प्राचीन संस्कृती असा विषय बोलण्यात निघाला की पटकन आपल्या डोळ्यापुढे ठराविक ३-४ नावं येतात – अर्थातच भारत आणि मग इजिप्त, मेसोपोटेमिया (बाबिलॉन, सुमेर ई.) आणि कदाचित चीन. आणि जरी आपण ह्या प्राचीनतेसंबंधित दंतकथा, भाबड्या समजुती आणि whatsapp विद्यालयात मुद्दाम पसरवलेल्या भाकडकथा बाजूला ठेवून, फक्त पुरातत्वशास्त्राने मान्यता दिलेले पुरावेच पाहीले तरी ह्या ३-४ देशांमध्ये किमान गेली ६-७ हजार वर्षं तरी प्रगत मानवी समाज नांदले असं नक्कीच म्हणता येईल.
पण पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला, दक्षिण अमेरिकेची पॅसिफिक महासागराची किनारपट्टी आणि ॲन्डीज पर्वतराजीतील पठारे येथे सुद्धा ५-६ हजार वर्षांपूर्वी प्रगतीशील संस्कृती उदयाला आली आणि आपल्या कलेच्या आणि तंत्रज्ञानाच्या नेत्रदीपक खुणा मागे ठेवून गेली, ह्याची मात्र मला तिथे प्रत्यक्ष जाईपर्यंत अजिबात कल्पना नव्हती. उदाहरणार्थ पेरू देशातील नॉर्टे चिको समाज. ५ हजार वर्षांपूर्वी, आपल्या सिंधुसंस्कृतीच्याच (हराप्पा) आगेमागे उदयाला आला आणि सिंधुसंस्कृतीतील लोथल किंवा धोलावीरा सारख्याच प्रगत नगरांचे अवशेष मागे ठेवून गेला.
मात्र ह्या नॉर्टे चिको, चाविन, पराकॅस अश्या इथल्या अनेक प्राचीन संस्कृतींपैकी कोणीही, अगदी १६व्या शतकापर्यंत टिकलेल्या इंका संस्कृतीने सुद्धा, स्वत: बद्दल एक शब्दही लिहून ठेवलेला मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी मागे ठेवलेल्या अवशेषांवरून किंवा पिढ्यानुपिढ्या प्रचलित असलेल्या दंतकथांवरून अथवा १६ व्या शतकात यूरोपिअन लोकांनी इथल्या संस्कृतीची लुटालूट आणि नासधूस करताना जे काही लिहून ठेवलं आहे त्यावरून - हे समाज, त्यांची रहाणी, राजकीय/ सामाजिक संस्था, धार्मिक विचार ह्यांचा अंदाज बांधावा लागतो.
पाहिलं साम्राज्य म्हणजे टिवानाकू. टिटिकाकाच्या दक्षिण किनाऱ्या जवळचे हे वैभवशाली नगर आजच्या चिले देशापासून पेरू देशाच्या उत्तर टोकापर्यंतच्या प्रदेशावर ख्रिस्तोत्तर दहाव्या दशकापर्यंत सत्ता गाजवत होत्तं. आणि दुसरं साम्राज्य म्हणजे सुमारे १३ व्या शतकापासून ते १६ व्या शतकात स्पॅनिश लोकांकडून पाडाव होईपर्यंत, ह्याच भागात पसरलेलं इंका साम्राज्य.
ही सर्व निर्मिती झाल्यानंतर संस्कृती आणि सभ्यता सर्व मानवी समाजाला शिकविण्याकरिता, विराकोचा टिटिकाका सरोवरातून बाहेर पडून उत्तरेला आपला संदेश पसरवत आजच्या पेरू देशात फिरला आणि शेवटी पश्चिमेला पॅसिफिक महासागरापलीकडे निघून गेला. अशी काहीशी ही मूळ कथा आहे.
विराकोचाच्या ह्या प्रवासाच्या पाऊलखुणा ठिकठिकाणी आजही दाखविल्या जातात (त्यातील राक़ी ह्या जागेची माहिती पुढे येईलच). आणि ह्या कथेचा आधार घेऊन, इंका राजघराण्याचा मूळ पुरुष मनाको कापाक सुद्धा विराकोचा देवानेच टिटिकाका सरोवरातल्या एका बेटावर जन्माला घातला आणि त्याला इंका साम्राज्य स्थापन करण्याचा आदेश दिला अशी समजूत इथे प्रचलीत करण्यात आली. “आपला राजा म्हणजे देवाचाच अवतार” अश्या दंतकथा जगात सगळीकडे सत्ता मजबूत करण्यासाठी वापरल्या गेल्या आहेत. त्यातलाच हा प्रकार.
