In Myanmar, no matter where you look, the skyline will be dotted with the tall spires of temples and pagodas. A city like Bagan (the capital city of the Pagan empire) boasts of more than 10000 temples which have been built there during the golden age of the Pagan empire. And although many of them lie in utter ruins today, the Bagan horizon is dominated by these steeples piercing the skies everywhere you look.
Friday, 30 December 2022
Golden Stupa on the Dune
Tuesday, 27 December 2022
Ananda - The Temple of Eternal Bliss
Myanmar has always intrigued me considerably. For one thing - despite being right next door, it has been nearly inaccessible most of the time because of the constant political turmoil and bloodshed which has been Myanmar's unfortunate destiny for the past 7-8 decades. Secondly, we learn nothing about it at all in our standard history/geography lessons in school. About the only thing I knew about it was (a) Myanmar's last king was exiled and kept in Ratnagiri in Maharashtra by the British and (b) Lokmanya Tilak was sent to the prison in Mandalay on charges of sedition against the British empire!
Sunday, 11 December 2022
कामुकतेपलीकडले खजुराहो
कोव्हिडचा आलेख बऱ्यापैकी उतरणीला लागलेला पाहून मध्यप्रदेशात पन्ना टायगर रिझर्व्हला भेट देऊन प्राणी/पक्षी निरीक्षणाचा बेत आम्ही आखला होता. पन्ना पासून खजुराहो अगदी जवळ, फक्त अर्ध्या पाऊण तासाचा रस्ता. त्यामुळे त्याचाही समावेश कार्यक्रमात होता.
युट्युब वर शोधल्यावर खजुराहो बद्दलचे पंचवीस-तीस व्हिडिओ मला सापडले. दुर्दैवाने त्यातील एकही, कुठल्याही अधिकृत संस्थेने (Archaeological Survey of India, MP Tourism इत्यादी) किंवा माहितगार व्यक्तीने बनविलेला नव्हता. त्यातील फक्त दोन व्हिडिओ (जे खजुराहो मधील कोणा टूर गाईडने स्वतःची जाहिरात करण्यासाठी केले असावे असं दिसत होतं) संतुलित म्हणावे असे होते. बाकी सर्व व्हिडिओची शीर्षकं “संभोग से समाधी तक”, “Kamasutra Temples”, “खजुराहोके कामुक प्रतिमाओंका रहस्य” किंवा त्यासमान शब्द वापरून बनवलेली होती.
खजुराहोबद्दल जे काही थोडं आणि विवादास्पद ऐकिवात होतं त्याला पुष्टी देणारीच ही सर्व शीर्षकं दिसत होती. आणि त्यांतील विवेचन (खरं तर त्यात जे काही होतं त्याला “विवेचन” हा शब्द अनाठायी प्रतिष्ठा देणारा आहे) सुद्धा खजुराहोबद्दलच्या प्रवादांना पूरक होतं.
अर्थात खजुराहो म्हणजे निव्वळ कामुकतेचं स्मारक हे सर्वसाधारणपणे प्रचलित असलेलं समीकरण खरं असणंही शक्य होतंच. कारण शृंगार आणि नग्नतेचं आपल्या प्राचीन संस्कृतीला वावडं नव्हतं आणि त्यांच्या कलात्मक अभिव्यक्तीलाही प्रतिबंधही नव्हता. तांत्रिक पंथांच्या कर्मकांडात तर लैंगिक व्यवहारांना महत्वाचं स्थान होतं. तेंव्हा त्या पंथाच्या अनुयायांनी उभारलेल्या “धर्मस्थळात” कामाविष्कारांच्या अभिव्यक्तीला प्राधान्य दिलं जाणं समजण्यासारखं होतं. पण खजुराहोसकट बुंदेलखंडावर साधारण नवव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत टिकलेल्या चंदेलांच्या राज्यात प्रमुख धर्म होते हिंदू आणि जैन. तेंव्हा त्या काळात एखादं शिव, विष्णू किंवा पार्श्वनाथ ह्यांचं देऊळ फक्त आणि फक्त ह्याच कारणासाठी उभारालं जाईल आणि ते सुद्धा चंदेला घराण्याच्या हिंदू राजाकडून?
