने युरोपिअन युनियन कार्यरत झाली.

पण खरं तर युरोपातील देशांत आपसातील व्यापाराचं सुलभीकरण व्हावं म्हणून सर्वांनी मिळून एखादी  संघटना स्थापण्याची कल्पना १२व्या शतकातच मांडली गेली होती आणि जवळ-जवळ २०० वर्षं अशी संघटना प्रत्यक्षात येऊन यशस्वीपणे कार्यही करत होती. 

अर्थात नॉर्वेतील बर्गेन गावात ३ दिवस पडाव टाकण्या आधी मलाही त्याची बिलकुल कल्पना नव्हती. 


हेलसिंकीहून बर्गेनला पोचल्यावर आम्ही पहिली गोष्ट जर कुठली केली असेल तर हॉटेल मध्ये बॅगा टाकून बर्गेनच्या फेरी व्हार्फ कडे धाव घेतली. तिथल्या एका उपाहारगृहात मिळणाऱ्या सामन माशाची कीर्ती आम्ही ऐकून होतो. आणि तसंसुद्धा नॉर्वेत आल्यावर नॉर्वेजिअन सामन न खाण्याचं महापाप तुमच्या हातून घडलं, तर देव सुद्धा तुम्हाला स्वर्गाची दारं कायमची बंद करतो ह्याची मला जाणीव होती. (नॉर्वेच्या २०० क्रोनरच्या नोटेवर सुद्धा सामन माशाचं चित्रं आहे, इतकं त्याचं येथे महत्व आहे!!) . परमेश्वराच्या त्या प्रथमोवताराची यथाशक्ती भक्ती करून भरलेल्या पोटावर हात फिरवीत जेंव्हा आम्ही हॉटेलच्या दिशेला पावलं वळवली, तोपर्यंत गुडुप अंधार झाला होता. त्यामुळे नजीकच, त्या व्हार्फच्या पलीकडच्या रस्त्यावर ब्रिग्गेन हा  ऐतिहासिक महत्वाचा विभाग आहे हे आमच्या लक्षातच आलं नाही. 


बर्गेन अंगठीतल्या हिऱ्यासारखं आकर्षक शहर आहे - आटोपशीर पण डोळे दिपतील इतकं सुंदर.

पहा पहिले तीन  फोटो -

मार्केट चौक आणि त्यातील नॉर्वेजियन वाङ्मयाचा जनक मानला जाणारा लुडविग, होलबर्गचा सरदार (Baron) ह्याचा पुतळा,



नजीकचाच  एक रस्ता आणि



फ्लोयेन टेकडीवरून दिसणारं शहराचं विहंगम दृश्य. 

ह्या चौकापासून जवळचं आहे ब्रिग्गेन इलाका. नॉर्वेजियन भाषेत “ब्रिग्गेन” चा शब्दशः अर्थ आहे जहाजांचा धक्का किंवा गोदी. आजच्या बर्गेन शहराची स्थापना ही ११ व्या शतकात ही गोदी बांधण्यापासूनच झाली. त्याकाळात नॉर्वेतून सागरमार्गे होणारा व्यापार भरभराटीला आला,  आणि बर्गेनचं हे बंदर त्याचं एक महत्वाचं केंद्र बनलं. त्यामुळे त्याच्या अवतीभवती लोकसंख्याही झपाट्याने वाढली. हा व्यापार आणि त्याला पूरक सुविधा - बंदर-धक्के, गोदामं, रस्ते इत्यादी ब्रिग्गेनच्या परिसरात भराभर बांधले गेले. पहा चौथा फोटो. 


ह्या फोटोत ज्या आकर्षक, रंगीबेरंगी इमारती दिसत आहेत (युनेस्कोच्या World Heritage Sites च्या यादीत त्यांचा समावेश १९७९ साली झाला), त्यांचा उगम हॅन्सीऍटीक संघ (Hanseatic League) नावाच्या १३ व्या शतकातील एका वैशिष्ठ्यपूर्ण संघटनेतून झाला आहे. त्या काळात युरोपातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी डोकेदुखी होती ती म्हणजे भू-मार्गांवरील दरोडेखोरी आणि सागरावरील चाचेगिरी. आणि बऱ्याच वेळा राजसत्तेकडे त्यांपासून संरक्षणाची मदत मागणे म्हणजे आगीतून फुफाट्यात उडी मारणे ठरत असे, कारण राजाचे सरदारच ह्या वाटमारीचे आश्रयदाते निघत. त्यामुळे प्रथम आजच्या उत्तर जर्मनीतील ल्युबेक (Lübeck) गावात सुमारे ११६० सालात त्या परिसरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन एक संघटना स्थापन केली. संघटनेचा मूळ उद्देश होता भाडोत्री सैनिक नोकरीला ठेवून मालाच्या ने-आणीवर होणाऱ्या डाक्यांना आळा घालणे. हीच होती हॅन्सीऍटीक संघाची सुरुवात.