पण इंका साम्राज्य नंतर आलं. त्या आधी इथे बहरलं टिवानाकू.
सांध्याचा दगड,
कोनटीकीची मूर्ती.
२००० वर्षांपूर्वी, इथे कोरलेल्या दगडांची बनवलेली सार्वजनिक ध्वनिक्षेपण यंत्रणा वापरात होती! बहुधा ही यंत्रणा तिथे होणाऱ्या महत्वाच्या धार्मिक समारंभाचे समालोचन सर्व नागरिकांना ऐकू यावे म्हणून वापरली जात असावी.
टिवानाकूची संपूर्ण कथा इथे सांगणं कठीण आहे पण दोन अतिशय रोचक रहस्यांचा उल्लेख करायचा मोह मला आवरत नाही. एक म्हणजे इथलं पाचामामाचं देऊळ.
एका दंतकथेनुसार पाचामामा ही विराकोचा (कोनटीकी)ची मुलगी आणि ह्या पृथ्वीवर आणि जमिनीखाली जे जे काही आहे, त्याची देवता. ९व्या फोटोतील ह्या देवळाची भिंत पहा.
ह्या भिंतीमध्ये शेकडो मानवी डोकी (दगडात कोरलेली) बसवलेली तुम्हाला दिसतील. ह्यातील प्रत्येक डोकं वेगळं आहे. कित्येक चेहेरे असे आहेत की ते इथल्या स्थानिक लोकांचे असूच शकत नाहीत. डोळ्यांची ठेवण, नाकाचा आकार, केस किंवा पगडी अश्या गोष्टी पहिल्या तर काही आफ्रिकेतल्या लोकांसारखी आहेत (त्यांसाठी वापरलेला दगडही काळा आहे), काही आशिया खंडातील किंवा अतीपूर्वेकडील वाटतात (पहा फोटो क्र. १०).
टिवानाकूतील शिल्पकारांनी असे चेहरे २००० वर्षांपूर्वी पाहिले तरी असतील कुठे? की हा केवळ कल्पनाविलास आहे? का टिवानाकूचे व्यापारी/राजकीय संबंध अश्या दूर दूरच्या देशांपर्यंत पोचले होते? आज तरी याचं उत्तर कोणीच देऊ शकत नाही. थॉर हेयरदाल नावाच्या मानववंशशास्त्रज्ञाने आपल्या “रा एक्सपीडीशन्स” ह्या पुस्तकात अशी उपपत्ति मांडली आहे की दक्षिण अमेरिका ते इजिप्त अशा ऍटलांटिक महासागरापार सफरी त्याकाळी लोकं करीत असत. आणि हे सिद्ध करण्यासाठी त्याने स्वत: टिटिकाका सरोवरात वापरल्या जाणाऱ्या, पारंपारिक नावेसाखी नाव वापरून आफ्रिका ते दक्षिण अमेरिका असा प्रवास करून दाखवला. आश्चर्याची बाब अशी कि प्राचीन इजिप्तमध्येही अशाच प्रकारच्या बोटी नाईल नदीवर वापरल्या जात!
अश्या ह्या प्रगत समाजाचा पाचशे वर्ष राज्य करून ई.स.११०० च्या सुमारास तडकाफडकी अंत कसा झाला, हे दुसर गूढ आजपर्यंत कोणी उलगडलेलं नाही. एका स्थानिक दंतकथेनुसार, टिटिकाका परिसरात झालेल्या भूकंपामुळे सरोवरात एक प्रचंड त्सुनामी निर्माण झाली आणि किनार्यावरील टिवानाकू शहराचा संपूर्ण नाश ह्या त्सुनामीमुळे झाला. कदाचित पर्यावरणातील बदलांमुळे ह्या परिसरातील शेती नष्ट झाली असेल आणि इथले नागरिक पोटासाठी परागंदा झाले असतील. कदाचित त्यांचा युद्धात पराभव झाला असेल आणि जीव वाचविण्यासाठी इथले लोक दाहीदिशा झाले असतील. जे काही असेल ते, पण आपल्या भरभराटीच्या काळात टिवानाकूमध्ये वीस ते तीस हजार लोकं राहत होते. इतके सगळे जण गेले तरी कुठे? एका आख्यायिकेनुसार टिवानाकूचे राज्यकर्ते आपल्या उरल्यासुरल्या सैन्यासह उत्तरेला पेरू देशात आले आणि त्यांच्याच वंशजांनी इंका साम्राज्य स्थापन केलं. तर इतर काही आख्यायिकांनुसार हे निर्वासित दक्षिणेला चिले देशात गेले आणि चिले मधला मापुचे समाज हे त्यांचे वंशज आहेत.
