Friday, 2 December 2022

ला पाझ

ला पाझ अक्षरशः आकाशात वसलेलं शहर आहे. कारण बोलीव्हियाची ही राजधानी समुद्रसपाटी पासून सरासरी ३७०० मीटर (सुमारे १२००० फूट) उंचीवर आहे.


माउंट इलिमानीच्या छायेतलं ला पाझ

चारी बाजूंना आकाशाला भिडलेल्या डोंगरांच्या मधील वर्तुळाकृती वाडग्याच्या उतरत्या भिंतींवर बांधलेलं हे शहर दृष्टीला पडलं तेंव्हा पहिली प्रतिमा माझ्या मनात उभी राहिली ती सर्कशीतल्या मृत्युगोलाची. त्यातला तो शूरवीर फटफटीचालक कसा, वर्तुळाकार फिरत फिरत मृत्युगोलाच्या तळापासून वरपर्यंत जातो, ला पाझ मधली वाहनाची रहदारी सुद्धा त्या वाडग्याच्या वरच्या काठावरून पाहिलं तर तशीच दिसते. 



माउंट इलिमानी ह्या २१००० फूट उंच शिखराच्या कुशीतील हा प्रदेश प्रागैतिहासिक काळात एका ग्लेशियरने (हिमनदी) व्यापलेला होता. कालौघात लुप्त होता होता ह्या हिमनदीने सभोवतालचे पर्वत कातून काढून बनवलेल्या खिंडीत ला पाझ वसलेलं आहे. ह्या कातकामातून निर्माण झालेल्या कडे-कपारींचे  विलक्षण आकार शहराच्या सभोवताली आजही दिसतात.

 


एखाद्या परग्रहावरचं  भासावं  असं शहराच्या सीमेवरच्या “Moon Valley” मधलं दृश्य).  


ला पाझच्या वाडग्यासारख्या रचनेमुळे, शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचं असेल तर सरळ रेषेत दिसणाऱ्या अंतराच्या तिप्पट प्रवास करावा लागतो - एक तर वाडग्याच्या काठावरून गोलाकार फिरून किंवा वाडग्याच्या काठापासून तळापर्यंत आणि परत तळातून समोरच्या काठापर्यंत.

        


त्यामुळेच आकाशातच  वसलेल्या ह्या शहरातील सार्वजनिक वाहतूक ही मुख्यतः बस किंवा ट्रेन ऐवजी आकाशातूनच जाणाऱ्या रोप-वे ने होते. रोप-वे चं हे जाळं कोळ्याच्या जाळ्यासारखं चहूदिशांना पसरलेलं आहे (चौथा फोटो).

        

आजचा बोलिव्हिया जेंव्हा स्पॅनिश साम्राज्याची वसाहत होता तेंव्हा त्याला अप्पर (म्हणजे उत्तरेचा नव्हे तर अक्षरशःउंचावरचा”) पेरू असंच म्हणत. त्याचं बोलिव्हिया हे नाव ज्या सिमोन बोलीवार वरून ठेवण्यात आले तो संपूर्ण इतिहासातील कदाचित असा एकमेव माणूस असेल जो एकाच वेळी ६ वेगवेगळ्या स्वतंत्र राष्ट्रांचा निर्वाचित राष्ट्राध्यक्ष होता. 



परंतु बोलिव्हियाच्या स्वातंत्र्यसंग्रामाची सुरुवात बोलीवारच्याही आधी अपोलीनार हायेन आणि डॉन पेद्रो डॉमिंगो मुरीयो ह्यांनी पुकारलेल्या बंडा पासून झाली होती. दोघांचाही जन्म खानदानी सरदार कुळातील, दोघांचेही वाडे ला पाझ मध्ये एकाच रस्त्यात (काब्रा कांचा).


ह्या रस्त्याला बोलिव्हियाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनन्यसाधारण  स्थान आहे. एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात बोलिव्हियात झालेल्या जनजागृतीची सुरुवात ह्याच रस्त्यापासून झाली. येथील आजही दिसणारे साधेसुधे कॅफे, गुत्ते आणि उपाहारगृहं ही स्वत्वाची जाणीव झालेल्या देशभक्तांची गुपचूप भेटण्याची आणि त्यांना वेळप्रसंगी आसरा देणारी ठिकाणं होती.  लढ्याच्या  पहिल्या योजना इथेच आखल्या गेल्या. स्पेनच्या राजसत्तेला आव्हान देणाऱ्या घोषणा इथेच पहिल्याने पुकारल्या गेल्या. डॉन मुरीयो आणि हायेन दोघांनाही मात्र त्यांनी पुकारलेल्या ह्या बंडाबद्दल फाशी देण्यात आलं आणि त्यांच्या अनुयायांची निर्घृण कत्तल  करण्यात  आली.

 


ला पाझ मधील सर्वात महत्वाचा चौक आज डॉन मुरियो प्लाझा नावाने ओळखला जातो (पाचवा फोटो) आणि काब्रा कांचा रस्त्याला काय्ये अपोलिनार हायेन असं नाव देण्यात आलं आहे.

         


अजूनही हा रस्ता आपलं अठराव्या शतकातील रूप टिकवून आहे. पदपथावरील तसेच कॅफे, तीच जुन्या स्पॅनिश शैलीची रंगीबेरंगी घरे, तसाच फरसबंदी रस्ता - त्यावरून चालताना आपल्याला चटकन भूतकाळात घेऊन जातात (फोटो क्र. ६,७) . आज हा रस्ता ला पाझ मधील उभरत्या कलाकारांचं केंद्रस्थान आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला छोट्या


छोट्या स्टुडिओ मधील कलेच्या प्रांतातील तरुण मुशाफिरांची प्रदर्शनं, आपल्याला साल्वादोर दाली आणि पिकासोच्या काळातील पॅरिस मधील मॉंमार्त्र ची आठवण करून देतात. रस्त्यातील हायेन आणि मुरीयो ह्यांच्या मूळ वाड्यांचे  आज त्यांच्या आठवणीसाठी म्युझियम मध्ये रूपांतर करण्या आले आहे. 







ला पाझच्या रस्त्यांतून भटकणे हा त्यातील वैविध्यांमुळे (एकीकडे चेटक्यांची गल्ली -जी आपण ह्या पूर्वीच्या लेखात पहिली, दुसरीकडे कार्निवाल साठी वापरायचे चित्रविचित्र पोशाख विकण्याचा बाजार, तिसरीकडे "Moon Valley"चे विलक्षण दृश्य) जितका मनोरंजक तितकाच दमछाक करणारा अनुभव आहे.

 

 








समुद्र सपाटी पासून १२५०० फुट उंचावरील रस्त्यातून फिरताना जेंव्हा एकदम २०० पायऱ्या चढून जायचा प्रसंग येतो तेंव्हा आपल्या वयाच्या मानाने "आपण किती fit आहोत" ह्याबद्दलचे गोड गैरसमज चटकन विरून जातात.  पण ला पाझ पेक्षाही अधिक विलक्षण अश्या बोलिव्हियातील दोन ठिकाणी आपण पुढच्या अंकात जाऊ.

No comments:

Post a Comment

  विसरलेले समाज - २ : टुलोर   चिले देशातील अटाकामा असा प्रदेश आहे जिथे अनेक ठिकाणी गेल्या ५०० वर्षात पाऊसच पडलेला नाही. आणि जेथे पडतो तेथे...