Wednesday, 9 November 2022

स्त्री स्वातंत्र्याची आद्य उद्गाती?

प्रागैतिहासिक काळापासून आज पर्यंत, जगातील सर्व समाजांत सत्तेची मालकी ही नेहेमीच पुरुषवर्गाच्या हातात राहिली आहे. मग ती राजकीय सत्ता असो, उद्योगधंद्यातील असो किंवा सामाजिक क्षेत्रातील असो. आणि त्याविरुद्ध आवाज उठविणाऱ्या आणि समान हक्कांची मागणी करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला त्याची किंमतही नेहेमीच मोजावी लागली आहे – मग ती स्त्री अगदी हातशेपसुत सारखी इजिप्तची सम्राज्ञी असली तरी सुद्धा.

“हातशेपसुत” हे नाव मी प्रथम ऐकले तेंव्हा मी लक्झर मध्ये नाईल नदीच्या पश्चिमेच्या डोंगराळ भागावर तरंगणाऱ्या बलूनला लटकवलेल्या हौद्यातून खाली दिसणाऱ्या इजिप्तच्या राजे-राण्यांच्या कबरस्थानांचे आणि भग्नावस्थेतील देवळांचे फोटो काढत होतो. पहिल्या फोटोत दिसणाऱ्या ह्या इमारतीकडे बोट दाखवून आमच्या बलूनचा चालक म्हणाला “ते पहा हातशेपसुतचं देऊळ”.


ह्या देवळाची रचनाही तिच्या कारकीर्दीप्रमाणेच बंडखोर आहे -  तत्कालीन रूढ स्थापत्यनियम झुगारून स्वतःचा नवीन पायंडा पाडणारी. बहुतेक सर्व इजिप्शिअन देवळे एकाच साच्यातून काढलेल्या ठराविक घटकांची (दरवाजाच्या दोन्ही बाजूच्या आयताकृती भिंती, आतील विविध आवारे, दगडातून कोरलेले उत्तुंग स्तंभ) ठराविक रचना करून बांधलेली आढळतात. जवळच असलेल्या सम्राट तिसरा रामसेसच्या देवळाची ही परंपरागत रचना (दुसरा फोटो) तुलना म्हणून पाहिली की  हातशेपसुतच्या देवळाचं वेगळेपण ध्यानात येईल. 

केवळ तिचं देऊळच नव्हे तर हातशेपसुतचं संपूर्ण आयुष्यच परंपरागत बंधनांना ठोकरणारं होतं. वंशपरंपरेने  इजिप्तचं सिंहासन बापाकडून त्याच्या पट्टराणीच्या ज्येष्ठ मुलाकडे जाणं अपेक्षित असे. मात्र हे इतक्या सुरळीतपणे क्वचितच घडत असे. कधी तिला मुलगाच नसे, कधी मुलगा अकाली मृत्युमुखी पडे (किंवा मुद्दाम मारला जाई). अश्या प्रसंगी राजवाड्यात अंतर्गत हाणामारी होऊ नये म्हणून बाकीच्या राण्यांपैकी एखादीचा मुलगा भावी सम्राट म्हणून निवडला जात असे. आणि त्याचा राज्यावरचा वांशिक हक्क पक्का करण्यासाठी पट्टराणीच्या ज्येष्ठ मुली बरोबर त्याचं लग्न लावून दिलं जात असे. हातशेपसुतच्या बाबतीतही असंच घडलं. ती तुतमोस १ ह्या सम्राटाच्या पट्टराणीची ज्येष्ठ मुलगी. ती जर मुलगा असती तर वारसाहक्काने तीच सम्राट झाली असती. पण तिच्या बापाच्या मृत्यू नंतर तिचा सावत्र भाऊ तुतमोस २ हा सम्राट झाला. खरं पहाता राज्य चालविण्याची क्षमता आणि कर्तबगारी तुतमोस पेक्षा हातशेपसुतमध्येच अधिक होती. पण तिला त्याची पट्टराणी बनण्यातच समाधान मानावं लागलं.  तुतमोस २ लवकरच वारला आणि पुन्हा एकदा हातशेपसुतवर आपला हक्क गमाविण्याची पाळी आली. कारण तिला फक्त दोन मुलीच होत्या. त्यामुळे एका दुय्यम राणीच्या ६ वर्षाच्या मुलाला तुतमोस ३ नाव देऊन इजिप्तचा सम्राट बनविण्यात आलं. हातशेपसुतसारख्या महत्वाकांक्षी आणि कर्तबगार व्यक्तीला ही दुसऱ्यांदा झालेली आपल्या हक्काची पायमल्ली सहन होणं शक्यच नव्हतं.