प्रत्यक्ष जाऊन पहिल्या शिवाय ह्या प्रश्नांना काही उत्तर मिळणार नव्हतं. कारण ASI च्या वेबसाईटवर सुद्धा मला खजुराहो बद्दल जे तुटपुंजी ऐतिहासिक माहिती असलेलं एकच पान मिळालं, त्यावरही दिसणाऱ्या तीन फोटोंपैकी दोन प्रामुख्याने संभोगावस्थेतील जोडप्यांच्या मूर्तीचेच आहेत! ह्या पानावर एक खजुराहोच्या संकुलाची "Virtual tour" आहे ती थोडीशी उपयुक्त आहे. कारण बाकी काही नाही तरी निदान खजुराहोच्या संकुलाची व्याप्ती किती मोठी आहे ह्याची कल्पना त्यावरून येते.
पन्नाहून खजुराहोला जायला निघालो तेंव्हा बारीक बारीक पावसाला सुरुवात झाली. खजुराहोला पोचेपर्यंत, जुलै महिन्यासारखा धो धो पाऊस पडायला लागला. त्यामुळे त्या दिवशी देवळं पाहायला जाण्याचा बेत आणि संध्याकाळी होणारा “Sound and Light” शो रद्दच झाला. दुसऱ्या दिवशी सकाळीही पावसाला खंड पडला नव्हता. मग तसेच भाड्याने ४-५ छत्र्या मिळवून पुढचे ५-६ तास, एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात कॅमेरा धरून समोर दिसणारा मंत्रमुग्ध करणारा शिल्पकलेचा अविष्कार बघत घालविले. तिसरा हात जर असता तर सर्व वेळ त्याचं बोट आश्चर्याने तोंडात घातलं गेलं असतं.
धर्माच्या किंवा त्याच्याशी संबंधित इतर गोष्टींच्या (आख्यायिका, दंतकथा, नीतिकथा) प्रभावामुळे सर्व जगभर निर्माण झालेल्या कलाकृती हा माझ्या फार कुतूहलाचा (अभ्यासाचा नव्हे) विषय आहे. धर्म ह्या संकल्पनेने आणि त्यातून निर्माण झालेल्या संस्थांनी मानवी समाजाचं भलं केलं कि बुरं केलं हा वेगळा वादाचा मुद्दा झाला. एक गोष्ट मात्र निर्विवाद. सर्वार्थाने धर्मनिरपेक्ष अशी कला (Secular art) ही अर्वाचीन काळातली, कदाचित गेल्या शे-दोनशे वर्षातील घडामोड आहे. त्या आधीच्या हजारो वर्षांच्या इतिहासात धर्माच्या प्रेरणेतून किंवा धार्मिक संस्थांच्या प्रत्यक्ष सहभागातून सर्व जगभर सर्व प्रकारच्या कलाविष्कारांना खतपाणी मिळालेलं आपल्याला दिसतं. आणि त्यातून अगणित उत्तमोत्तम, डोळे दिपविणाऱ्या कलाकृती निर्माण झाल्या. आणि एका दृष्टीने त्या कलाकृती मानवी समाजाच्या प्रवासाचा आणि जडण घडणीचा आलेखही आपल्या समोर मांडताना दिसतात.
कधीकधी असंही म्हटलं जातं की कोणातरी राजाच्या किंवा धर्मगुरूंच्या अहंकाराखातर अश्या कलाकृतींची निर्मिती करताना किती सामान्य लोकांचं रक्त सांडलं असेल, किती लोकांना गुलाम केलं गेलं असेल, किती लोकांच्या अश्रू आणि अस्थींनी अश्या वास्तूंचा पाया भरला असेल? पण हे सर्व समजा जरी खरं मानलं तरी त्यातून निर्माण झालेल्या ह्या कलाकृतींची कला म्हणून गुणवत्त्ता कमी ठरत नाही. दुसरं असं की ज्या काळात ही निर्मिती झाली त्या काळात तरी धर्म ही इतकी मनाला संमोहित करणारी गोष्ट होती (आणि तेंव्हाच का कदाचित आजही) की लोकांनी आपलं रक्त ह्या वास्तू निर्माण करण्यासाठी खुशीने सुद्धा सांडलं असेल.
