Tuesday, 8 November 2022

स्वर्गारोहणाचे गाईड!

महाभारताच्या महाप्रस्थान पर्वातील पांडवांच्या शेवटच्या प्रवासाची कथा तुम्हाला आठवते का? स्वर्गाच्या दिशेने प्रवास करताना प्रथम द्रौपदी आणि मग एकेक पांडव वाटेत पडतात आणि फक्त युधिष्ठिर आणि त्याचा कुत्रा सर्व संकटांचा सामना करून स्वर्गाच्या दारापर्यंत पोचतात, अशी काहीशी ही गोष्ट फार पूर्वी वाचल्याचं मला आठवतं. त्याची आठवण मला झाली, राजा रामसीस चौथा ह्याच्या थडग्याच्या भिंतींवरील थक्क करणारी चित्रं बघताना  इजिप्त मध्ये.



तीन हजार वर्ष जुनी असून सुद्धा अजूनही जिवंत दिसणारी ही चित्रं म्हणजे एका अतिशय भन्नाट पुस्तकातील निवडक उतारे आहेत. आणि बहुतेक सर्वच इजिप्शियन राजांच्या थडग्यांत भिंतीवर किंवा पापिरस म्हणजे भूर्जपत्रावर ह्याच पुस्तकातील महत्वाचे धडे चित्ररूपाने रेखाटलेले सापडतात.






काय आहे हे पुस्तक? कार्ल लेप्सियस ह्या इजीप्टॉलॉजिस्टने (ज्याने ह्या पुस्तकाचं सर्वात प्रथम इंग्रजी भाषांतर केलं) त्याला नाव दिलं होतं “Book of the Dead”.


पहा पहिला फोटो, ह्या पुस्तकातील काही पाने! – राजा तुतनखामूनच्या थडग्यात मिळालेली. पण खरं तर त्याचं नाव हवं “यशस्वी स्वर्गारोहणासाठी मार्गदर्शक पुस्तिका” किंवा असंच काहीतरी. हे पुस्तक कधी आणि कोणी लिहिलं कोणास ठाऊक. पण इजिप्त मधील पहिल्या साम्राज्याच्या स्थापनेच्या आधीपासून म्हणजे किमान ६ हजार वर्षांपूर्वीपासून ते अस्तिवात असावं.

प्राचीन इजिप्शियन समजुतींप्रमाणे प्रत्येक मृत व्यक्तीचा आत्मा मावळत्या सूर्याबरोबर आपल्या अखेरच्या प्रवासाला निघतो. ह्या प्रवासात येणाऱ्या अडचणींवर जर मात करू शकला तरच तो स्वर्गात पुन्हा एकदा आपला पृथ्वीवरील देह धारण करून सर्व सुखं अनंतकाळ भोगू शकतो.

ह्या अडचणींचा सामना करण्याच्या युक्त्या ह्या पुस्तकात तपशीलवार वर्णिलेल्या आहेत. उदाहरणार्थ मार्गातला पहिला अडथळा आहे अपेप नावाचा सर्पाकृती दैत्य जो ह्या मृतात्म्याला गिळंकृत करायला टपून बसलेला असतो.


त्यासाठी अमुन-रे च्या (म्हणजे सूर्यदेवाच्या) होडीमध्ये आपला शिरकाव कसा करून घ्यायचा आणि अपेपचा परस्पर काटा काढण्यासाठी अमुन-रे ला कसं “पटवायचं” इथूनच त्या पुस्तकाची सुरुवात होते. पहा दुसरा फोटो - आपल्या बोटीत उभा अमुन-रे आणि पंख असलेला सर्पाकृती राक्षस अपेप. 


(पहा  तिसरा फोटो – रामसीस राजा आपल्याल्या होडीत घेण्यासाठी अमुन-रे ची विनवणी करताना. आणि ).


असेच अनेक अडथळे पार केल्यानंतर येणारा एक महत्वाचा टप्पा म्हणजे आत्म्याच्या पाप-पुण्याचा हिशोब. मुख्य न्यायाधीश देव ओसिरीस आणि ४२ इतर देवांच्या न्यायमंडळा समोर मृतात्म्याला आपल्या आयुष्यातील बऱ्यावाईट कृत्यांचा जाब विचारला जातो. देव अनुबिस (कुत्र्याचं डोकं असलेला) आत्म्याने दिलेल्या उत्तरांचा खरेपणा त्या मृत व्यक्तीचं हृदय तराजूच्या एका पारड्यात आणि न्यायदेवता मट्ट दुसऱ्या पारड्यात ठेवून  पडताळून पाहतो. जर उत्तरं चुकीची असतील तर मट्ट आपोआप पिसासारखी हलकी होऊन तिचं पारड वर जातं आणि जवळच टपून बसलेला अमिट नावाचा दैत्य त्या आत्म्याला खाऊन टाकतो (पहा चौथा फोटो – डावीकडे सिंहासनावर बसलेला ओसिरीस
, तराजूपाशी उभा असलेला अनुबिस, हातात लेखणी घेऊन होणारे जाबजबाब लिहून घेण्यास तयार देव थॉथ, आणि त्याच्या डावीकडे खोटं बोलणाऱ्या आत्म्याला खाण्यास सज्ज राक्षस अमिट).

ह्या चौकशीला यशस्वीपणे कसं तोंड द्यायचं, कुठल्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची ह्याचं तपशीलवार मार्गदर्शन ह्या पुस्तकात तुम्हाला सापडेल. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्या आत्म्याला स्वर्गात (land of eternal bliss) प्रवेश मिळून त्याचं मृत शरीर पुन्हा एकदा पुनरुज्जीवित होत असे. इजिप्तमध्ये मृत शरीर टिकवून ठेवण्याची (Mummification) प्रथा पडण्याचं हे कारण होतं. 

आणि असं पुनरुज्जीवन झाल्यावर राजाला कसलीही कमतरता पडू नये म्हणूनच मृत राजाच्या शरीराबरोबर त्याचे दागदागिने, भांडीकुंडी, कपडे, खाणं-पिणं, इतकच नव्हे तर त्याच्या नोकर-चाकरांचे आणि सैनिकांचे पुतळे सुद्धा थडग्यात  ठेवले जात. (पहा पाचवा फोटो).

तरी बरं, जिवंत नोकरांना थडग्यात पुरायचा विचार ह्या पुस्तकात कोणी मांडला नाही. 

तर हे सर्व बघताना माझ्या मनात असा विचार आला की “अरेच्या, जर आपल्या देशातही अशी एखादी मार्गदर्शक पुस्तिका लिहिण्याचं कोणाला सुचलं असतं, तर सगळेच पांडव आणि द्रौपदी ती वाचून स्वर्गापर्यंत पोचले असते”!! म्हणून मला रामसेस ४ च्या थडग्यातील ती अप्रतिम चित्रं पाहताना पांडवांच्या महाप्रस्थानाच्या गोष्टीची आठवण झाली.

No comments:

Post a Comment

  विसरलेले समाज - २ : टुलोर   चिले देशातील अटाकामा असा प्रदेश आहे जिथे अनेक ठिकाणी गेल्या ५०० वर्षात पाऊसच पडलेला नाही. आणि जेथे पडतो तेथे...