Wednesday, 9 November 2022

पापिरस - प्राचीन इजिप्तचा कल्पवृक्ष

 


कागद बनविण्याचा शोध लागे पर्यंत आपले पूर्वज भूर्जपत्र, लाकडाच्या फळ्या, झाडाची सालं, मातीच्या टॅब्लेटस् किंवा चक्क दगड अशी साधने वापरून आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या नोंदी, महत्वाच्या घडामोडी, धार्मिक उपदेश किंवा राज्यकारभाराच्या बखरी लिहून (किंवा खोदून!) ठेवत असत. 

 मी इजिप्तला जाईपर्यंत, पापिरस म्हणजे सुद्धा प्राचीन ईजिप्शियन समाजात फक्त कागदाला पर्याय म्हणून वापरण्याची वस्तू अशीच माझी समजूत होती. इजिप्तमध्ये फिरताना, लक्झर, कार्नाक किंवा अबू सिम्बेल  सारख्या प्राचीन देवळात किंवा लक्झरमध्ये नाईल नदीच्या पश्चिम किनाऱ्यावरील राजेराण्यांच्या थडग्यातील भित्तिचित्रात, विविध प्रकारे चितारलेल्या पापिरसच्या प्रतिमा आणि त्यांचं एकूणच वास्तुरचनेतील महत्व पाहून, ह्या साध्या गवत किंवा बांबू सारख्या दिसणाऱ्या वनस्पतीला प्राचीन इजिप्तशिअन संस्कृतीमध्ये काहीतरी विशेष महत्व असलं पाहिजे मला वाटू लागलं. उदाहरणार्थ, हा राजा सेटी पहिला ह्याच्या कार्नाक मंदिरातील मंडपाचा पापिरसच्या देठाच्या आकाराचा खांब, किंवा हे अबू सिंबेलच्या देवळातील भित्तीचित्र - देवी हॅथोर गाईच्या रूपात, पापिरसच्या शेतात.



नारळ हा जसा आपल्या कोंकणाचा कल्पवृक्ष आहे तसंच काहीसं स्थान पापिरसला इजिप्त मध्ये होतं. त्याच्या पासून कागदासारखी भूर्जपत्रे बनवून लिहिण्यासाठी तर त्याचा उपयोग केला जात असेच, पण पापिरस विणून बनविलेल्या होड्या/तराफे हे नाईल नदीतून होणाऱ्या दळणवळणाचं महत्वाचं साधन होतं. ह्या नावा/तराफे इतक्या उत्तम दर्जाचे असत की थॉर हेयरदाल हा मानववंशशास्त्रज्ञ अश्याच नावेतून प्रवास करून पूर्ण अटलांटिक महासागर पार करून दक्षिण अमेरिकेपर्यंत गेला. त्याची हकीकत “आम्ही पार्लेकर” मधील माझ्या वर्षभरापूर्वीच्या लेखात वाचलेली कदाचित तुम्हाला आठवत असेल. पण त्याशिवाय पापिरसचा गाभा उकडून खाल्लाही जात असे, उरलेल्या भागाचा गाई-गुरांना चारा  म्हणून किंवा स्वयंपाकासाठी जळण म्हणून वापर होत असे. त्यापासून चटया, टोपल्या बनविल्या जात आणि घरांचं छप्परही बनविता येई. 


पण पापिरसला प्राचीन ईजिप्शियन संस्कृतीत महत्वाचं स्थान असण्याचं कारण निव्वळ त्याची दैनंदिन जीवनातली उपयुक्तता एव्हढंच मात्र नव्हतं. पापिरस हे एक अतिशय महत्वाचं राजकीय आणि धार्मिक प्रतीक होतं.  


राजकीय दृष्ट्या प्राचीन इजिप्तचे दोन मुख्य विभाग होते - नाईल नदीच्या मुखाजवळील म्हणजे साधारणतः  प्राचीन मेम्फिस पासून (आजच्या कैरो शहराच्या जवळ दक्षिणेला) भूमध्य सागरा पर्यंतचा उत्तरेचा प्रदेश (Lower  इजिप्त) अणि तेथून दक्षिणेला नाइल नदीच्या उगमापर्यंतचा प्रदेश (Upper इजिप्त). दोन्ही विभागांमध्ये राजकीय क़ुरबुरी, वेळप्रसंगी हाणामाऱ्याही चालू असत. मग एखादा दुसरा रामसेस किंवा तिसरा अमेनहोतेप सारखा बलिष्ठ राजा गादीवर बसल्यावर दोन्ही बाजूंना वठणीवर आणून इजिप्तचं एकत्रीकरण करत असे. इजिप्तच्या इतिहासात अश्या “एकत्रीकरणाचा” उल्लेख वारंवार येतो. आणि कित्येक प्राचीन देवळांत अश्या एकत्रीकरणाचं स्मारकही शिलालेख किंवा भित्तिचित्रांच्या स्वरूपात आपल्याला दिसतं. पापिरस हे Lower (म्हणजे उत्तरेचा विभाग) इजिप्तचं प्रतीक होतं. तर कमळ हे Upper (म्हणजे दक्षिणेकडील) इजिप्तचं प्रतिक होतं.