खजुराहोच्या बाबतीतही हे सर्व खरंच आहे. ज्या काळात (दहाव्या शतकापासून ते सुमारे बाराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत) खजुराहोच्या देवळांची निर्मिती झाली, त्या काळातील तंत्रज्ञान आणि साधनं पाहता मानवी हातांनी अगणित कष्ट उपसल्या शिवाय अश्या वास्तू आणि त्यावरील कलाकृती उभारणं शक्यंच नव्हतं. मात्र ह्या कष्टांतून जे निर्माण झालं ते थक्क करणारं आहे. तसंच आधी मी म्हटल्याप्रमाणे नवव्या ते तेराव्या शतकातल्या मध्य भारतातील समाजस्थितीचं चित्रंही त्यात प्रतिबिंबित झालेलं आपल्याला दिसतं.
एकाच आराखड्याचं निष्ठेने पालन करून सुद्धा असं वैविध्य निर्माण करणे हे उच्च सर्जनशीलतेचं निदर्शक आहे. त्याचं एक उदाहरण म्हणून हे दोन फोटो पहा (दुसरा आणि तिसरा) - दोन्ही नरसिंह अवताराची चित्रं आहेत. पाहिलं लक्ष्मण मंदिराच्या भिंतीवरचं, दुसरं चतुर्भुज मंदिरातील. दोन्हीतील तपशील संपूर्णपणे वेगळा.
किंवा हे लक्ष्मण आणि कंदरिय महादेव मंदिरांचे मुख्य कळस (चौथा/पाचवा फोटो) - दोघांचा आकृतिबंध एकच, एकाच प्रकारचे मूलभूत घटक वापरलेले, पण बारकाईने पहा, त्या सर्वांचा एकत्रित अविष्कार पूर्णपणे भिन्न.
अथवा पहा आठवा फोटो - विष्णू आणि लक्ष्मीचा आणि नववा - बहुधा कामदेवाचा. दोन्हीतील पेहरावांचे आणि अलंकारांचे बारकावे बघा.
किंवा हा दहावा फोटो - कंदरिय महादेव मंदिराच्या भिंतीच्या एका भागाचा. बारकाईने पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की ह्यातील प्रत्येक मूर्ती, इतर सर्वांपेक्षा निराळी आहे.
मी येथपर्यंत खजुराहोच्या वर्णानासाठी सुमारे ५०० शब्द खर्च केले आहेत आणि तरी "Kamsutra Temple" ह्या खजुरहोच्या दुनियाभरच्या प्रसिद्धीला अनुरूप एकही उल्लेख त्यात आलेला नाही. त्याचं कारणही मी वर वर्णन केलेल्या कंदरिय महादेव मंदिराच्या भिंतीच्या फोटोवरून स्पष्ट होईल. ह्या भिंती समोर उभं राहिल्यावर फोटोमध्ये जसं दिसत आहे तसंच दृश्य प्रत्यक्ष डोळ्याला दिसतं. ह्या फोटो मध्ये ३-४ संभोगावस्थेतील जोडप्यांची चित्रं आहेत. त्यात एक समलिंगी संभोगाचं सुद्धा आहे. खोलात जाऊन निरखून बघितलं तरच ती तुम्हाला सापडतील. जर आमच्या गाईडने आपल्या विजेरीचा झोत टाकून आमचं लक्ष मुद्दाम वेधलं नसतं तर थक्क करणारा एव्हढा महान शिल्पकलेचा अविष्कार डोळ्यासमोर असताना त्यातील “त्या” चार चित्रांकडे आमचं लक्ष सुद्धा गेलं नसतं.
