“मानवाने आपण मिळविलेल्या यशाबद्दल अनाठायी गर्व केला तर नियती त्याला हमखास धडा शिकवते.” अश्या अर्थाच्या कथा जगातल्या सर्वच समाजांच्या नीतिकथांमध्ये आपल्याला आढळून येतील.
प्लेटो ह्या प्राचीन ग्रीक तत्ववेत्त्या पासून ते फ्रान्सिस बेकन आणि थॉमस मूर अशा रेनेसांसकालीन विचारवंतांपर्यंत अनेकांनी, ॲटलांटीस ह्या “पृथ्वीवरील जणू स्वर्गच” अश्या वैभवशाली पण काल्पनिक नगरीच्या सर्वनाशाचं उदाहरण, हाच धडा शिकविण्यासाठी वापरलेलं आपल्याला त्यांच्या लिखाणात दिसेल.
“ॲटलांटीसचे नागरिक आपल्या वैभावामुळे इतके उन्मत्त झाले की ते आपल्या देवांनाच जुमानीनासे झाले. म्हणून झूस ह्या देवांच्या राजाने ॲटलांटीस उध्वस्त करून समुद्रात बुडविले” अशी काहीशी ही कथा प्लेटोच्या टिमेयस आणि क्रायटीयस ह्या ग्रंथामध्ये सापडते.
पण ही काल्पनिक कथा फक्त एक नीतिबोध म्हणून वाचायची आहे ह्याकडे दुर्लक्ष करून १८-१९ व्या शतकात अनेकांनी ॲटलांटीसचा प्रत्यक्ष्यात शोध घेण्यात श्रम आणि वेळ वाया घालवून क्रीट, अझोरेस अशा बेटांपासून दक्षिण अमेरिकेतल्या टिवानाकू पर्यंत अनेक वेगवेगळ्या जागा ॲटलांटीसच कशा आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. जरी ह्या सर्व दाव्यांचा फोलपणा शेवटी लक्ष्यात आला असला तरीही ॲटलांटीसचा शोध मात्र थांबला नाही. जरी ॲटलांटीस पूर्णपणे काल्पनिक असली, तरी ही कल्पना प्लेटोला कुठल्यातरी खऱ्याखुऱ्या प्रागैतिहासिक दुर्घटनेवरून सुचली असणार अश्या विचाराने हा शोध सुरूच राहिला.
सुमारे ४ हजार वर्षांपूर्वी एजियन समुद्रातल्या थेरा बेटावरच्या ज्वालामुखीचा प्रचंड स्फोट झाल्याचा उल्लेख भूमध्य सागराच्या सभोवातली नांदणाऱ्या पुरातन संस्कृतींच्या दस्तावेजात सापडतो. ह्या स्फोटामुळे निर्माण झालेल्या त्सुनामीने क्रीट बेटावरील मिनोवन साम्राज्य नष्ट केलंच पण त्यासोबत झालेल्या भूकंपाचे धक्के १००० किमी दूर इजिप्तपर्यंत जाणवले होते. ह्या थेराच्या ज्वालामुखीचा उर्वरित अवशेष म्हणजे ग्रीसमधील आजचं सॅन्टोरिनी बेट.
सापडलेल्या पुराव्यानुसार दोन गोष्टी वादातीत आहेत. एक म्हणजे थेरावरील उद्रेकात हे शहर ज्वालामुखीतून फेकल्या गेलेल्या लाव्हा आणि राखेखाली पूर्णपणे गाडलं गेलं. आणि दुसरी – ह्या स्फोटाची पूर्वकल्पना इथल्या रहिवाशांना मिळाली असावी आणि आपलं चम्बुगबाळ आणि गुरंढोरं घेवून ते वेळीच परागंदा झाले असावे. कारण अक्रोटीरीमध्ये सापडलेल्या अवशेषांत सजीव प्राण्यांचे अवशेष जवळजवळ नाहीतच. पण हे लोकं वांशिक दृष्ट्या कोण होते, त्यांच्या चालीरीती, धार्मिक विचार, भाषा काय होती आणि थेराच्या स्फोटानंतर त्याचं नक्की काय झालं हे सर्वच प्रश्न आजही अनुत्तरीतच आहेत.
अर्थात जरी प्लेटोच्या कथेचं ते मूळ स्फूर्तीस्थान असलं तरी आजचं सॅन्टोरिनी म्हणजे ताम्रयुगातील थेरा नव्हे किंवा प्लेटोचं ॲटलांटीसही नव्हे. पण प्लेटोने “पृथ्वीवरील स्वर्ग” असं जे ॲटलांटीसच वर्णन केलं आहे ते मात्र आजच्या सॅन्टोरिनीला सुद्धा पूर्णपणे लागू होतं.
हे स्वर्गीय रूप निरखायचा उत्तम मार्ग म्हणजे ज्वालामुखीच्या शिल्लक राहिलेल्या मुखाच्या काठावरील पायवाटेने फीरा ह्या मुख्य गावापासून फिरोस्तेफानी, इमेरोविग्ली अश्या वाटेवरील खेड्यात थांबत थांबत, ईया गावापर्यंत सूर्यास्ताच्या सुमारास पोचावे. डाव्या बाजूला चमकणारा निळाशार समुद्र, उजवीकडे डोळे दिपतील एव्हढी पांढरी शुभ पण समुद्राच्या निळाईचं प्रतिबिंबच अश्या रंगाची छपरं असलेली घरं.
स्वर्ग काही ह्यापेक्ष्या वेगळा असेल असा मला
वाटत नाही.
No comments:
Post a Comment