Saturday 5 November 2022

इंकांच्या देशात - २

ह्या पूर्वीच्या लेखात मी म्हटलं होतं की केवळ १५० वर्षांच्या छोट्या कालखंडात इंका साम्राज्यात झालेली भव्य बांधकामं पाहून थक्क व्हायला होतं.

त्यामुळेच की काय असाही एक मतप्रवाह आहे की कदाचित इंका साम्राज्याने आधीच कोणीतरी बांधलेल्या इमारतींवर आपला साज चढवून आपला हक्क शाबीत केला असेल. कित्येक ठिकाणी उरलेल्या अवशेषांमध्ये अगदी पूर्णपणे वेगवेगळ्या बांधकाम तंत्राचा वापर एकावर एक चढवलेल्या थरांमध्ये दिसून येतो.

उदाहरणार्थ राकी (राक्ची) येथील विराकोचा ह्या इंकांच्या प्रमुख दैवताच्या भव्य देवळाच्या अवशेषांचा हा फोटो पहा.

सर्वात खालचा थर अतिशय कौशल्याने कापून एकमेकात गुंतवलेल्या प्रचंड शिळांचा आहे. त्यावरचा थर मातीच्या, उन्हात वाळवलेल्या विटांचा आहे. 


तर राकी मधील घरांचा खालचा थर अनगड दगड ओल्या चुनखडीत बसवून केलेला दिसतो. अर्थात ही बांधकामं कोणी उभारली ह्या वादावादीपेक्षा त्यांची भव्यता आणि त्यांच्या बद्दलच्या (दंत)कथा मलातरी जास्त भावतात.

उदाहरणार्थ – राकीचं देऊळ ही इंका काळात बांधलेली सर्वात भव्य इमारत होती. ९२ मीटर लांब, २५ मीटर रुंद आणि २५ मीटर उंच अशा ह्या देवळावर ५० मीटर रुंद कौलारू छप्पर होतं. वेना कापाक इंकाने हे सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला बांधलं असावं.

परंतु ह्याच ठिकाणी त्याहूनही प्राचीन  पूजास्थान अस्तित्वात असावं.

येथील स्थानिक लोकांच्या मते देवाधिदेव विराकोचा स्वत: राकी मध्ये आला होता. टिटिकाका सरोवरातील सूर्यबेटावर बसून विराकोचाने सर्व विश्वाची निर्मिती केली. आणि त्यानंतर ज्ञान आणि संस्कृति सर्व मानवांना देण्यासाठी तो उत्तरेच्या दिशेने निघाला. ह्या प्रवासात तो जेंव्हा राकीला पोचला तेंव्हा स्थानिक लोकांनी त्याला न ओळखता त्याच्यावर हल्ला केला. म्हणून रागाने त्याने त्या सर्व परिसरावर अग्नीचा पाउस पाडला (राकी किम्साचाता ह्या सुप्त ज्वालामुखीच्या छायेतच वसल्यामुळे कदाचित ह्या अग्निवर्षावाच्या कथेचं मूळ एखाद्या ज्वालामुखी उद्रेकाच्या सत्य घटनेतही असेल). तेंव्हा राकीच्या गावकऱ्याना त्याची ओळख पटली आणि त्यांनी विराकोचाचं मूळ देऊळ ज्या जागी तो पहिल्याने अवतरला तिथे बांधलं!

कसा होता हा विराकोचा दिसायला?


ओलान्तेताम्बो ह्या महत्वाच्या लष्करी ठाण्याचा पाठराखा असलेल्या पिंकुयुना शिखरावर कोरलेल्या विराकोचाच्या भव्य प्रतिमेचा हा फोटो पहा. ह्यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ह्या प्रतिमेतील चेहेऱ्याची ठेवण (धारदार नाक, दाढी ई.) इंका राज्यकर्ते किंवा त्यांच्या प्रजेतील केचुआ, आयामारा जमातीचे लोकं ह्यांच्यापेक्षा वेगळीच आहे! ह्यामुळेच कदाचित असंही म्हटलं जातं की मुठभर स्पॅनिश लोकांनी एव्हढ्या मोठ्या साम्राज्याचा इतक्या सहजतेने पाडाव केला कारण त्यांच्या चेहेरेपट्टीतील (गौरवर्ण, सोनेरी केस, दाढी, सरळ नाक ई.) आणि विराकोचाच्या प्रतिमेतील साम्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर अनाठायी विश्वास ठेऊन इंका राज्यकर्त्यांनी त्यांना आपल्या राज्यशकटाच्या अंतर्वर्तुळात प्रवेश करू दिला. असो.


फुंकर मारावी इतक्या सहजपणे इंका साम्राज्य उधळलं  गेलं  हे मात्र खरं. ओलान्तेताम्बोचा हा दुर्गम किल्ला (पहा तिसरा फोटो) स्पॅनिश सैन्याशी मानको इंका युपान्कीने दिलेल्या शेवटच्या लढ्याचा साक्षीदार होता.


इंकांची सर्वात प्रसिद्ध नगरी माचू पिच्चू पर्यंत मात्र स्पॅनिश सैन्य कधीच पोचलं  नाही. जवळ जवळ ३०० वर्ष पेरू देशावर राज्य करूनही त्यांना माचू पिच्चूचा सुगावा कसा लागला नाही ही आश्चर्याचीच बाब आहे. त्याचप्रमाणे इतक्या दुर्गम जागी भरभक्कम तटबंदीमध्ये सुरक्षित, अनुल्लंघनीय हजारो फूट उंच कड्यांनी घेरलेल्या आणि अन्नपाण्याबाबतीत स्वयंपूर्ण नगरीचा त्याग करून इंका गुपचूप परागंदा का झाले हे ही एक न उलगडणारं कोडंच आहे.

जवळ जवळ ४०० वर्ष अज्ञात राहिलेली ही भव्य नगरी हिराम बिन्घम ह्या अमेरिकन इतिहासकाराला १९११ साली सापडली. माचू पिच्चूचं सर्वात विहंगम दृश्य पाहण्यासाठी मात्र रेल्वे आणि बस प्रवास करून न जाताॲन्डीज पर्वताच्या उत्तुंग शिखरांच्या छायेतून जाणाऱ्या जुन्या इंका महामार्गावरून ६-७ तास चालत माचू पिच्चुच्या सूर्य दरवाज्यात जावं लागतं.

येथून दिसणारं उरुबाम्बा नदीचं खोरं, त्याच्या मध्यभागी वाना पिच्चूचा अभेद्य सुळका आणि त्या सुळक्याच्या कुशीत वसलेलं माचू पिच्चू – हे दृश्य केवळ अवर्णनीय आहे. हा शेवटचा फोटो म्हणजे त्याची एक छोटीशी झलक फक्त.






ह्या पुढच्या लेखात मात्र पेरू आणि दक्षिण अमेरिका सोडून आपण एका संपूर्णपणे वेगळ्या संस्कृती बद्दल बोलू.


 

No comments:

Post a Comment

  विसरलेले समाज - २ : टुलोर   चिले देशातील अटाकामा असा प्रदेश आहे जिथे अनेक ठिकाणी गेल्या ५०० वर्षात पाऊसच पडलेला नाही. आणि जेथे पडतो तेथे...