तुम्हाला यूल ब्रायनर नावाचा एके काळचा हॉलीवूडचा सुपर-स्टार आठवतो आहे का? तुम्ही जर माझ्या वयाच्या आसपासचे असाल तर Ten Commandments, Magnificent Seven किंवा King and I असे त्याचे गाजलेले सिनेमा तुम्ही नक्कीच बघितले असणार. पण तुम्हाला कदाचित हे माहित नसेल की यूल ब्रायनरचे पूर्वज, बुरयात नावाच्या सायबेरिया मधील एका वैशिष्ठ्यपूर्ण समाजातले होते.
हा बुरयात समाजही मी मागच्या वेळी ज्यांबद्दल लिहिलं त्या तातार लोकांसारखाच चेंगीज खानाच्या मंगोल साम्राज्याचा अवशेष आहे. बुरयात लोकांची मातृभूमी “बुर्यातीया” म्हणजेच सायबेरियातील अंकारा नदी आणि बैकल सरोवराचा पूर्व किनारा येथील परिसर, हा मंगोल साम्राज्याचाच एक विभाग होता. त्यांची मूळ भाषा मंगोल भाषेचीच बहिण म्हणावी अशी होती, त्यांचा मूळ धर्म सुद्धा मंगोल टोळ्यांच्या पारंपारिक धर्मासारखाच निसर्गपूजे वर आधारित होता. जसजसा मंगोलियात तिबेटी बौद्ध धर्माचा प्रसार वाढत गेला तसा बुरयात लोकांनी सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला. बुर्यातीया हे आज रशियातील एकमेव बौद्ध राज्य आहे.
१७ व्या शतकात, रशियन फौजांनी भटक्या-विमुक्त बुरयात टोळ्यांचा पराभव करून बुर्यातीयावर आपला कब्जा केला. सांस्कृतिक आणि वांशिक दृष्टीने संपूर्णपणे वेगळ्या अशा रशियन लोकांच्या वर्चस्वाचा स्वीकार मात्र बुर्यातीयामध्ये सहजासहजी झाला नाही. १९३० साली स्टालिनच्या फौजांनी हजारो बुरयात नागरिकांचं शिरकाण करे पर्यंत, जवळ जवळ तीनशे वर्ष बुर्यातीयामध्ये सतत रशियन राज्यकर्त्यांविरुद्ध बंडाळी होत राहिली. स्टालिनच्या राजवटीत जी अनेक क्रूर हत्याकांडे झाली त्यात बुरयातांच्या ह्या शिरकाणाची गणना फार वरच्या क्रमांकाला होईल. परिणामतः बुरयातांच्या भाषेवर, धार्मिक व्यवहारांवर, पारंपारिक आचारपद्धतींवर बंदी आणून त्यांना मारून मुटकून “रशियन” बनविण्यात आलं. तरीसुद्धा त्यांच्या मूळ सांस्कृतिक संवेदना जीवंत राहिल्या. आज जर तुम्ही बुर्यातीयाला भेट दिलीत तर पाश्चात्य सांस्कृतिक धागे आणि मूळच्या मंगोल/बौद्ध परंपरा ह्याचं एक वेगळचं मिश्रण तुम्हाला पाहायला मिळेल.
आधुनिक काळात बांधलेल्या बॅले थिएटर मध्ये पारंपारिक संगीत/नृत्याचेही प्रयोग होतात आणि एखाद्या हॉटेल मध्ये पारंपारिक वेशभूषेतील युवती जुन्या प्रथेप्रमाणे भाकरी देऊ करून तुमचं स्वागतही करते (चौथा फोटो).
आणि बुर्यातीयाची भेट, त्याच्या पश्चिम सीमेवरच्या बैकल सरोवरावर एक फेरी मारल्याशिवाय पूर्णच होणार नाही. ट्रेनच्या खिडकीतून बैकलच्या झालेल्या पहिल्या दर्शनापासून आपण वासलेला तोंडाचा आ, गाडी पोर्ट बैकल स्टेशनावर थांबेपर्यंत आपण मिटला नाही आहे, हे सुद्धा माझ्या लक्ष्यात आलं नव्हतं.
बैकल सरोवर हा जगातला सर्वात मोठा पिण्यायोग्य पाण्याचा साठा आहे आणि हे जगातलं सर्वात सखोल सरोवर आहे. पण असं सर्व रुक्ष वर्णन तुम्ही विकीपिडिया वरही वाचू शकाल. आणि बैकल च्या सौन्दर्याचं वर्णन माझ्यापेक्ष्या अधिक सिद्धहस्त लेखकाची लेखणीच करू शकेल. तेंव्हा मी फक्त तुम्हाला एखादा फोटोच दाखवू शकतो (पाचवा आणि सहावा फोटो).
रशिया आणि
सायबेरिया सोडून पुढच्या वेळी आपण थोडं दक्षिणेकडे जाऊ. प्लेटो ह्या सुप्रसिद्ध
ग्रीक तत्वज्ञाने
वर्णन केलेल्या अॅटलांटीस
ह्या काल्पनिक विश्वातल्या नगरीचा थोडासा शोध आपल्या खऱ्या जगात घ्यायचा प्रयत्न
करू.
No comments:
Post a Comment