वर उल्लेखलेल्या थॉर हेयरदालची ह्याही बाबतीत एक वादग्रस्त उपपत्ति आहे. आधी सांगितलेल्या विराकोचाच्या टिटिकाका ते पेरू आणि पुढे पश्चिमेला पॅसिफिक सागरापार प्रवासाच्या दंतकथेचा आधार घेऊन हेयरदालने अशी उपपत्ति मांडली की विराकोचाची ही कथा पूर्णपणे काल्पनिक नाही. टिवानाकूहून आपला जीव घेऊन आपल्या अनुयायांसमवेत पळालेला त्यांचा मुख्य नेता म्हणजेच दंतकथेतला विराकोचा आणि तो ह्या कथेप्रमाणेच आपल्या टोळीसह बाल्सा लाकडांच्या तराफ्यांवर बसून पॅसिफिक सागर पार करून पॉलिनेशिअन बेटांवर पोचला. आजचे ताहिती, तुआमोटू, मारक्वीसस, हवाई अशा बेटांवरचे मूळ रहिवासी हे ह्या टिवानाकूहून पळालेल्या लोकांचे वंशज. आणि आपल्या ह्या उपपत्तीच्या समर्थनार्थ हेयरदाल २००० वर्षांपूर्वी ज्याप्रकारे तराफे बांधले जात तश्या तराफ्यावर बसून पेरू पासून पॉलिनेशिया पर्यंत प्रवास करून गेला. ह्या अद्भुत प्रवासचं रोमांचक वर्णन त्याच्या “कोनटीकी” ह्या पुस्तकात वाचायला मिळेल. पुरातत्वशास्त्राच्या मुख्य प्रवाहात ह्या उपपत्तीला कधीच मान्यता मिळाली नाही. मात्र आपल्या थडग्यात चिरविश्रांती घेणाऱ्या हेयरदाललाही आनंदाच्या उकळ्या फुटतील अशी एक घटना नुकतीच घडली. पॉलिनेशिअन बेटांवरील मूळ रहिवासी आणि पेरू मधील स्थानिक लोकं ह्यांच्या DNA मध्ये इतकं साम्य आढळून आलं की त्यांच्यात रक्ताचे नाते असलेच पाहिजे. अर्थात म्हणून हेयरदालचं विधान काही खरं ठरत नाही. पण ते पूर्णपणे अशास्त्रीय नाही एव्हढं तरी म्हणता येईल. असो. ह्या रुक्ष शास्त्रीय वादावादीपेक्षा कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता आपला जीव धोक्यात घालून केलेल्या ह्या दोन्ही प्रवासांची हेयरदालने लिहिलेली वर्णने कितीतरी जास्त चित्तथरारक आहेत!
मी ह्या लेखाची सुरुवात केली तेंव्हा माझा बेत असा होतं की टिवानाकू आणि इंका ह्या दोन्ही संस्कृतींबद्दल थोडक्यात लिहावं. पण टिवानाकूच्या भग्नावशेषांत घुमणाऱ्या विलक्षण गोष्टींमध्ये मी थोडा वाहावतच गेलो. तेंव्हा इंका साम्राज्याला भेट आता पुढच्या लेखात!
टिवानाकू बद्दल आणखी थोडी माहिती सांगणाऱ्या ह्या ३ व्हिडीओ सुद्धा बघण्यासारख्या आहेत.
https://youtu.be/wXGGyI71Aw8
https://youtu.be/g0kf82I6ffc
https://www.youtube.com/watch?v=FTGCSaC82gU
No comments:
Post a Comment