परंतु हजारो वर्षांपासून चालत आलेल्या प्रथा सहजा-सहजी मोडणंही सोपं नव्हतं. सुरुवातीला हातशेपसुतने अल्पवयीन तुतमोस ३ च्या नावाने त्याची पालक ह्या नात्याने राज्यकारभार केला. पण धूर्तपणे तिने निष्ठावंत आणि प्रबळ असे सेनेन-मत सारखे मंत्री आणि हापू-सेनेब सारखे धर्मगुरू ह्यांची सक्षम फळी आपल्याभोवती निर्माण केली. हापू-सेनेबच्या मदतीने हातशेपसुत म्हणजे देवाधिदेव अमुनची मुलगी (आणि म्हणून राजसत्तेची खरी हक्कदार) असा प्रचार देशभर केला गेला. सेनेन-मतच्या मदतीने राज्यकारभाराच्या सर्व नाड्या आपल्या हातात घेऊन हातशेपसुतने तुतमोस ३ ला बाजूला सारलं आणि स्वतःलाच इजिप्तचा फॅरो म्हणजे सम्राट (राणी किंवा सम्राज्ञी नव्हे) घोषित केलं. हजारो वर्षांची परंपरा ठोकरून एक स्त्री इजिप्तच्या साम्राज्याची सर्वेसर्वा होणे ही घटना अभूतपूर्वच होती.

हातशेपसुतने २१ वर्ष यशस्वीपणे राज्य केलं. जो कालखंड (१५५० BC ते ११०० BC - १८व्या आणि १९व्या राजघराण्यांचा काळ) इजिप्तच्या सर्वोच्च भरभराटीचे मानला जातो, त्यांची सुरुवातच हातशेपसुतच्या कारकि‍र्दी पासून झाली असं म्हणायला हवं. युद्धांऐवजी व्यापारवृद्धीने इजिप्तचं ऐश्वर्य तिच्या काळात वाढीस लागलं. तिच्या व्यापारी मोहिमांची चित्रे तिच्या देवळाच्या भिंतींवर रेखाटलेली आपल्याला दिसतात (पहा शेजारचा फोटो).




मात्र परंपरेचा पगडा लोकमानसावर एव्हढा जबरदस्त असतो की एक यशस्वी राज्यकर्ती असून सुद्धा तिला आपलं स्त्रीत्व लपवून आपली सार्वजनिक प्रतिमा पुरुषासारखी प्रतीत करावी लागली. अनेक भित्तीचित्रं, पुतळे ह्यात ती पुरुषाच्या रूपात (खोट्या दाढी सकट) आपल्याला दिसेल (चौथा फोटो).



एव्हढंच नव्हे तर तिच्या मृत्यू नंतर जेंव्हा तिचा सावत्र मुलगा तुतमोस ३ सम्राट बनला तेंव्हा त्याने पद्धतशीरपणे तिची स्मृती इतिहासातून पुसून टाकायचा प्रयत्न केला. कर्नाक सारख्या देवळात आजही आपल्याला अनेक ठिकाणी भिंती खोदून पुसून टाकलेल्या तिच्या प्रतिमा दिसतील (पाचवा फोटो).





पण सुदैवाने स्त्री स्वातंत्र्याच्या ह्या आद्य उद्गातीची कथा जिवंतच राहिली.

No comments:

Post a Comment

  विसरलेले समाज - २ : टुलोर   चिले देशातील अटाकामा असा प्रदेश आहे जिथे अनेक ठिकाणी गेल्या ५०० वर्षात पाऊसच पडलेला नाही. आणि जेथे पडतो तेथे...