आधी म्हटल्या प्रमाणे कलेच्या अविष्कारात त्या त्या काळातील समाजस्थितीचं प्रतिबिंब असतंच. खजुराहोच्या शिल्प कलेतही, देवादिकांच्या चित्रांबरोबरच (एकूण संख्येच्या दृष्टीने पाहिलं तर धार्मिक प्रतिमाच बहुसंख्येने आहेत), सामान्य जीवनातील घटनांना (काहींचे फोटो आधीच आपण पाहिले) उदाहरणार्थ, शिकारीला जाणारा राजा, राजाचा दरबार, संगीताची मैफिल इतकच काय तर ओझी वाहणारे हमाल आणि रस्त्यात चाललेली मारामारी ह्यांनाही येथे स्थान आहे. कामभावना तर गृहस्थाश्रमाचा पायाच आहे. त्यामुळे खजुराहोच्या शिल्पात कामभावनेलाही स्थान असण्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं किंवा आक्षेपार्ह असण्याचं कारण नाही. मोजमापच करायचं असेल तर एकूण शिल्पांपैकी संख्येने १०% पेक्षाही कमी शिल्पं (आणि प्रत्यक्षात वापरलेलं क्षेत्रफळ मोजलं तर त्याही पेक्ष्या कमी) कामुक वर्गात मोडणारी आहेत. संभोगक्रीडेची चित्रं पाहायची ह्या एकाच उद्देशाने जे खजुराहोला जातील त्यांना ती दिसतीलच. पण म्हणून खजुराहो म्हणजे “कामक्रीडेचं चित्रमय पाठ्यपुस्तक” अशी त्याची प्रसिद्धी करणाऱ्यांची वृत्ती निव्वळ आंबटशौकी असंच म्हणायला पाहिजे.
मी पूर्वेला जपान/कंबोडियातील शिन्तो आणि हिंदू/बौद्ध प्रेरणेतून निर्माण झालेल्या कलाकृती पासून पश्चिमेला पेरू/बोलिव्हियातील तिवानाकु/इंका देवालयापर्यंत (आणि मधल्या युरोप, इजिप्त सारख्या प्रदेशांत) जगभरातील विविध संस्कृतिंची प्रार्थनास्थळं बघत हिंडलो. कुठल्याही धर्मभावनेने नव्हे तर त्या त्या ठिकाणी आढळणाऱ्या कलाकृती निरखण्यासाठी. खजुराहोला जो कलाविष्कार दिसला, तो कुठल्याही कसोटीनुसार त्यातील मी पाहिलेल्या सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक आहे.
मोहमद असीम नेहाल नावाच्या कवीची एक सुंदर
कविता आहे (मराठीत त्याचं रूपांतर काहीसं असं आहे) –
“प्रत्येक भग्न भिंतीचा प्रत्येक दगड म्हणजे
त्या भिंतीच्या शांततेमध्ये दडलेली एक कथा आहे,
त्यांवरून एक हळूवार हात फिरवा,
जिवंत होऊन सांगतील ते तुम्हाला ह्या कथा
–
प्रेमाच्या, क्रौर्याच्या,
मत्सराच्या, औदार्याच्या आणि मृत्युच्याही,
पण तुमच्या छातीत एक हृदय पाहिजे ती शांतता ऐकण्यासाठी”.
आणि खजुराहोच्या बाबतीत मी पुढे जाऊन असंही म्हणेन
“आणि पाहिजे नजर आंबटशौकाने अंध न झालेली”
मगच दिसेल तुम्हाला खजुराहोचं अद्भुत!
नागालँड
मोरुंग हे पूर्वापार प्रत्येक नागा जमातीच्या समाजजीवनाचं केंद्रस्थान होतं आणि जरी आधुनिक काळात नागा समाज झपाट्याने बदलत असला तरी कोहिमा/दिमापूर सारखी मोठी शहरं सोडली तर इतरत्र अजूनही काही प्रमाणात त्याचं महत्व टिकून आहे. एकेकाळी मोरुंग होती, संध्याकाळी शेतावरून दमून भागून आल्यावर एकमेकांशी सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्याची जागा, जमातीच्या भवितव्याबद्दलचे निर्णय सर्वानुमते घेण्यासाठी ज्येष्ठ पुढाऱ्यांची भेटण्याची जागा, गावातील वयात येऊ घातलेल्या आणि लग्न करून संसार अजून न थाटलेल्या तरुणांच्या वसतिगृहाची आणि त्यांना जमातीचा इतिहास, परंपरा आणि निष्ठा ह्याचे शिक्षण देण्याची जागा. आणि आजही हे मोरुंग गावागावातील सार्वजनिक आयुष्याचा महत्वाचा भाग आहेत.