ह्या योजनेचं सुरुवातीचं यश बघून, भराभर सर्व युरोपभरातील गावा-गावातील व्यापारी त्यात सामील झाले. पुढची ३ शतकं संपूर्ण युरोपातील व्यापाराचं नियंत्रण ह्या हॅन्सीऍटीक संघाने केलं. त्याची व्याप्ती केवळ मालाच्या ने-आणीला संरक्षण देण्यापुरती मर्यादित राहिली नाही. संघाने स्वतःचे कायदे-कानून (व्यापारी व्यवहारांपुरते मर्यादित) आस्तित्वात आणले, स्वतःची आपसातील राजनैतिक संबंधांची प्रणाली निर्माण केली. आपसात होणारे व्यापारी व्यवहार शुल्क-मुक्त होतील ह्याची खबरदारी घेतली. एकूणच प्रस्थापित राजसत्तेला समांतर अशी व्यापारी व्यवहारांपुरती मर्यादित पर्यायी व्यवस्था हॅन्सीऍटीक संघाने निर्माण केली. ह्या काळातील युरोप अनेक छोट्या-छोट्या राज्यांत विभागाला गेला असल्यामुळेही कदाचित असेल, पण हॅन्सीऍटीक संघाची सामूहिक आर्थिक ताकद आणि लष्करी बळ ह्यापुढे तत्कालीन प्रस्थापित राजे-रजवाडे सुद्धा नमतं घेत असत. आणि तशीच वेळ आली तर संघाच्या नियमांना आणि धोरणांना विरोध करणाऱ्या राज्यांची  नाकेबंदी करून किंवा सरळ आपलं सैन्यबळ वापरून अशा चुकार राज्यांना वठणीवर आणण्यासही संघ मागेपुढे पाहत नसे. मात्र चौदाव्या शतकानंतर युरोपातील छोट्या-छोट्या संस्थानांचं  एकत्रीकरण होऊन प्रबळ आणि  विस्तृत साम्राज्य निर्माण होऊ लागल्यावर हॅन्सीऍटीक संघाचा प्रभाव कमी-कमी होत, त्याच्या सभासदांत फूट पडून शेवटी त्याचा विनाश झाला. 


बर्गेन, ह्या हॅन्सीऍटीक संघाचं स्कँडिनेव्हियामधील प्रमुख ठाणं होतं. संघाच्या भरभराटीच्या काळात उत्तर सागरातून (North Sea) दक्षिण युरोपाशी होणारा सर्व व्यापार  बर्गेन मधून नियंत्रित केला जात असे.


आणि चौथ्या आणि पाचव्या फोटोत दिसणाऱ्या  ब्रिग्गेनच्या रस्त्यावरील ह्या वैशिष्ट्यपूर्ण इमारती - संघाची कार्यालयं, गोदामं आणि संघाच्या सभासदांच्या उपयोगासाठी मूलतः बांधल्या गेल्या. अर्थात त्या काळात प्रत्यक्ष बांधलेली एकही इमारत आज अस्तितवात नाही कारण १८व्या शतकाच्या सुरुवातीला लागलेल्या प्रचंड आगीत त्यातील बहुतेक भस्मसात झाल्या. परंतु त्यानंतर काही दशकातच ह्या संपूर्ण इलाक्याचा जीर्णोद्धार होऊन आधी होत्या त्याच स्वरूपात ह्या इमारती पुन्हा उभ्या करण्यात आल्या. आज अर्थात फक्त त्यांचं बाह्य रूप हॅन्सीऍटीक संघाची आठवण करून देणारं आहे. आतमध्ये बहुतेकांचं रूपांतर दुकानं, उपहारगृह अश्या सारख्या  “टुरिस्ट ट्रॅप्स” मध्ये झालं आहे. 


हॅन्सीऍटीक संघ जरी आज विस्मरणात गेला असला तरी त्या काळात वापरात आलेल्या अनेक प्रणाली, कार्यपद्धती, शासनव्यवस्था ह्यांचं प्रतिबिंब, आजच्या युरोपिअन युनियनच्या कारभारातही आपल्याला दिसतं. 


असो. बर्गनच्या ह्या भेटीत फक्त जिभेचे चोचलेच पुरवले गेले आणि एक सुंदर शहर आणि नॉर्वेचे नेत्रदीपक  फ्योर्ड (fjord म्हणजे खाडी) पाहायला मिळाले एव्हढंच नाही तर काही नवीन इतिहास शिकायलाही मिळाला, एवढं मात्र खरं.


शेवटी जाता-जाता अश्याच फ्योर्डमधील मोडालेन ह्या एका छोट्या पण देखण्या गावाचा एक वानगीदाखल फोटो.
 


No comments:

Post a Comment

  विसरलेले समाज - २ : टुलोर   चिले देशातील अटाकामा असा प्रदेश आहे जिथे अनेक ठिकाणी गेल्या ५०० वर्षात पाऊसच पडलेला नाही. आणि जेथे पडतो तेथे...