देशोदेशी
ह्या मालिकेतला हा पहिलाच लेख असल्यामुळे थोडीशी
प्रस्तावना.
मोहमद असीम नेहाल नावाच्या कवीची एक सुंदर कविता आहे. त्याचं मराठी रूपांतर काहीसं असं आहे. –
“प्रत्येक भग्न भिंतीचा प्रत्येक दगड म्हणजे त्या भिंतीच्या शांततेमध्ये दडलेली एक कथा आहे, त्यांवरून एक हळूवार हात फिरवा, जिवंत होऊन सांगतील ते तुम्हाला ह्या कथा – प्रेमाच्या, क्रौर्याच्या, मत्सराच्या, औदार्याच्या आणि मृत्युच्याही, पण तुमच्या छातीत एक हृदय पाहिजे ती शांतता ऐकण्यासाठी”.
साधारण तिशीच्या वयात माझ्या पायांना चाकं फुटली आणि त्यानंतर गेली २५-३० वर्षं, अडम तडम् तडतड बाजा म्हणून ज्या दिशेला बोट वळेल, तिकडे भटकलो ते अशा कथा ऐकण्यासाठी. त्यातल्याच काही सांगण्याचा हा एक प्रयत्न!
दक्षिण-पूर्व आशिया - ह्या भागात हजार-दीड हजार वर्षांपूर्वी एक अगदी वेगळ्या प्रकारचं साम्राज्य निर्माण झाल. सर्वसाधारण साम्राज्य तलवारीच्या धारेवर स्थापन होतात, दुर्बलांना आपल्या रथाच्या चाकाखाली चिरडून टिकतात आणि भाल्याच्या फेकीने नष्ट होतात. अशी साम्राज्य ह्या भागात अनेक होऊन गेली – पागान (किंवा बागान), श्रीविजय, मजापहीत, ख्मेर, चंपा इत्यादी.
पण मला अभिप्रेत आहे ते विचारांचं साम्राज्य – आपल्याच पूर्वजांनी स्थापन केलेलं – पण हे “साम्राज्य” पसरलं ते कोणाच्या हुकुमशाही मुळे नाही तर भारतात उगम झालेल्या काही नव्या सांस्कृतिक, धार्मिक आणि कलाविषयक विचारांचा स्थानिक समाजात स्वेच्छेने स्वीकार झाला म्हणून.
उदाहरणार्थ – आपण सुरुवात करूया म्यानमार (ब्रह्मदेश) मधल्या इन्ले सरोवराच्या काठावर वसलेल्या इंडेन (Indein) नावाच्या एका छोट्या गावापासून.
त्यांची रचना, सजावट ह्यातील मूलभूत घटक आपल्या ओळखीचे दिसतील पण त्यांचा वापर अश्या पद्धतीने केला गेला आहे की त्यामध्ये दिसणारी कोणा विसरलेल्या कलाकारांची सर्जनशीलता दृष्टी दिपवणारी आहे.
सम्राट नरपतीसिथुची कारकीर्द ब्रह्मदेशाच्या इतिहासातला एक महत्वाचा टप्पा आहे. सर्व देशामध्ये एकच लिपी, एकच कायदा, बौध्द धर्माचे एकसूत्रीकरण अशा अनेक घटनांमधून ब्रह्मदेशाची मिळून एक स्वतंत्र ओळख त्यातून निर्माण झाली. पुढे मंगोल सैन्याच्या आक्रमणात पागान साम्राज्य नष्ट झाल्यावर इंडेनच्या शिवारातल्या ह्या वैशिष्ठ्यपूर्ण धर्मस्थळाचा लोकांना विसर पडला.
आज त्यातील काही भागाचं पुनरूत्थान झालेलं आपल्याला दिसेल.
त्याची एक झलक वरील फोटोमध्ये - पहिले काही फोटो भग्नावस्थेत असूनही थक्क करणाऱ्या कलाकृतींचे, आणि शेवटचे काही, पुन्हा पूर्वीच्या वैभवात झळकणाऱ्या पागोडांचे!
No comments:
Post a Comment