जरी ही पारंपरिक tribal समाजव्यवस्था काळाबरोबर बदलत असली तरीही कोहिमा सारखं शहर सोडून बाहेर पडल्यावर खोनोमा किंवा झुलेके सारख्या खेड्यांमध्ये हिंडताना जाणवतं की स्थानिक लोकांची स्वत्वाची जाणीव अजूनही त्याच्या कुळाच्या (Clan) आणि अशी अनेक कुळे एकत्र जोडली जाऊन बनलेल्या जमातीच्या (Tribe) व्यक्तित्वाशी अपरिवर्तनीय रीतीने जोडलेली आहे. त्यामुळे तिथे “भाऊ” किंवा “काका” अश्या शब्दांचा अर्थ आपल्याला अनपेक्षित एव्हढा व्यापक होऊ शकतो. आणि कुटुंब ह्या शब्दाची व्याप्ती अर्धाधिक गाव सामावून घेऊ शकते. स्थूलमानाने जरी सर्व नागा समाजाच्या परंपरा आणि संस्कृती समसमान असली तरी वेगवेगळ्या जमातींच्या दैनंदिन व्यवहारातील फरक मात्र सहज जाणवण्या सारखे आहेत.
अर्थात अशी एखादी पूर्वेतिहासाची खूण किंवा स्थानिक लोकांशी बोलताना सहज संभाषणात येणारा “तुमच्या इंडियात अमुक अमूक” असा एखादा उल्लेख सोडला तर, ह्या भूतकाळातील राजकीय बेबनावाची किंवा त्याला निगडित झालेल्या हिंसाचाराची थोडीसुद्धा जाणीव आजच्या नागालँड मध्ये भटकताना आम्हाला झाली नाही. आम्ही अगदी लहान लहान खेड्यापाड्यात आणि निर्मनुष्य जंगलात दिवस-रात्र फिरलो. कुठेही आणि कधीही, कसलीही धोक्याची भावना आम्हाला जाणवली नाही. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीच्या तोंडावर स्वागताचं हास्य होतं आणि अगदी थोडीशी ओळख झाल्यावर सुद्धा घरी येण्याचं आमंत्रण होतं.
पण हे सर्व खरं पहाता सगळं विषयान्तरच झालं! कारण आम्ही नागालँडला जायचं मुळात ठरवलं होतं ते तिथलं सृष्टी सौन्दर्य पाहायला!
नागालँड मधील दोयांग जलाशयाचा परिसर हा अमूर फाल्कन (ससाणा किंवा बाज) ह्या पक्ष्याच्या दर वर्षी होणाऱ्या सायबेरिया ते दक्षिण आफ्रिका ह्या स्थलांतराच्या मार्गावरील विसावा घेणायची प्रमुख जागा आहे. साधारण ऑक्टोबर च्या सुमारास लाखोंच्या संख्येने हे अमूर ससाणे ह्या परिसरात येऊन काही काळ थांबतात. हिंदी महासागर ओलांडून जाण्याआधी क्षणभर विश्रांतीसाठी! एकेकाळी ह्या ससाण्यांची हजारोंच्या संख्येने (एका अंदाजाप्रमाणे जवळपास १३००० ते १४००० दर दिवशी) इथे हत्या केली जात होती. साधारण २०१२-१३ पासून निसर्ग-प्रेमी गटांच्या अथक प्रयत्नांमुळे ह्या हत्येला बंदी घालण्यात आली. हे अमूर फाल्कन बघणे हा आमचा एक प्रमुख हेतू होता. तसंच झूको व्हॅली ह्या नागालँडच्या “Valley of Flowers” बद्दलही आम्ही खूप ऐकलं होतं. आणि एकूणच निसर्गाने जशी निर्माण केली तशी अक्षत, मानवाने विनाकारण न तुडवलेली सृष्टी आता आपल्या जवळपास शोधूनही सापडणं कठीण होत चाललं आहे. नागालँडमध्ये तशी ती सापडेल अशी आशा होती.
झूको व्हॅलीला जाण्यासाठी ४-५ तासांचा ट्रेक
करावा लागतो. ह्या ट्रेकची सुरुवात जिथून होते त्या विस्वामा खेड्याच्या दिशेने जायला
कोहिमा सोडून आम्ही निघालो आणि नागालँडच्या अंतर्भागात शिरल्यावर पहिला धक्का बसला.
