मागच्या अंकात आपण इजिप्त मधल्या एका मनोरंजक पुस्तकाची तोंड-ओळख करून घेतली. इजिप्त सारख्या एखाद्या संस्कृतीची पाळं-मुळं जेंव्हा ५, ७ हजार वर्ष मागे जातात, तेंव्हा त्याच्या सभोवताली अनेक आख्यायिका, दंतकथा, कल्पनाविलास आणि इतिहास ह्यांचं प्रचंड कडबोळं तयार होतं. अर्थात त्या सर्वांचा नुसता दोन ओळीत उल्लेख करायचा झाला तरी “आम्ही पार्लेकरचे” कित्येक अंक खर्ची पडतील. तेंव्हा इजिप्तच्या इतिहासातील दोन विलक्षण व्यक्तींबद्दल – अखेनातेन आणि हातशेपसुत (पुढील अंकात) - थोडंसं बोलून मी हा इजिप्तचा अध्याय सध्या पुरता संपवीन.
साधारण ४००० वर्षांपूर्वी मेनुहोतेप दुसरा ह्याने उत्तर आणि दक्षिण इजिप्तमधील यादवी संपवून एकसंध साम्राज्याची स्थापना केल्यावर, थिबेस (आजचं कार्नाक) हे इजिप्तच्या राजकीय आणि धार्मिक सत्तेचं केंद्रस्थान बनलं. धर्म आणि राजसत्ता एकत्रित असणं सुरुवातीच्या काळात सर्वांच्याच सोयीचं होतं. कारण राजा म्हणजे सूर्यदेवाचा (अमुन-रे चा) पुत्र आणि राजाला विरोध म्हणजे महापाप, अशी समजूत समाजात दृढ करण्यात धर्मसंस्थेची मदत राजाला मिळत होती. आणि त्याबदल्यात धर्मगुरू आपली सत्ता आणि संपत्ती, जनतेची पिळकवणूक करत जोमाने वाढवत होते त्याकडे राजा काणाडोळा करत होता. त्यामुळे अखेनातेन गादीवर आला तेंव्हा, कार्नाकच्या मंदिरातील धर्मगुरूच राज्य चालवीत आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ह्या वातावरणात कार्नाकच्या धर्मगुरूंची राज्यशकटावरील पक्कड आणि सामान्य जनतेची त्यांनी चालवलेली पिळवणूक मोडून काढण्यासाठी अखेनातेनने दोन विवादास्पद निर्णय घेतले.
राजकीय व्यवहारापासून, या डोईजड झालेल्या देवपुजाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी त्याने आपली राजधानी थिबेस/कार्नाक मधून हलवून अमर्ना ह्या नव्याने बांधलेल्या शहरात नेली. आणि इजिप्तचा प्राचीन धर्म मोडीत काढून आतेन ह्या नवनिर्मित देवाच्या नावाने नवीन एकेश्वरवादी सुलभ धर्माची स्थापना केली. पुढील १४ वर्ष त्याने इजिप्तच्या प्राचीन धर्माच्या (आणि परिणामतः धर्मगुरूंच्या सत्तेच्या) नाशाचा प्रयत्न आपल्या एकेश्वरवादी धर्माचा प्रसार करून केला.
इजिप्तच्या पारंपारिक धर्मात नक्की किती देवदेवता होत्या आणि त्यांची आपापसात काय नाती आणि हेवेदावे होते ह्याची गणती कार्नाकच्या सर्वोच्च धर्मगुरुलाही कदाचित करता आली नसती! आणि धर्माची रचना जेव्हढी गुंतागुंतीची तेवढे त्याच्या अनुयायांकडून खंडणी उकळायचे आणि त्यांना नाडण्याचे मार्ग अधिक, अशी कदाचित अखेनातेनची धारणा एकेश्वरवादाच्या प्रसारामागे असेल.
पण इतरही अनेक दृष्ट्या अखेनातेन काळाच्या फार पुढे होता असं म्हणायला हवं. युद्धांऐवजी त्याने कविता करणं पसंत केलं. परंपरेप्रमाणे त्याने कधीही राजा म्हणजे देवाचा पुत्र असा पवित्र घेतला नाही. कैरोच्या संग्रहालयातल्या त्याच्या पुतळ्यांमध्ये तो एखाद्या सामान्य माणसारखाच दिसतो.
त्याच्या चित्रांतही एखाद्या सामान्य माणसाच्या आयुष्यातल्या प्रसंगांसारखे प्रसंग रेखाटलेले दिसतात, बायकोबरोबर गप्पा मारताना, आपल्या लहान मुलीशी खेळताना किंवा घरामध्ये आतेन देवाची पूजा करताना (तिसरा आणि चौथा फोटो).
त्याचे प्रागतिक विचार तत्कालीन समाजाला न पटल्यामुळे असेल, किंवा त्याच्या प्रस्थापित धर्माविरुद्ध्च्या बंडाळीमुळे असेल ज्या जनतेला सत्तांध धर्माधिकाऱ्यांपासून वाचविण्यासाठी अखेनातेन झटला, त्यांनीही त्याच्या ह्या नवीन विचारांचा मनापासून स्वीकार केला नाही. त्याच्या मृत्युनंतर त्याचा धर्म विसरला गेला, त्याची राजाधिनी अमर्ना उद्ध्वस्थ करण्यात आली. अखेनातेन नंतर गादीवर आलेल्या तुतनखामून आणि पुढील फॅरोनी त्याचं नाव इतिहासातून पुसून टाकायचा पद्धतशीर प्रयत्न केला.
त्यामुळेच की काय अखेनातेन बद्दल अनेक बिनबुडाच्या आख्यायिका पुढे निर्माण झाल्या. उदाहरणार्थ, अखेनातेन म्हणजेच मोझेस, निदानपक्षी मोझेस अखेनातेनच्या दरबारात होता आणि म्हणून मोझेस पासून निर्माण झालेल्या आजच्या तीन प्रमुख एकेश्वरवादी धर्मांचा (ज्युईश, ख्रिश्चन आणि इस्लाम) मूळ स्रोत अखेनातेन, असा वादग्रस्त पण निराधार सिद्धांत सुद्धा अनेक लोकांनी मांडला (त्यांच्यात सिगमंड फ्रॉइड सारखी प्रसिद्ध व्यक्तीही होती).
ते काही असो, काळाच्या पुढचे विचार करण्याचा “गंभीर
गुन्हा” केल्याची शिक्षा म्हणून त्याला विस्मृतीच्या पडद्याआड गाडून टाकलं गेलं, एव्हढं
मात्र नक्की.
No comments:
Post a Comment