आणि ह्या एकत्रीकरणाच्या स्मारकांत राजा कमळाचं देठ आणि पापिरसचं खोड ह्यांची गाठ मारतो आहे असं दृश्य दाखविलेलं असे (पहा पहिला फोटो - कार्नाक देवालयाच्या भिंतीवरील शिल्पात राजा तिसरा अमेनहोतेप अशी गाठ मारताना). 


पण पापिरसच्या महत्वाचं मुख्य कारण इजिप्तच्या पुराणकथांशी निगडित होतं. इजिप्तशिअन समजुतीनुसार पृथ्वीवरील सर्व जीवनाचा उगम एका प्राचीन दलदलीतून झाला. आणि पापिरसही नाईल नदीच्या मुखाजवळील अश्याच दलदलीच्या क्षेत्रात प्रामुख्याने उगवत असल्याने, पापिरसचं शेत हे जीवनाच्या उगमाचं प्रतीक मानलं गेलं. इजिप्तशिअन पुराणांत देवादिकांच्या आपापसातील चढाओढीच्या (जश्या आपल्या पुराणात राक्षस आणि देवांतील स्पर्धेच्या गोष्टीत आहेत) अनेक कथा आहेत - मुख्यतः सत्याचा विजय आणि दुःप्रवृतींचा विनाश असा बोध देणाऱ्या ह्या कथा आहेत. त्यातील अनेक  प्रसिद्ध कथा सेत (दुष्ट प्रवृतींचं प्रतीक) आणि  ओसिरीस आणि ओसिरीसची बायको आयसिस (सत्प्रवृतींची प्रतीकं) ह्या दैवतांच्यातील युगानुयुगे चाललेल्या युद्धाबद्दल आहेत. त्यातील एका कथेत सेतने ओसिरीसचा वध केल्यावर त्याच्या पासून आपल्या लहानग्या बाळाला - होरसला वाचविण्यासाठी आयसिस पापिरस च्या शेतात लपून बसते असा प्रसंग आहे. अर्थात होरस मोठा होऊन आपल्या बापाचा वधाचा सूड घेतो अशी पुढची कथा आहे. पण प्राचीन इजिप्शिअन समाजाच्या उत्तर काळात होरस हा सर्वात जास्त पुजला जाणारा देव बनला (जसा त्यांच्या पूर्व काळात अमुन हा सर्वात महत्वाचा देव होता) त्यामुळे, ह्या पापिरसला आणि त्याच्या शेताला पवित्रतेचं जे वलय लाभलं त्याच्या खुणा अनेक प्रकारे इजिप्तशिअन देवळांत आज दिसतात. 



उदाहरणार्थ पापिरसच्या देठापासून बनविलेलं “आंख” प्रत्येक देवाच्या हातात तुम्हाला दिसेल (पहा दुसऱ्या फोटोतील ख्रिश्चन क्रॉस सारखं पण गोल डोकं असलेलं चिन्ह, डावीकडून पहिलं). आंख हे सर्व सुख-समृद्धीचं प्रतीक होतं. तसेच बहुतेक देवळातील स्तंभ पापिरसच्या झाडाच्या आकाराचे बनविलेले दिसतील. अनेक देवळांत पापिरसचं शेत दर्शविणारी शिल्पं दिसतील.



ह्याचं सर्वात थक्क करणार उदाहरण आहे कार्नाकच्या देवळातील राजा पहिला सेटी आणि  त्याचा मुलगा दुसरा रामसेस  ह्यांनी उभारलेला मंडप.


सुमारे ५००० चौ. मी. एव्हढ्या जागेत १० ते २१ मी. (म्हणजे ३० ते ७० फूट) उंच आणि ३ मी. (१० फूट) व्यासाचे पापीरसच्या देठाच्या आकाराचे १३४ स्तंभ उभारून दलदलीत उगविणाऱ्या पापिरसच्या शेतातील अंधारं, कुंद वातावरण निर्माण करणारा हा मंडप म्हणजे प्राचीन इजिप्तच्या स्थापत्यकलेचा (कदाचित त्याच्या पिरॅमिड पेक्षाही अधिक) उत्तम नमुना आहे.



प्रत्येक स्तंभ आणि ह्या मंडपाच्या भिंती दोन्ही राजांच्या कारकिर्दीतील यशोगाथा सांगणाऱ्या चित्रांनी भरलेल्या आहेत. मंडपाच्या छतावर (वर उल्लेखलेला दुसरा फोटो ह्या छताच्या शिल्लक राहिलेल्या तुकड्याचा आहे) शुभशकुन दर्शविणारी चित्रे रंगविलेली आहेत. बाकीचे सर्व फोटो ह्या मंडपातील स्तंभ, त्यावरील कलाकुसर आणि भित्तिचित्रांचे आहेत. 






No comments:

Post a Comment

  विसरलेले समाज - २ : टुलोर   चिले देशातील अटाकामा असा प्रदेश आहे जिथे अनेक ठिकाणी गेल्या ५०० वर्षात पाऊसच पडलेला नाही. आणि जेथे पडतो तेथे...