आणि पुढच्या ८-१० दिवसात नागालँडच्या ग्रामीण भागात फिरताना हा अनुभव पुन्हा पुन्हा
येणार होता. अशी कळाहीन खेडेगावं, कच्चा रस्ता सुद्धा म्हणता येणार नाही असे रस्ते,
इतकी जीर्ण-शीर्ण घरं कित्येक दशकांपूर्वी कोकण किंवा मराठवाड्याच्या मागास भागात फिरताना
दिसत. त्या काळात कोकणातल्या माझ्या गावी जाताना
आपली २-४ हाडं ST मध्ये रात्रभर धक्के खाताना हरवायचीच हे अपेक्षितच होत. पण गेल्या
काही वर्षात मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात अश्या प्रगत राज्यातून झालेल्या प्रवासात
अगदी प्राथमिक सुविधांचासुद्धा इतका अभाव कधी दिसला नव्हता. त्यामुळे असं काही पाहण्याची
माझ्या डोळयांची सवय आता मोडली होती. आणि अगदी
उत्तराखंड आणि सिक्कीम सारख्या तुलनेने अविकसित प्रदेशातही असं काही दृष्टीपथात आलं
नव्हतं. आपल्याच देशातील एखाद्या प्रदेशात पायाभूत सुविधा नाहीत म्हणजे किती नाहीत
ह्याची कल्पना प्रत्यक्ष अनुभवल्या शिवाय मी करू शकलो नसतो. उदाहरणार्थ, अगदी वोखा
सारख्या एका मोठ्या जिल्ह्याच्या प्रमुख शहरात एकही पक्का रस्ता नाही! नागालँड मधल्या
राजकीय अस्थिरतेचा हा परिणाम आहे की ही राजकीय अस्थिरता हा ह्या विकासाच्या अभावाचा
परिणाम आहे हे मी तरी सांगू शकणार नाही.
नागालँडच्या अस्पृष्ट, निष्कलंक निसर्गाची श्रीमंती ह्या पार्श्वभूमीवर अधिकच थक्क करणारी होती. झूको व्हॅलीला जाणे हे प्रबळ ईच्छाशक्ती असलेल्या (आणि हाडं मजबूत असलेल्या) माणसाचं काम आहे. जवळ जवळ ४ तासांचा उभा चढ, दमछाक झाल्यावर आपला द्रुतगतीने चालणारा श्वास थोडा काबूमध्ये आणण्यासाठी क्षणभरही उभं राहण्यास वाटेत जागा नसलेला, आणि त्यानंतर खिंड उतरून कॅम्पसाईट कडे जाणारा दोन-सव्वादोन तासांचा चढ-उतार.
पण वाटेतील घनदाट अरण्य, डोंगरमाथा ओलांडून पलीकडच्या बाजूला खिंडीत उतरल्यावर दिसणारा पांढरा शुभ्र फुलांचा मैलोन्मैल पसरलेला गालिचा, आणि डोंगर उतारावरचा गालिचा जिथे संपतो तेथून सुरु होणाऱ्या झूको व्हॅलीतील हिरवाईच्या अगण्य छटा श्रमांनी धडधडणारी छाती आणि गुढघ्यांतून ऐकू येणाऱ्या तक्रारीं ह्यांचा विसर पाडणाऱ्या होत्या (पहा पुढचे ३ फोटो).
त्याक्षणी जे दृष्य दिसत होतं त्यापेक्षाही एक महिन्यापूर्वी अधिक सुंदर म्हणजे काय दिसत असेल ह्याची आम्ही कल्पना तरी करू शकत होतो. मात्र जिथे आम्ही दोन रात्री राहण्याचा बेत केला होता ती कॅम्पसाईट म्हणजे केवळ वर्षानुवर्षांच्या साठलेल्या कचऱ्याचा ढीग असेल अशी कल्पना मात्र आम्ही केली नव्हती. मात्र अश्या त्या कॅम्पसाईट मध्ये रात्रीच्या आसऱ्याची “सुविधा” पुरविण्याच्या बदल्यात आम्हाला किती पैसे मोजावे लागतील ह्याचं दर पत्रक कुठल्यातरी स्थानिक तरुण मित्रमंडळाच्या नावाने तिथे लावलेलं होतं. त्यामुळे एक रात्र कशीबशी काढून दुसऱ्याच दिवशी झूकोच्या अवर्णनीय निसर्गाकडे पाठ करून आम्ही खोनोमा गावात आमचा मुक्काम हलविला.
