मात्र १३ व्या शतकात चेंगीज खानाचा सेनापती बाटू खान ह्याच्या सैन्याने ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली. ही मंगोल टोळधाड परतून गेल्यावर मागे राहिलेले मंगोल, त्यांनी केलेल्या संहारातून वाचलेले बुल्गार, तसेच ह्या बुल्गारांच्या जळणाऱ्या चितांवर आपल्याही पोळ्या भाजून घेण्यासाठी उत्तरेकडे आलेल्या तुर्की टोळ्या, ह्यांच्या मिश्रणातून येथील रहिवाश्यांची तातार ही एक नवी ओळख निर्माण झाली. येथील मूळच्या बुल्गार लोकांनी १० व्या शतकातच इस्लामचा स्वीकार केला होता. त्यात तुर्की आणि मंगोल प्रथा मिसळून एक वेगळी स्वतंत्र संस्कृतीच बनली.
कुल शरीफ मस्जिद
तातार समाजाचा ह्यापुढील प्रवासही खडतरच राहिला. १५ व्या शतकात चेंगीज खानाचा नातू तिमुरच्या वंशजांनी पुन्हा एकदा त्याचं शिरकाण केलं आणि कझानच्या खनेतीची सत्ता येथे प्रस्थापित झाली. जेमतेम काही दशकं जनजीवन पुन्हा सुरळीत होण्यात गेली असतील नसतील, तोवर रशियन सम्राट इव्हान (Ivan the Terrible) याने तातारस्तान उद्ध्वस्त केलं.
मंत्रालयाची इमारत
चेंगीज खानच्या मंगोल सैन्याला सुद्धा अगदी मवाळ म्हणावं असा हिंसाचार आणि अत्याचार इव्हानच्या युरोपियन फौजांनी येथे केले. अगदी अठराव्या शतकापर्यंत रशियन सत्तेविरुद्ध वारंवार होणारी बंडाळी आणि ती थांबविण्यासाठी होणारी दडपशाही ह्यामुळे इथलं सामान्य जीवन कायम धकाधकीचच राहिलं. आणि दुष्काळात तेरावा महिना यावा तसं १९१७ साली रशियात झालेल्या राज्यक्रांतीमध्ये तातारस्तान, राजनिष्ठ आणि क्रांतिकारी कम्युनिस्ट ह्या दोन्ही फौजांच्या आपापसात झालेल्या झगड्यात चिरडलं गेलं. कम्युनिस्ट राजवट रशियात असेपर्यंत तातार समाजाची मुस्कटदाबी मागील पानावरून पुढे, अशी चालूच राहिली. त्यांची भाषा, धर्मविधी यावर बंधने घालून त्यांना “रशियन” बनविण्याचा सतत प्रयत्न चालू राहिला.
कझान
कम्युनिटी सेंटर (येथे एका वेळी १०० लग्न समारंभ होवू शकतील अशी सोय आहे!!)
मात्र स्वतःच्याच राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या
फिनिक्स पक्ष्याप्रमाणे तातारस्तान ह्या प्रत्येक संकटातून उठून पुन्हा पुन्हा
भरभराटीला येत राहिलं. आज तातारस्तान रशियातील सर्वात समृद्ध, उद्योगप्रधान
आणि श्रीमंत राज्य गणलं जातं. त्याची राजधानी कझान ही तर मी पाहिलेल्या जगातील
सर्वात सुंदर शहरांमधील एक आहे.
No comments:
Post a Comment