Friday, 4 November 2022

इंकांच्या देशात - १

 मानवी इतिहासाची एकूण व्याप्ती पहिली तर जेमतेम १५० वर्ष टिकलेलं इंका साम्राज्य क्षणभंगुरच म्हटलं पाहिजे.

मात्र ह्या छोट्याशा कालखंडात उत्तरेला एक़्वेडोर पासून दक्षिणेला बोलिव्हिया पर्यंतच्या प्रदेशात, हजारो फूट उंचीचे अतिशय दुर्गम डोंगरमाथे, त्यावरील पठारे आणि दऱ्याखोऱ्यात बांधले गेलेले रस्ते, पूल, गावं, किल्ले, बर्फाच्छादित पर्वतांचेसुद्धा उतार कापून काढून बनवलेले शेतीची खाचरं त्यांच्या तांत्रिक कौशल्याचे साक्षीदार आहेत. शिवाय संपूर्ण दक्षिण अमेरिकेत स्पनिश आक्रमण होईपर्यंत अवजड ओझी वाहून नेऊ शकतील अश्या ताकदीचे – घोडे, बैल, रेडे, उंट, हत्ती, गाढवे, खेचरे – असे कुठलेही प्राणी अस्तित्वात नव्हते. त्यामुळे सर्व प्रवास स्वतःच्या पायांनी आणि सर्व कष्टाची काम स्वतःच्या हातानीच करावी लागत. ह्या पार्श्वभूमीवर तर इंका काळात झालेली प्रचंड बांधकामं अधिकच थक्क करणारी आहेत. उदाहरणार्थ ओलांतेताम्बोचा हा उत्तुंग किल्ला.

इंका साम्राज्य इतरही अनेक बाबतीत वैशिष्ठ्यपूर्ण होतं. राज्यातील सर्व सम्पत्तीवर फक्त राजाची मालकी असे – शेतातील प्रत्येक दाणा, झाडावरचे प्रत्येक फळ, अल्पाकाच्या लोकरीचा प्रत्येक धागा, सर्व उत्पादन राजाच्या कोठारात जात असे! त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या अन्न, निवारा आणि कौटुंबिक स्वास्थ्याचीही जबाबदारीही राजाच्या खांद्यावर होती.




परंतु अत्यंत कार्यक्षम अशा उत्पादन, भरणा आणि वितरण व्यवस्थेशिवाय ५५०० किलोमीटर पेक्षाही जास्त पसरलेल्या साम्राज्यात हे सर्व साध्य होणं कठीण होतं. जेथे सर्व दळणवळण फक्त चालत (किंवा धावत) जाऊनच होत होतं, ज्यांनी कधीच लिखाणाचा शोध लावला नाही त्यांनी अशी व्यवस्था कशी काय निर्माण केली ही एक बुचकळ्यात टाकणारी गोष्ट आहे. अशी व्यवस्था होती मात्र नक्की, कारण त्याच्या खुणा आजही आपल्याला दिसतात – धान्याची कोठारं, रस्त्यांचं आणि टपाल व्यवस्थेचं जाळं, शेतकीसंशोधनाच्या प्रयोगशाळा आणि सर्वात वैशिष्ठ्यपूर्ण म्हणजे खिपू! (पहा पहिला फोटो)

खिपू हे एक हिशोब मांडून ठेवण्याचं साधन होतं. एका खिपू मध्ये अनेक रंगाचे लोकरीचे धागे असत आणि प्रत्येक धाग्याला वेगवेगळ्या जागी गाठी मारल्या जात. ह्या धाग्यांचे रंग, लांबी आणि त्यावरील गाठी वापरून हिशोब (शेती मालाचं उत्पन्न, वितरण, पैशाची आवक जावक ई.) ठेवले जात. मात्र हे खिपू नक्की “वाचायचे” कसे ह्याचं ज्ञान मात्र स्पनिश लोकांनी स्थानिक राज्यकर्त्याचं जे शिरकाण केलं त्यात नाहीसं झालं.


संपूर्ण लोकसंख्येच्या पोटापाण्याची जबाबदारी डोक्यावर असल्यामुळे असेल कदाचित, पण शेतीसंवर्धनाला इंका राज्यव्यवस्थेमध्ये महत्वाचं स्थान होतं. उदाहरणार्थ ही पिसाक आणि विनेवेना येथील दुर्गम पर्वतराजीत कातलेली शेतीची खाचरं.




पेरूमधील उरुबाम्बा नदीच्या खोऱ्यात चिंचेरो पासून ओलांतेताम्बो पर्यंत प्रवास करताना अशीच रस्त्याच्या दोन्ही बाजूला १६/१७ हजार फूट अशा उत्तुंग शिखरांच्या उतरणी कापून शेतीसाठी बनवलेली खाचरं डोक्यावरची टोपी पडेल इतक्या उंचीपर्यंत दिसतात.


पण ह्या भागातली सर्वात थक्क करणारी जागा म्हणजे मोरे (११५०० फूट) येथील शेतीसंशोधन केंद्र. येथे वेगवेगळ्या पातळीवरील वर्तुळाकार खाचरांमध्ये इंका साम्राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतीची परिस्थिती तेथील माती, पाणी आणि (सूर्यप्रकाशाची आणि वाऱ्यांची दिशा चतुराईने वापरून) तापमानासकट तयार करण्यात येई.




येथे वेगवेगळ्या प्रकारची बियाणी वापरून राज्याच्या कुठच्या भागात कुठलं पीक सर्वात उत्तम प्रकारे काढता येईल ह्यावर संशोधन चालत असे (पहा चौथा फोटो).

अशीच एक मारास नावाची आश्चर्यजनक जागा मोरे पासून जवळच आहे. सर्वसाधारणपणे मिठागरं (जिथे खाऱ्या पाण्याचं बाष्पीभवन करून मीठ बनवलं जातं) समुद्र किंवा खाडीच्या काठावर असतात. डोंगरामध्ये असतात त्या सैंधवच्या (rock salt) खाणी. मारास मध्ये मात्र ११००० फूट उंचीवर आहेत ती खाऱ्या पाण्यापासून मीठ काढायची मिठागरं. 

भूगर्भातून इतक्या उंचीवर बाहेर येणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या दोन झऱ्याच पाणी वापरून गेली १४०० वर्ष इथे मीठ तयार केलं जातं. मात्र इंका काळात ह्यांचा मोठा विकास करण्यात आला आणि त्यांच्या योग्य नियोजनाची सहकारी तत्वावर व्यवस्था करण्यात आली – जी आजपर्यंत तशीच सुरु आहे. (पहा पाचवा फोटो).





ह्या पुढ्या भागात आपण पाहू तीन महत्वाची इंका स्थळे – राकी, ओलांतेताम्बो आणि माचू पिच्चू.

No comments:

Post a Comment

  विसरलेले समाज - २ : टुलोर   चिले देशातील अटाकामा असा प्रदेश आहे जिथे अनेक ठिकाणी गेल्या ५०० वर्षात पाऊसच पडलेला नाही. आणि जेथे पडतो तेथे...