पंगती गाव तर दोयांग जलाशयाच्या काठावरच आहे असं म्हणता येईल. दोयांगचा विस्तृत परिसर लुझर्न (स्वित्झर्लंड) सारख्या प्रसिद्ध जलाशयापुढेही निसर्गशोभेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे कमी पडणार नाही (पहा पुढचे दोन फोटो). पक्षी निरीक्षणाबाबतीत मात्र अनुभव थोडा निराशा करणारा होता. एकतर अरण्य सर्वत्र इतकं दाट होतं कि आजूबाजूला पक्ष्यांची गाणी सतत कानावर पडत असून सुद्धा दाट पानांच्या छत्रीत लपलेले पक्षी दिसणं कठीण होतं. दुसरं म्हणजे ज्याला आपल्या परिसरातील पक्ष्याची ठिकाणं आणि सवयी माहित आहेत अश्या स्थानिक माहितगार मार्गदर्शकाविना त्यांना शोधून काढणं कठीणच होतं. त्यामुळे पंगती मध्ये जरी शेकडो अमूर फाल्कनचे थवे उडताना किंवा विजेच्या तारेवर झोके घेताना दिसले असले, तरी ते बऱ्यापैकी लांबूनच.
Thursday, 8 December 2022
लीमरच्या देशात
भूगर्भशास्त्रज्ञांच्या मतानुसार, सुमारे १८-२० कोटी वर्षांपूर्वी गोंडवन ह्या महाखंडाचे तुकडे व्हायला सुरुवात झाली - त्यातूनंच आजचे आफ्रिका, अण्टार्क्टिका, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय उपखंड असे तुकडे वेगवेगळे निघाले. सुमारे ८-९ कोटी वर्षांपूर्वी मादागास्कर बेट भारतीय उपखंडा पासून तुटून वेगळं झालं. आणि आजपर्यंत एव्हढा दीर्घ काळ जगातील सर्व प्रमुख भूखंडांपासून विलग राहिल्यामुळे मादागास्कर मधील जीवनाची उत्क्रांती पूर्णपणे वेगळ्या वाटेने होत राहिली. समुद्रातून वाहून योगायोगाने मादागास्करला जी काही जीवन बीजे जगाच्या इतर भागातून पोचली असतील आणि त्यांचा स्थानिक जीवनाबरोबर संकर होऊन जे काही आनुवंशिक (Genetic) साधर्म्य मादागास्कर आणि इतर जगातील संबंधित प्रजातींमध्ये निर्माण झालं असेल तेव्हढंच. त्यामुळे मादागास्कर मधील ८५% वनस्पती आणि प्राणी दोहोंच्या प्रजाती जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत. म्हणूनच मादागास्करच्या जंगलातून आणि दऱ्याखोऱ्यातून फिरणे हा एक अद्वितीय अनुभव आहे - झाडं, पानं, फुलं, कीटक, जलचर, वनचर सर्व काही पूर्वी कधीही न पाहिलेलं!
“लीमर” (Lemur) हा ही त्यातलाच एक प्राणी - जगात कुठेही न आढळणारा. लीमर हा Primate (ज्यामध्ये माकड, वानर, गोरिला, लोरीस ह्यासारखे प्राणी आणि मानव सुद्धा समाविष्ट आहेत) ह्या गटात मोडणारा प्राणी आहे. मात्र लीमर आणि आणि माकडं ह्यांच्या दिसण्यात आणि वागण्यात साम्य आढळलं तरी लीमर म्हणजे माकड नव्हे. जीवशास्त्रानुसार माकड, एप, माणूस वगैरे प्राण्यांचा सिमियन गटात समावेश होतो तर लीमर हा स्ट्रेपसिऱ्हीनी गटात मोडतो. सुमारे ६-७ कोटी वर्षांपूर्वी ह्या आज आढळणाऱ्या प्राण्यांच्या (मानवसकट) वंशवेली कुठल्यातरी समाईक पूर्वजापासून वेगवेगळ्या झाल्या असाव्यात. आणि त्याच सुमारास भूगर्भातील उलथापालथीमुळे विलगलेल्या मादागास्करवर अडकलेल्या ह्या पूर्वजांची पुढच्या उत्क्रांतीची वाटचाल आपल्या भाऊबंदांपेक्षा वेगळ्या वाटेने होऊन त्याची परिणीती आज दिसणाऱ्या लीमरमध्ये झाली असावी.
