तुम्ही आत्तापर्यंत सर्वात मोठं पुस्तक म्हणजे किती मोठं पाहिलं आहे?
तुम्ही भा.रा. भागवतांचं “मायापूरचे रंगेल राक्षस” वाचलं आहे का? त्यात पहिल्याच प्रकरणात जानू शेतकऱ्याचं संपूर्ण शेत व्यापून टाकणाऱ्या, सर्व राक्षस कुळांचा इतिहास असलेल्या पुस्तकाचं वर्णन आहे. भागवतांना ही कल्पना कदाचित मंडालेतल्या कुथोडा पागोडाच्या आवारातल्या त्रीपिटका ह्या बौद्ध धर्मातल्या पवित्र शास्त्रवचनांच्या पुस्तकावरूनच सुचली असेल! 😉😉😉
कारण साधारण
पुरूषभर उंच आणि दोन हात रूंदीची अखंड संगमरवराची शिळा म्हणजे एक पान, ह्या
प्रत्येक “पानावर” पाठपोट ८०-१०० ओळी कोरलेल्या आणि अशी ७२९ “पानं”, प्रत्येक एका शुभ्र घुमटीमध्ये, नजर पोचेल
तेथपर्यंत एका मैदानावर पसरलेली, असं हे
पुस्तक आहे! जर हे पुस्तक
कागदावर छापलं तर ४०० ऑक्टेवो आकाराच्या पानांचा एक, असे ३८ खंड भरतील!
हे पुस्तक संपूर्ण वाचण्यासाठी काही मैलांचा फेरफटका मारावा लागतो. म्हणजे बुद्धीविकास आणि शारीरिक तंदुरुस्ती असे एका दगडात दोन पक्षी!
एकोणिसाव्या शतकात म्यानमारचा राजा मिन्दोन आपलं राज्य ब्रिटीश आक्रमणापासून वाचवायला झगडत असतना हे जगातलं सर्वात मोठं पुस्तक बांधलं गेलं. त्यावेळेपर्यंत ब्रिटीश फौजांनी दक्षिण म्यानमार जिंकून, लुटून उद्ध्वस्त केला होता. आणि उरलेल्या आपल्या राज्याचीही अशीच वाताहत होणार हे मिन्दोनला कळून चुकलं होतं. तेंव्हा आपल्या धर्माचा सर्वात पवित्र वारसा अविनाशी स्वरूपात कायमचा टिकावा अशा काहीश्या विचारातून ह्या पुस्तकाची निर्मिती झाली असावी.
आजही कुथोडा पागोडाच्या आवारात नजर पोचेल तेथपर्यंत रेखीव रांगांमध्ये बांधलेल्या सुंदर शुभ्र घुमट्या, प्रत्येक घुमटीमध्ये एक भव्य वळणदार अक्षरं कोरलेलं “पान” असं हे थक्क करणारं दृष्य पाहायला मिळतं (पहिला फोटो) त्या कोरलेल्या अक्षरांत एकेकाळी भरलेलं सोनं मात्र ब्रिटीश सैनिकांनी लुटून नेल्यामुळे आज त्यात काळा रंगच फक्त दिसतो!
म्यानमारमधला आणखी एक चमत्कार म्हणजे बर्मा टीक नावाने प्रसिद्ध असलेलं लाकूड. गीतेमध्ये आत्म्याचं वर्णन करताना म्हटलं आहे - “न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुतः”! हे बर्मा टीकचंच वर्णन आहे. उन, पाउस, वारा इतकच काय वाळवीसुध्दा त्यावर शतकानुशतकं काहीही परिणाम करु शकत नाही. आजही संपूर्णपणे ह्या लाकडाने शेकडो वर्षांपूर्वी बांधलेल्या भव्य इमारती टिकून आहेत.
किंवा हे शेवटचे २ फोटो पहा - महामुनी बुद्ध पागोडातल्या लाकडात कोरलेल्या कमानी – दीडदोनशे वर्ष जुन्या!
No comments:
Post a Comment