अर्थात सिनेमातले आणि प्रत्यक्षातले लीमर ह्यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. लीमरच्या जाती-पातीत दिसण्या/वागण्यात, सामाजिक व्यवहारांत, खाण्यापिण्यात, वसतीक्षेत्रांत किती विलक्षण वैविध्य आहे हे मला मादागास्करला जाईपर्यंत अजिबात माहिती नव्हतं.
लीमरच्या प्रजातीच १००च्या वर आहेत. त्यात निशाचर जाती आहेत, दिनचरही आहेत, एकपत्नीव्रती आहेत तसेच मोठा जनानखाना बाळगणाऱ्या आहेत, मांसाहारी आहेत तश्याच संपूर्ण शाकाहारी आहेत, आणि शाकाहारी जातींतही फक्त पानं किंवा फक्त फळं किंवा फक्त झाडाचा चीक खाणाऱ्यासुद्धा आहेत, कधीच पाणी न पिणाऱ्या आहेत, जमिनीवर भटकणाऱ्या आहेत, वृक्षांच्या शेंड्यावरच कायम वास्तव्य करणाऱ्याही आहेत!
आकारानेही तुमच्या तळहातावर बसू शकतील अश्या केवळ ३०-४० ग्राम वजनाच्या निशाचर Mouse-Lemur (दुसरा फोटो)पासून ते १०-१२ किलो वजनाच्या Indri पर्यंत (तिसरा फोटो)!
पण त्याच रणांगणाच्या केवळ एक फूट खालच्या फांदीवर दोन Red Fronted Brown लीमर (पाचवा फोटो) शांतपणे बसून वर चालेल्या मारामारीची मजा बघत होते!
सकाळी अँडासिबेच्या हिरव्यागार ट्रॉपिकल जंगलात शिरताना पावसाचा थोडासा सुखद शिडकावा झाला आणि नंतर सूर्य वर आला तरी आजूबाजूच्या दाट वनराईच्या शेंड्यांवर धुक्याची दुलई अजून होती. त्यामुळे आम्ही जरा काळजीतच होतो कारण आम्ही होतो Indri आणि Golden Sifaka च्या मागावर. हे दोन्ही लीमर क्वचितच जमिनीवर उतरतात. त्यांचं कायम वास्तव्य झाडांच्या शेंड्यावरच, ५०-६० फूट उंचीवर. तेव्हढ्यात आम्हाला ऐकू आलं उच्चरवात चाललेलं Indri चं गाणं - Indri च्या ह्या संगीतात आणि देवमाश्याच्या ललकारीत कमालीचं साम्य आहे. आणि आवाजाचा माग काढीत जरासं पुढे गेल्यावर दिसली सकाळच्या न्याहारीत मग्न असलेली त्यांची टोळी.
अँडासिबेच्या जंगलात जरी दिनचर लीमरच्या अनेक जाती दिसल्या असल्या तरी, रात्री बराच काळ झाडा-झुडुपांना ठेचकाळत फिरूनही निशाचरांचं दर्शन मात्र झालं नव्हतं.
असो.पाहिलेल्या सर्वच लीमर जातींचं आणि मादागास्कर मधल्या सर्वच निसर्गाच्या चमत्कारांचं वर्णन शब्दमर्यादेमुळे इथे करणं शक्य नाही.
पण त्यातील सिंगी (Tsingi) ह्या विलक्षण जागेची तोंडओळख पुढच्या लेखात.
विसरलेले समाज - २ : टुलोर चिले देशातील अटाकामा असा प्रदेश आहे जिथे अनेक ठिकाणी गेल्या ५०० वर्षात पाऊसच पडलेला नाही. आणि जेथे पडतो तेथे...
-
One of the greatest delights of travelling to places one had not been to before is discovering things you have never eaten or drunk before -...
-
तुम्ही जर युरोपिअन युनियनच्या वेब साईटला भेट दिलीत तर तुम्हाला तिथे युरोपिअन युनियनच्या निर्मितीची पार्श्वभूमी आणि त्याचा इतिहास ह्यांची संक...
-
A bit of geography and historical context is in order, b efore I go on to describe the enchanting Neko Harbor - one of the most beautiful pl...